Tuesday, July 7, 2026

Suriya Mass Hero | दाक्षिणात्य सूर्याचा सुपरस्टार 'मास स्ट्रोक', 'गजनी,' 'सिंघम,' 'जय भीम' अन्‌ आता 'करुप्पु'..


 Summary

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याने गेल्या अनेक वर्षांत आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘गजनी’, ‘सिंघम’ आणि ‘जय भीम’सारख्या चित्रपटांमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. आता त्याचा ‘करुप्पू’ हा आगामी चित्रपट चर्चेत असून सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Suriya Karuppu movie stardom blockbuster films in the Tamil industry

विजयच्या अभिनयातून संन्यासानंतर आता सूर्याला तमिळ सिनेमाचा पुढील सर्वात मोठा मास सुपरस्टार म्हटलं जात आहे. ‘गजनी’, ‘सिंघम’ आणि आता ‘करुप्पु’… सूर्याने पुन्हा एकजा सिद्ध केलं आहे की, तो केवळ शानदार अभिनेता नाही तर बॉक्स ऑफिस किंग देखील आहे. सूर्याचा नुकताच रिलीज झालेला चित्रपट ‘करुप्पु’ने बॉक्स ऑफिसवर कमाईचं वादळ आणलं आहे. त्यामुळे तमिळ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये नवा सुपरस्टार म्हणून सूर्याचं नाव पुढे आलं आहे. सूर्याच्या करिअरमधील सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला आहे.

तमिळ चित्रपटसृष्टीत ‘मास’ आणि ‘क्लास’ या दोन्ही प्रवाहांमध्ये सहज वावरणारे काहीच अभिनेते आहेत. त्यात आज सर्वात वरचं नाव घेतलं जातं ते म्हणजे सुर्या. अभिनय, अॅक्शन्स, आणि प्रेक्षकांचं प्रेम या सगळ्यांच्या जोरावर सूर्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आता ‘थलपती’ विजय यांच्या राजकारणातील सक्रियतेमुळे चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याच्या चर्चांदरम्यान तमिळ सिनेमाचा पुढचा ‘मास सुपरस्टार’ म्हणून सूर्याचं नाव सर्वाधिक पुढे येत आहे. ‘गजनी’, ‘सिंघम’, ‘जय भीम’ ते आता ‘करुप्पु’पर्यंत सूर्याने प्रत्येक टप्प्यावर स्वतःला नव्यानं सिद्ध केलं आहे.

संघर्षातून घडलेला अभिनेता

सूर्याचं खरं नाव सरवनन शिवकुमार. तो ज्येष्ठ अभिनेते Sivakumar यांचा मुलगा. घरात सिनेमाचं वातावरण असलं तरी सूर्याला सुरुवातीला अभिनयात रस नव्हता. तो एका गारमेंट कंपनीत ८ महिने नोकरी करत होता आणि स्वतःची ओळख वडिलांच्या नावाशिवाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला १००० रुपये महिना पगार मिळायचा. जेव्हा फॅक्टरीच्या मालकाला सत्य समजलं, तेव्हा सूर्याने काम सोडलं.

तो पद्म शेषाद्री बाला भवन आणि सेंट बेड्स एंग्लो इंडियन स्कूल (चेन्नई) तून शालेय शिक्षण तर लोयोला कॉलेज, चेन्नईतून बी.कॉमची पदवी घेतलीय. त्याचे वडील शिवकुमार तमिळ सिनेमातील एक दिग्गज अभिनेते आहेत.

सूर्याने २२ व्या वर्षी दिग्दर्शक वसंत यांच्य 'नेररुक्कू नेर' (१९९७) मधून डेब्यू केला होता. या चित्रपटाचे निर्माते मणि रत्नम होते. सुरुवातीच्या काही चित्रपटांना फारसं यश मिळालं नाही. अभिनयात आत्मविश्वास नसल्याची टीकाही झाली. मात्र सूर्याने हार मानली नाही. शरीरयष्टी, डान्स, प्रभावी संवाद आणि अभिनयावर त्याने प्रचंड मेहनत घेतली.

नंदा, काक्क काक्क, गजनी, सिंघम, सिंघम २ आणि ३, अंजान यासारख्या चित्रपटातून आफली निर्माण केली. तीन तामिळनाडूचे राज्य फिल्म पुरस्कार आणि तीन फिल्मफेयर पुरस्कार त्याने जिंकले आहेत.

