Wednesday, July 1, 2020

कोरोनाच्या काळातलं वारीचं स्वप्न भंगलं...


                  नंदवाळ - विठ्ठल मंदिर

तुझें रुप वेळोवेळां । भरो माझ्या दोहीं डोळां ॥१॥

राम नाम वदो वाणी । हरिकथा पडो कानीं ॥२॥

पायीं तीर्थयात्रा घडो । देह संताघरीं पडो ॥३॥

हातीं घडो देवपूजा । सर्वकाळ गरुडध्वजा ॥४॥

तुका म्हणे देवा । घडो वैष्णवांची सेवा ॥५॥

जशी अनेकांची स्वप्ने भंगली. तसं माझंही एक स्पप्न भंगलं...कोरोनाच्या काळातलं. पण, माझं स्वप्न अजून जीवंत आहे. ते कधी ना कधी साकार होणारचं. तमाम महाराष्ट्रातल्या लोकांबरोबर आषाढी वारी माझ्याही जिव्हाळ्याचा विषय.

माझी आई आणि पंढरपूर 

पंढरपूर जगाच्या नकाशावर झळकलेलं ठिकाण. पंढरपुरातील चंद्रभागा नदी आणि या चंद्रभागेच्या तीरावर वसलेले विठ्ठलाचे पंढरपूर. मी लहान होते. पण, थोडं फार कळायचं. माझी आई तिच्या शाळेतील आठवणी सांगायची. तेव्हा ती सातवी इयत्तेत शिकत असताना त्यांच्या शाळेची सहल पंढरपूरला गेली होती. तिच्या तोंडूनच मी पहिल्यांदा 'चंद्रभागा' हे नाव ऐकलं होतं. पंढरपूरला सहलीसाठी गेली असताना तिने विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यामुळे त्यावेळी मलाही वाटायचं की, आपणही कधी तरी पंढरपूरला जावं. या आठवणी अजुनही मनात राहिल्या आहेत. यंदा वारीला जायचं, असं मागील वर्षी ठरवलं. पण, कोरोनाचं सावट वारीवरही आलं. त्यामुळे प्रतीक्षा करणं, इतकाच पर्याय उरला आहे.

पंजी आणि नंदवाळ 

जसं पंढरपुरात विठ्ठल तसं कोल्हापुरात नंदवाळचा विठ्ठल प्रसिध्द देवस्थान. नंदवाळची प्रती पंढरपूर अशी ओळख आहे. माझी पंजी म्हणजे माझ्या आईच्या वडिलांची आई. ती नंदवाळात जायची...बांगड्या विकायला. वाशी, पिराचीवाडी, नंदवाळ असं तिच्या व्यवसायाचे ठिकाण होतं. बांगड्या विकून तिने चांगला दोन मजली बंगला बांधला होता. तिच्या तोंडून अनेकदा नंदवाळचे नाव ऐकलं होते. नंदवाळकर तिला 'ढोली कासारीन' म्हणून ओळखायचे. तीदेखील गावातील आठवणी, गोष्टी आम्हाला सांगायची. त्यामुळे असं वाटायचं की, नंदवाळला आपण पायी जायचं. कालांतराने नंदवाळला जायचा योग आला. मनातील इच्छा पूर्ण झाली. नंदवाळ फाट्यापासून मी चालत गावामध्ये मंदिरापर्यंत गेले. भजन, टाळ मृदुंगाच्या गजरात निवांत दर्शन घेता आलं. ज्यावेळी दर्शन घेतलं, तेव्हा पंजीच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

उत्तरेश्वर पेठ आणि विठ्ठल मंदिर 

माझं बालपण कोल्हापुरातील शुक्रवार पेठ आणि उत्तरेश्वर पेठ येथे गेलं. उत्तरेश्वर येथे विठ्ठलाचं खूप सुंदर मंदिर आहे. येथील विठ्ठल मंदिराची आणि माझी एक जुनी आठवण कायम स्मरणात राहिलेली आहे. एका कारणावरून मला आईने मारलं. मी तशीच रडत रडत कुणालाही काही न सांगता बाहेर पडले. शेजारीच असणाऱ्या विठ्ठल मंदिरात पळत जाऊन लपून बसले होते. विठ्ठलाच्या मूर्तीमागे लपून बसल्याने मी येथे लपले आहे. हे कुणाला समजलं नाही. म्हणजे अगदी एक भक्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी आला होता. त्याने विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तरीही त्याला समजलं नाही की मी मूर्तीच्या मागे लपले आहे. असो. ही बालपणीची आठवण. लहानपणीच्या आठवणीत थोडी रममान झाले होते.


ही माऊली मला रस्त्यात भेटली. तिने लिफ्ट मागितली. त्या माऊलीबरोबर चर्चा झाल्यानंतर समजलं की, ती विठ्ठल भक्त आहे. तब्बल २० वेळा तिने पायी वारी केली होती. वय होतं ८० वर्षे. चष्मा नाही की, कमजोर नाही. बोलणेही उत्तम. जबरदस्त आवाज. तिने एक गाणेही म्हणून दाखवलं. विठ्ठल आणि गाडी चालकावर आधारित असलेलं ते गाणं होतं. भर उन्हात तिला लिफ्ट दिल्याने गाडी चालकात जणू तिला विठ्ठल दिसला, असा त्या गाण्याचा अन्वयार्थ होता.

परंतु, सांगायचं तात्पर्य असं की, बालपणापासूनचं विठ्ठल, पंढरपूर, नंदवाळ याविषयी ऐकल्याने आपसुकचं मनात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन एकदा तरी घ्यावं आणि पायी वारी एकदा तरी अनुभवावी, ही इच्छा अनेकदा  जागृत झाली होती आणि ती आता ही आहे!

ऐसें तवं भाग्य नाहीं । पूजा कांहीं करावी ॥१॥

पाहोन तीं पदाबुजें । लावूं रज कपाळीं ॥२॥

नाहीं संचित तें गांठी । आर्त पोटी भेटीचें ॥३॥

तुका म्हणे सर्व सिद्धि । वाहे विधि तुळसी ॥४॥