Saturday, May 9, 2020

परतून येशील का 'आई'...


याआधी तुझ्याबद्दल लिहिणं जमलंच नाही. त्याच कारणही तसचं होतं. मला वाटायचं की, तू आयुष्यभर माझ्यासोबत असशील. म्हणून तुझ्याबद्दल चार शब्द बोलण्याची मला कधी गरजचं भासली नाही. तुला मी रोज पाहायचे...सका‍ळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी मी तुझा चेहरा पाहायचे. आता त्या चेहऱ्याची जागा एका फ्रेमने घेतली आहे. 


आजचा (दि. १०) मदर्स डेचा दिवस. तुझ्याबद्दल किती लिहावं आणि किती बोलावं, हेच कळत नाहीये. मदर्स डेच्या निमित्तानं तुझ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. तसं पाहिलं तर मला नेहमी तुझी आठवण येते. कधी आई आपल्या मुलांना शाळेत घेऊन जाताना तर कधी हा चिऊताईचा घास म्हणून आई आपल्या बाळाला जेवण जेऊ घालताना...मी आजारी पडले तर अधिकच तुझी आठवण स्मरत राहते...अशा असंख्य क्षणी तुझी आठवण सतावतेय. परंतु, तुझी आठवण फार काढायची नाही, असं मी मनाशी आधीच ठरवलं होतं. कारण, मागं वळून पाहिलं की, भळभळत्या त्या त्रासदायक आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो आणि मग, माझे हात-पाय ढेपाळल्यासारखे होतात. सुचायचं बंद होतं. मग, केवळ आणि केवळ तुझ्या आठवणीत रडत राहायचं. अल्बम काढून तुझे फोटो पाहायचे. त्या रडण्यातही तुझे आणि माझे फोटो पाहून चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य उमटतं. आणि मग घराच्या कोपऱ्याची जागा सोडून किचनमध्ये जायचं. ओक्साबोक्शी रडायचं. मग, तू सांगितलेलं मला आठवतं की, हात-पाय गाळायचे नाहीत. तू मुलगी नाहीस, मुलगा आहेस माझा. मुलासारखं राहायचं. धीराने राहायचं.

तुझ्या कणखर पण, मायाळू हातांनी मला घडवलंस. आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेचं. 

तुझ्या अगणित आठवणींचा साठा मी माझ्या ऋदयात आणि मेंदूत साठवला आहे. दु:खाचे क्षण वगळता तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक आनंदाचे क्षण शिदोरी म्हणून मला अख्ख्या आयुष्यभर पुरेल.  

तू केलेल्या अमाप मेहनतीची जाणीव मला सतत होत राहते. तुझ्या कष्टाला कशाचीच तोड नाही आई! तुझी तुलना दुसऱ्या कुठल्याच गोष्टीशी होणार नाही. तू जग सोडून जाण्याआधी महिना-दोन महिने मला सांगत राहिलीस की, कुणाशी कसं वागायचं, कुणाला किती जवळ करायचं. कुटुंबाची काळजी कशी घ्यायची? तुझ्या माघारी सर्वकाही कसं साकारायचं? तू हे ऐकताना माझं मन हेलावून जायचं. तुला मी म्हणायची की, तुला आई काही होणार नाही. स्ट्रॉन्ग राहा. तू आम्हाला धीटपणे, धीराने, कणखरपणे जगायला शिकवलंस. परंतु, तूच शेवटी धीर सोडलास. कारण, आयुष्यात इतक्या भरभरून संकटाला तू सामोरे गेलीस. २४-२५ वर्षे साऱ्या अडचणींवर मात करून संसाराचा गाडा ओढलास. त्यामुळे तुझ्यातला धीर संपून गेला होता गं...देवाचं तुला बोलावणं आलं आणि त्यामुळेच कदाचित तू मला आयुष्याच्या जगण्याची सूत्रे अखेरच्या दोन महिन्यांत शिकवलीस.   

खरंतरं, तुझ्याबद्दल भरभरून लिहावंस वाटतयं. परंतु, पुढे लिहिण्याचं धाडस होत नाहीये. कारण तुझ्या आठवणी माझ्या आसवांनी पूर्ण भिजून गेल्या आहेत. एकचं म्हणावसं वाटतं-'परतूनी येथील का?'

5 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. आई हा विषय अनेकजणांनी व्यक्त करून आपल्या भावनांची वाट मोकळी करून दिली आहे. पण लेखातून हयात नसलेल्या आईशी सकारात्मक संवाद साधत लिहलेला हा लेख बहुदा दुर्मिळच असावा.

    दुःख बाजूला सारून आईबरोबर घालवलेल्या सुखद क्षणांची आठवण ठेवत, तिच्या संस्कारावर वाटचाल करणार आहे, ही बहुदा आईच्याच शिकवणीची शिदोरी असावी.

    आई- वडील गेल्यानंतर वर्षानुवर्षे दुःख पाजळत सहानुभूती मिळवणारी आणि त्यांच्याच संपत्तीवर आयुष्यभर जगणारी अनेक उदाहरणे आहेत. परंतु आईला आदरांजली व्यक्त करताना मी स्वतःच अस्तित्व निर्माण करणार आहे ही सकारात्मक...धन्यवाद स्वालिया मॅडम या प्रेरणा देणाऱ्या लेखाबद्दल, आईच्या मनातील आपल्यासाठी रचलेली उद्दिष्टे नक्कीच पूर्ण होतील, शुभेच्छा आणि आपल्या आईस विनम्र आदरांजली....

    ReplyDelete