नंदा चित्रपटानने बदललं करिअर

दिग्दर्शक बाला यांच्या नंदा या चित्रपटाने सूर्याच्या करिअरला पहिला मोठा टर्निंग पॉईंट मिळाला. गंभीर आणि भावनिक भूमिकाही आपण ताकदीने करू शकतो, हे त्याने दाखवून दिलं. त्यानंतर ‘काखा काखा’मध्ये पोलिस अधिकाऱ्याची भूमिका आणि ‘पिथामगन’मधील अभिनयाने तो चर्चेत आला. पुढे एकापेक्षा एक चित्रपटाने त्याला अस्सल अभिनेत्याचा टॅग मिळाला.

गजनी रिलीज झाल्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. हा चित्रपट २००५ मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट इतका मोठा ब्लॉकबस्टर ठरला होता की, त्यावर बॉलिवूडमध्ये गजनीच नावाने चित्रपट आला. ज्यामध्ये आमिर खान आणि अभिनेत्री असिनने मुख्य भूमिका साकारली होती. सूर्याचा ‘सिक्स पॅक लूक’ त्या काळात प्रचंड चर्चेत आला.

सिंघम - मास हिरो

२०१० मध्ये सिंघम चित्रपटानमुळे सूर्याला मास हिरोचा टॅग मिळाला. दबंग पोलिस अधिकारी दुरई सिंघमची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अॅक्शन, भन्नाट दृश्ये आणि सूर्याची एनर्जी यामुळे सिंघम सुपरहिट ठरला. त्यानंतर सिंघम २ आणि ३ देखील आला. पुढे जाऊन बॉलविड अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला सिंघमचा रिमेक बनला. या चित्रपटानंतर सूर्याचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला.

अभिनयाची दुसरी बाजू : जय भीम

जय भीम हा मूळच्या तमिळ चित्रपटात त्याने चंद्रू वकिलाची भूमिका साकारली होती. त्याची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली. सूर्याने वयाची पंचेचाळीशी पार केलेली आहे. पन्नाशीकडे असताना देखील तो आजही यंग स्टार दिसतो. फक्त अॅक्शन स्टार म्हणून नव्हे तर विविध आशयघन चित्रपटांचा कलाकार म्हणून दाक्षिणात्य प्रेक्षकांचे त्याच्यावर अफाट प्रेम आहे.

विश्वासार्ह अभिनेता म्हणूनही सूर्याने स्वतःला सिद्ध केलं. Soorarai Pottru मध्ये सर्वसामान्य माणसासाठी स्वस्त विमानसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या उद्योजकाची भूमिका त्याने जिवंत केली. या चित्रपटासाठी त्याचं देशभर कौतुक झालं.

सूर्याचं खासगी जीवन

सूर्याने साऊथ अभिनेत्री ज्योतिकासोबत ११ सप्टेंबर, २००६ मध्ये लग्न केले होते. दोघांचे लग्न मोठ्या जल्लोषात झाले होते. सूर्या आणि ज्योतिकाने १९९९ मध्ये 'पूवेल्लम केत्तुप्पर' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर दोघांमध्ये अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. पुढे ते विवाहबद्ध झाले. सूर्या-ज्योतिकाला एक मुलगी दीया आणि मुलगा देव आहे.

आता ‘करुप्पु’ची चर्चा

सध्या सूर्याच्या आगामी करुप्पू चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे. पोस्टरपासूनच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता तर चित्रपटगृहात स्क्रिनवर करुप्पूसामीच्या भूमिकेत तो येताच शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट होतो आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, रग्गड लूक आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्स पाहता हा चित्रपट पुन्हा एकदा सूर्याला 'मास सुपरस्टार स्ट्रोक' देण्यास सज्ज ठरू शकतो, असे म्हणावयास हरकत नाही.

विजयच्या नंतर सूर्याच का?

दुसरीकडे, तामिळनाडूच्या राजकारणात सिनेमाला अन्यसाधारण महत्त्व आहे. आधी अभिनय आणि नंतर राजकारणात प्रवेश अशी परंपराच जणू चालत आलीय, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. तमिळ सिनेमात ‘मास’ हिरो होण्यासाठी केवळ बॉक्स ऑफिस पुरेसं नाही; त्यासाठी लोकांशी जपलेली भावनिकता महत्त्वाची आहे. सूर्याने आधीच मिळवलीय. दरम्यान, थलपती विजय सिनेमांपासून दूर झाल्यानंतर आता मास हिरो म्हणून सूर्याचेच नाव समोर आले आहे. त्याची प्रचंड लोकप्रियता पाहता तमिळ इंडस्ट्रीला सुपरस्टार सूर्याचा मास स्ट्रोक नक्कीच बसलाय, असे म्हणायला हरकत नाही.

Alka Yagnik देताहेत 'सेंसरीन्यूरल हियरिंग लॉस'शी झुंज, काय आहे हा दुर्मिळ आजार? जाणून घ्या सविस्तर अलका

 याज्ञिक यांच्या आजाराची चर्चा; काय असतो सेंसरीन्यूरल हियरिंग लॉस आणि त्याची लक्षणं?
Summary

सेंसरीन्यूरल नर्व हियरिंग लॉस हा अंतर्गत कानातील किंवा श्रवण नसांमधील बिघाडामुळे होणारा श्रवणविकार आहे. या आजारामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते किंवा अचानक श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो. वयोमान, मोठा आवाज, संसर्ग किंवा काही वैद्यकीय कारणांमुळे हा आजार उद्भवू शकतो. योग्य वेळी निदान आणि उपचार केल्यास त्याचे परिणाम नियंत्रित ठेवता येऊ शकतात.

what is Sensorineural Hearing Loss symptoms, causes and treatment

राष्ट्रपती भवन येथे पद्म पुरस्कार वितरणावेळी प्रसिद्ध बॉलिवूड गायिका अलका याज्ञिक या उपस्थित होत्या. त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीतातील अतुल्य योगदानाबद्दल पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. परंतु, पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी भावूक होत एका दुर्मिळ आजाराचा सामना करत असल्याचे सांगितले. शिवाय, आपल्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आपल्याला कठीण काळात पाठिंबा दिल्याबद्दलही सर्वांचे आभार मानले.

२३ जून रोजी पद्मभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. गायिका अलका याज्ञिक यांना श्रवणाशी संबंधित हा दुर्मिळ सेन्सरी न्यूरल नर्व्ह हियरिंग डिसऑर्डर झाल्याचे वृत्त समोर आले. अलका याज्ञिक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, गेल्या २ वर्षांपासून त्या सेन्सोरिन्यूरल नर्व्ह हिअरिंग लॉस या आजाराने त्रस्त आहेत. मागील दोन वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडींविषयी त्यांनी सांगितले की, आरोग्याच्या समस्यांमुळे त्या बराच काळ लाईमलाईटपासून दूर होत्या.

त्या म्हणाल्या की, "गेली दोन वर्षे मी प्रसिद्धीपासून आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहे. माझ्या जीवनाबद्दल फार काही सांगितले नाही. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहित होते की, मी आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहे. या काळात तुमचे प्रेम, प्रार्थना आणि खंबीर पाठिंबा मिळाला."

गायिकेला कधीपासून हा त्रास झाला?

२०२४ मध्ये एका फ्लाईटमधून बाहेर आल्यानंतर त्यांना जाणवलं की, त्यांना ऐकू येत नाहीये. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांना दाखवल तेव्हा ते म्हणाले होते की, ते एका व्हायरल ॲटॅकमुळे रेयर सेन्सरी नर्व हियरिंग लॉस झाले आहे.

सेंसरीन्यूरल हियरिंग लॉस (sensorineural nerve hearing loss) काय आहे?

सेंसरीन्यूरल हियरिंग लॉस (Sensorineural Hearing Loss - SNHL) हा ऐकण्याच्या क्षमतेशी संबंधित एक प्रकारचा बहिरेपणा आहे. यात कानाच्या आतील भागातील (Inner Ear) कॉक्लिया (Cochlea) किंवा मेंदूपर्यंत आवाज पोहोचवणाऱ्या श्रवण मज्जातंतूला (Auditory Nerve) नुकसान झाल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते.


Friday, May 16, 2025

 परप्रांतीयांशी हमरी-तुमरी, वाद, भांडण इतकचं नाही तर हाणामारी पर्यंत आपण गोष्टी पाहिल्या. मराठी बोलता येत नाही म्हणून कुणालाही त्रास देणं कितपत योग्य आहे. आपणचं जर दुसऱ्या राज्यात, देशात गेलो तर आपल्याला देखील कुठे बोलता येते त्यांची भाषा? किंवा तेथील भाषा शिकायला, परिस्थितीशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतोच की.. भावना कळतात त्या हावभाववरूनचं. सांकेतिक हातवारे करूनचं आपण आपले मत व्यक्त करतो. पु. लं नी म्हटलंच आहे-''एकदा मी पणा विकून पहा...जेव्हा कोणीही घेणार नाही, तेंव्हा समजेल... किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो''. म्हणून धर्म, जात-पात, भाषेच्या पलिकडे जाऊन 'प्रेम'च सर्वार्थाने श्रेष्ठ आहे. आपण एकमेकांबद्दल किती चांगल्या भावना ठेवतो. एकमेकांबद्दल किती प्रेम दाखवतो. समोरच्या व्यक्तीचा अमूक-तमूक गोष्टींवरून द्वेष करतो का? त्याला आपल्यापासून दूर जायला सांगतो का? हा देखील तितकाच महत्त्वाचा विचार आहे. शेवटी खरं प्रेम तर माणुसकीतचं आहे, बरोबर की नाही? 

Tuesday, March 18, 2025

Tomb of Aurangzeb Khuldabad | 'त्या' एका भ्रमात होता औरंगजेब, पण अटळ होता अंत..औरंगजेबच्या मृत्यूसमयी...



'त्या' एका भ्रमात होता औरंगजेब, पण अटळ होता अंत..औरंगजेबाचे मृत्यूचे सर्वात वाईट दिवस

क्रूरकर्मा औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी, अशी मागणी जोर धरू लागलीय. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, काहीही झालं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही, उदात्तीकरण होऊ देणार नाही. औरंगजेबाच्या कबरीचा हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाची कबर आहे. आजदेखील पर्यटनासाठी आलेले असंख्य पर्यटक या कबरीच्या ठिकाणी भेट देतात. ज्या ठिकाणी त्याची कबर बांधलीय, ते खुलताबाद हे ठिकाण होय. या पार्श्वभूमीवर औरंगजेबाचे उत्तरायुष्याचा इतिहास काय सांगतो? जाणून घेऊया.

'या' भ्रमात होता औरंगजेब 
आयुष्यभर क्रूरतेने वागलेल्या औरंगजेबाला मृत्यूसमयी अत्यंत वाईट दिवस पाहावे लागले होते. औरंगजेबाच्या अखेरच्या क्षणी मोगल साम्राज्य हे एखाद्या भव्य आणि विशाल इमारतींप्रमाणे दिसत असले तरी, प्रत्यक्षात ते एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कमकुवत आणि दुबळे बनले होते. मार्च १६८९ पर्यंत आपण अजिंक्य आणि भारतीय उपखंडाचा अतुलनीय सर्वाधिपती आहोत, याच भ्रमात औरंगजेब होता. परंतु, सत्ता आणि संपत्ती यांच्या शिखरावर असतानाचा त्याचा अंत अटळ आणि अपरिहार्य होता. लेखक हेनरी जॉर्ज लिहितात- '' भारतीय सम्राटाबाबत एक गोष्ट विशेष होती की, त्याच्या कारकिर्दीतील सूड-भावनेचे धोरण हे सर्वस्वी त्याच्या स्वभावामुळेच घडून आले होते...'' (Tomb of Aurangzeb) 

हेनरी जॉर्ज कीनच्या मते - "औरंगजेबाने राजमहालांवर आणि मंदिरांवर आपला शिक्का मारण्याचा व छाप उमटविण्याचा जो निश्चय केला होता आणि आपल्याला हवे तेच रूप त्याने देण्याचा जो निर्धार केला होता, तो जर त्याने केला नसता तर तो आपल्या खुल्या विचारांच्या आणि सुखोपभोगी पूर्वजांप्रमाणे यशस्वीरीत्या राज्य करू शकला असता." एका अर्थाने 'मी म्हणजेच राज्य' ही त्याची धारणा होती... असा संदर्भ 'मध्ययुगीन भारताचा बृहद इतिहास : खंड दुसरा' या पुस्तकामध्ये 'मोगल साम्राज्याचा ऱ्हास' (मूळ लेखक - डॉ. जे. एल. मेहता, अनुवाद- डॉ. व. तु. देशपांडे) या प्रकरणात आढळतो.


१६८९ मध्ये जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांशी शत्रुत्व घेतलं आणि सर्व मराठ्यांचा रोष ओढवून घेतला होता, तेव्हाच त्याच्या साम्राज्यावर मोठा आघात झाला होता.

औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मोगल साम्राज्य

१६७९ मध्ये मारवाडचे राज्य जिंकल्यानंतर औरंगजेबाची उर्वरित कारकीर्द अखंड अशा युद्धांनीच भरली होती. आणि या सततच्या लढायांमुळे मनुष्यबळ व पैसा या दोन्ही बाबतींत, मोगल साम्राज्याचे कल्पनातीत नुकसान झाले होते. एका अंदाजानुसार दक्षिणेत मोगलांच्या छावण्यांमध्ये दरवर्षी जवळपास एक लाख माणसे मरण पावली आणि तीन लाख जनावरे मरण पावली, ज्यात घोडे, हत्ती, बैल आणि उंट यांचा समावेश होता. शेतकरीवर्ग उद्धवस्त झाला. वेठबिगार, उपासमार व साथीच्या रोगांचा उद्भव यांचा त्रास सहन करावा लागला. दक्षिणेत चाललेल्या सततच्या युद्धामुळे मोगल साम्राज्याची तिजोरी रिकामी झाली. तेव्हा अडचणींवर मात करण्यासाठी औरंगजेबाने अकबराच्या काळापासून, त्यानंतरच्या सर्व मोगल सम्राटांच्या काळात जो पैसा गंगाजळीच्या रूपाने राखीव निधी म्हणून जमवलेला होता, तो आग्रा आणि दिल्लीच्या किल्ल्यातील तिजोरीतून काढून त्याच्याकडे दक्षिणेत पाठविला जावा, असा आदेश आपल्या शासकीय अधिकाऱ्यांना दिला. अशा रीतीने मोगल साम्राज्याचा राखीव निधीदेखील वापरला गेला. अशा प्रकारे औरंगजेबाच्या मृत्यूसमयी त्याचे साम्राज्य दिवाळखोर झाले होते. (Tomb of Aurangzeb)



औरंगजेबाच्या शेवटच्या कालखंडात सर्वत्र अराजकता

सार्वजनिक इमारती, धर्मशाळा आणि रस्त्यांची दुरवस्था झाली होती. दुरुस्तीसाठीही मोगल शासनाकडे पैसा उरला नव्हता. शिक्षणसंस्था, पाटबंधारे, धरणे, लोकोपयोगी सेवा पैशांअभावी कोलमडून पडल्या. इ. स. १६८१-१७०७ या कालखंडात सर्व प्रशासनव्यवस्था कोलमडून पडली. विविध प्रांतांतील सुभेदार हे आळशी बनले. जो तो आपला फायदा बघू लागला. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली. राजकीय अशांतता निर्माण झाली, व्यापार व उद्योगावर विपरीत परिणाम होऊन अधोगतीच झाली. म्हणूनच जिथे दुष्काळ पडला होता त्या प्रदेशातील भुकेने तडफडणाऱ्या जनतेपर्यंत, मोगल साम्राज्याचे शासन किंवा व्यक्तिगत स्तरावर कोणतीही मदत पोहोचू शकली नाही. सैनिकांचे आणि मुलकी अधिकारी यांचे पगार तीन वर्षांपासून थकले होते.

इतिहासकार जे. एन. सरकार यासंदर्भात लिहितात, "पगार मिळत नसल्यामुळे उपासमार होत असलेले सैनिक, अधिकारी वगैरे लोक ज्या स्थानिक दुकानदारांकडून तोपर्यंत माल उधारीवर घेत होते, ती उधारीही आता बंद झाली होती. सैनिकांनी त्यांच्या सैन्याच्या तुकडीचा पगार देणाऱ्या अधिकाऱ्यालाच मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू घडून आला." अडचणीत आलेल्या व त्रस्त झालेल्या औरंगजेबाने मोगल अधिकाऱ्यांना व सैनिकांना त्यांच्या सेवेसाठी पगाराच्या बदल्यात जहागिरी देण्याच्या प्रथेचा अवलंब केला. असे पाऊल उचलल्यावाचून औरंगजेबाला गत्यंतर नव्हते..." (Tomb of Aurangzeb)

शेवटी एखाद्या इमारतींचा केवळ पोकळ वासाच किंवा सांगाडा उरावा, अशी मोगल साम्राज्याची परिस्थिती झाली होती.



औरंगजेबाची शेवटची वर्षे अतिशय वाईट

औरंगजेबाची शेवटची वर्षे अतिशय वाईट गेली. त्याची पहिली कन्या झेबुन्निसा (१७०२), बंडखोर मुलगा अकबर (१७०४), त्याची लाडकी सून (दाराची मुलगी) आणि बहिण गोहरआरा दिल्लीत मरण पावली. त्याची आणखी एक कन्या मिहिरउन्निसा आणि तिचा नवरा एकाचवेळी मरण पावले. आयुष्यभर केलेली पातके, निर्घुण हत्या यामुळे औरंगजेबाला शेवटी झोप लागत नव्हती. मेल्यानंतरही आपल्याला झोप लागणार नाही, अशी त्याला भीती वाटत होती. (संदर्भ- कहाणी मुघल घराण्याची; प्रकरण-औरंगजेबानंतरचे मुघल सम्राट, लेखक - रंगा मराठे) म्हणूनच की काय, शीतलता देणारे सब्जाचे झाड आपल्या कबरीवर लावावं, अशी त्याची इच्छा होती. जे आजही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औंरगजेबाच्या कबरीवर असल्याचे पाहायला मिळते.

औरंगजेब स्वत: विणकाम करून टोप्या शिवायचा. १४ रुपये आणि बारा आणे जी यातून कमाई झाली होती, त्याच पैशांमध्ये खुलताबाद या ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आली. औरंगजेबाच्या इच्छेनुसारच, फकीर अवलियांच्या कबरीशेजारी त्याच्या पार्थिवाचे दफन करण्यात आलेे. तेथील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, औरंगजेब हा गुरु अवलियाना फार मानत असे. म्हणूनच आपलीही कबर शेजारीस असावी, असे त्याने लिहून ठेवले. तसेच कबर साधी आणि पांढऱ्या बांधकामात असावी, कुठलीही रंगरंगोटी अथवा त्यावर छत नसावे, असेही त्याने म्हटल्याचे स्थानिक लोक सांगतात. जे दृश्य आजही त्याच्या कबरीच्या ठिकाणी पाहायला मि‍ळते. (Tomb of Aurangzeb) त्याच्या मृत्यूसमयी त्याची तीन मुले हयात होती. औरंगजेबाने आपल्या हस्ताक्षरात मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं. त्यामध्ये त्याने आपले साम्राज्य आपल्या तीन मुलांना वाटून टाकले. पण मुलांना ही वाटणी मान्य नव्हती. पुढे औरंगजेबाच्या इच्छेची कोणतीही तमा न बाळगता त्याच्या मुलांमध्ये कटुता निर्माण झाली आणि भावंडांमध्ये युद्ध जुंपले. (संदर्भ - कहाणी मुघल घराण्याची, लेखक रंगा मराठे, पृष्ठ क्र- ८४)    

Wednesday, April 24, 2024

Story Of HeeraMandi : वारांगनांची झगमगती दुनिया पाकिस्तानातील 'हिरामंडी'ची 'ही' आहे खरी कहाणी


पाकिस्तानच्या लाहौरमधील सर्वात मोठा रेड लाईट एरिया आजदेखील इतिहासाची आठवण करून देतो. झगमगत्या दुनियेतील वारांगना हिरामंडीची शान असायच्या. आजदेखील येथे हिरामंडी आहे, पण ती चमक आज दिसत नाही. अनेक वारांगनांनी हिरामंडी (Story Of HeeraMandi) सोडल्याचे म्हटले जाते. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये अनेक छोट्या-छोट्या घरांमध्ये या वारांगना दिसून येतात. पाकिस्तानात वेश्यालयावर निर्बंध असल्याचे म्हटले जाते. पण, तरीही वारांगना येथील रस्त्यांवर दिसत असल्याचे बोलले जाते. (Story Of HeeraMandi)

लाहौरमधील हिरामंडी हे ठिकाण राणीप्रमाणे राहणाऱ्या वारांगनाचे असायचे. खास म्हणजे, येथील वारांगना आणि तवायफ यांचे वेगवेगळे व्यवसाय असायचे. हिरामंडीच्या वस्तीमध्ये गाणाऱ्या तवायफची कोठी महफिलनी सजलेली असायची. मुजरा पाहण्यासाठी अनेक बडे लोक दूरवरून इथे यायचे. प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि सन्मानासह त्या जगायच्या. हिरामंडीला शाही मोहल्ला देखील म्हटलं जायचं. अनेक भिंतींनी वेढलेल्या लाहौर शहरात हा बाजार आहे. आजदेखील काही महिला देहव्यापारासाठी येथे येत असल्याचे म्हटले जाते.

हिरा सिंह सम्राट यांच्या नावावरून हिरामंडी हे नाव या ठिकाणाला पडले. त्यांनी शाही मोहल्ल्यात एक खाद्यान्न बाजाराची स्थापना केली. नंतर त्यास 'हिरा सिंह दी मंडी' नाव मिळाले. असे म्हटले जाते की, १५ व्या आणि १६ व्या शतकानंतर हा बाजार ऐतिहासिक रूपात तवायफ संस्कृतीचे केंद्र राहिले.

हिरामंडीचा इतिहास तसा खूप जुना आहे. पण, मुघलकाळात लाहौरच्या हिरामंडीमध्ये सुरांची महफिल सजायची. अनेक शौकीनांचे या मंडीकडे पाय वळायचे. आसपासच्या बाजारांमध्येही खूप झगमगती दुनिया असायची. परंतु, देहव्यापार या बाजारांमध्ये व्हायचा नाही. देहव्यापार करणाऱ्या वारांगना वेगळ्या असायच्या आणि नाचणाऱ्या गाणाऱ्या कोठ्यावर असायच्या. बालपणापासून मुली रियाज करत असता आणि मग गाणे गात असत. त्यांना शायरी आणि संगीताचे प्रशिक्षण दिले जायचे.

मुघलांचा काळ संपल्यानंतर गाणाऱ्यांना देखील देहाचा सौदा करावा लागल्याचे म्हटले जाते. काळाच्या ओघात ही झगमगती दुनिया दिसेनाशी झाली. पण अद्यापही हिरामंडी हे ठिकाण ऐतिहासिक रुपात सर्वांच्या समोर येते.

- संकलित माहिती


Monday, January 22, 2024

रामनगरी अयोध्याचे प्राचीन नाव काय होते? कुणी स्थापना केली अयोध्यानगरी


अयोध्यामध्ये भगवान रामाचे भव्य मंदिराचा आज सोहळा आहे. २२ जानेवारी रोजी रामल्लाची अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाईल. या खास औचित्याने जाणून घेऊया अयोध्येबद्दल. तुम्हाला माहितीये का, अयोध्याचे पूर्वीचे नाव काय होते? अनेक दस्ताऐवज, कागदपत्रे आणि धार्मिक ग्रंथांमध्ये अयोध्याची अनेक नावे सांगण्यात आली आहेत.  रामायण काळात अयोध्या नगरी कोसल राज्याची राजधानी होती. उत्तर प्रदेश सरकारच्या वेबसाईटनुसार, अयोध्याचे प्राचीन नाव साकेत नगर होते. असेही म्हटले जाते की, अयुद्धा नावानेही ती ओळखली जायची. पण, याबद्दलची खरी पुष्टी कशी करायची? याबद्दल साशंकता आहे. 

अयोध्या हे एक शरयू नदीच्या किनारी एक धार्मिक आणि ऐतिहासिक शहर आहे. येथे दूरवरून लोक दर्शनासाठी येतात.

अयोध्या कोणत्या राज्याची राजधानी होती?

भगवान रामाची जन्मभूमी अयोध्या कोशल राज्याची सुरुवातीची राजधानी होती. इथे इक्ष्वाकु, हरिश्चंद्र, पृथु, मांधाता, सागर, भगीरथ, दिलीप, दशरथ यासारख्या अनेक प्रतिष्ठित राजांचे शासन होते.


अयोध्याची स्थापना कोणी केली?

हिंदू किंवदंतीनुसार, अयोध्याची स्थापना मनुने केल्याचे म्हटले जाते. पण, हे कितपत खरे आहे, याचे प्रमाण सापडत नाही. हिंदू महाकाव्य रामायणमध्ये हे शहर सूर्यवंशी राजवंशची राजधानी होती, तेथील राजा भगवान राम होते.

अयोध्याची स्थापना प्राचीन भारतीय ग्रंथाच्या आधारावर ई.पू. २२०० च्या जवळपास मानले जाते. याचा उल्लेख अनेक हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये मिळतात. अयोध्या नावाचा उल्लेख हिंदू ग्रंथांमध्ये जसे गोस्वामी तुलसीदास यांच्या रामचरितमानसमध्येही मिळतो. बौद्ध मान्यतेनुसार बुद्ध देवने अयोध्या अथवा साकेतमध्ये १६ वर्षांपर्यंत निवास केला होता. रामानंदी संप्रदायाचे मुख्य केंद्र अयोध्या होते. 


अयोध्येत फिरण्यासाठी कोणती ठिकाणे आहेत?

अयोध्यामध्ये फिरण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. कनक भवन, हनुमान गढी, तुलसी स्मारक भवन, राम पार्क, मणि पर्वत, रामकोट, श्री नागेश्वरनाथ मंदिर आणि शरयू घाट इत्यादी. उत्तर प्रदेशमधील अयोध्या एक प्राचीन शहर आहे. हिंदूंच्या सात पवित्र शहरांपैकी एक अयोध्या मानले जाते. या शहरास अवधदेखील म्हटले जाते. 

(सदर माहिती विविध वेबसाईट्सवरून जमा करून लिहिली गेली आहे) 


Monday, June 20, 2022

आषाढी वारी - तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये


 २०१९ ला ठरवलं होतं की, पंढरीच्या वारीला जायचं. तोपर्यंत कोरोनाचा हाहाकार झाला आणि अख्खा देश भिंतीच्या आत लॉक झाला. वारीच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. इतक्या वर्षांची सुप्त इच्छा असतानाही आपण जिल्ह्याशेजारच्या (कोल्हापूर) पंढरपूरला (सोलापूर) जाऊ शकले नाही, याची खंत मनात सलत राहिलीय. यावर्षी, पुढीलवर्षी करत २०२२ उजाडलं. तरीही अडचणी कमी व्हायची नाव घेईना. कोणत्या ना कोणत्या कारणावरून माझं वारी मार्गक्रमण थांबलं आहे. कधी आर्थिक अडचण तर कधी आरोग्याचं कारण, ही न ती असंख्य कारणे! पाऊलवाटांमधील पसरलेले काटे बाजूला सारत वारी अनुभवयाची आस चित्ती लागून राहिली आहे. विठुराया आणखी किती परीक्षा पाहणार आहे, कुणास ठाऊक. म्हणताता ना, त्याचं (विठुरायाचं) बोलावणं जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मनमर्जीनं कुणीही त्याच्याकडे जाऊ शकत नाही, याची प्रचिती मात्र नक्की आलीय! 

कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥

ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥

कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥

गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥

झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥

तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥

जनात कुठलेही दु:ख येऊ नयेत. अडचणी अशा सरकन दूर व्हाव्यात. कधी त्या विठुरायाच्या मार्गावर पायी चालत जाईन, असे अंतरी टोचत राहत आहे. उपाशी राहिले तरी चालेल. सकल जनांचा विचार करता करता पढंरपूरपर्यंत नक्कीच पोहोचेन, असा संकल्प ठायी धरूनचं मनात भाव घेऊन पंढरीला जाण्यासाठी मी उभी आहे. 

जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥ 

पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥ 

वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥

आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥

धर्म, जात -पात कशाचेचं काही मला पडलेले नाही. समाज काय म्हणेल, नातेवाईक बोलतील, याकडं आधीच दुर्लक्ष केलेलं आहे. कुठलीही आशा-निराशा, उदासीनता, अपेक्षा, इच्छा, राग, लोभ कशाचा भाव ठायी नाहीये. माझं मन जसं प्रवाहित निर्जराप्रमाणे आहे, जे फक्त एकचं महत्त्वाकांक्षा मनी घेऊन फिरत आहे की, ''विठठ्ला, रुप तुझे एकदा तरी दाखव. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य एकदा तरी निरखू दे. अनेक भक्तांनी सांगितलं होतं की, तुझ्या चेहऱ्यावरील तेज अकालनीय आहे; सहजासहजी ते कुणालाही समजणारं नाही. तुझ्या चेहऱ्यावरील हास्य, भाव मनाला समाधान देणारं आहे, पणं या भावामागे काय दडलंय, हे कुण्या सामान्याला अजाणतं आहे. तुझ्या भक्तीत तल्लीन होऊन स्वत:ला समर्पण करावं आणि सगळ्या अगणित संकटांपासून मुक्त व्हावं, इतकाच काय तो मनी भाव.'' 

सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥

गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥

विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥

तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥ 

मानवजातीचा काय तो धर्म विठ्ठला तुझ्याकडून शिकावा. पाप काय आणि पुण्य काय? संसारात जगताना या गोष्टी घागर भरूनी वाहू लागल्या आहेत. कुठेतरी शांत चित्तेने तुझ्या जवळ यावं आणि अलगद पायी बसावं, अशी मनिषा मनी वसलीय. ''नको तो संसार, नको तो पैशांचा बाजार, नको पाप-पुण्य, नको लोभ-माया; तुझ्या चरणी परीस व्हावा, इतकीच काय ती अभिलाषा!'' 

तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम 

देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम

देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम