परप्रांतीयांशी हमरी-तुमरी, वाद, भांडण इतकचं नाही तर हाणामारी पर्यंत आपण गोष्टी पाहिल्या. मराठी बोलता येत नाही म्हणून कुणालाही त्रास देणं कितपत योग्य आहे. आपणचं जर दुसऱ्या राज्यात, देशात गेलो तर आपल्याला देखील कुठे बोलता येते त्यांची भाषा? किंवा तेथील भाषा शिकायला, परिस्थितीशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतोच की.. भावना कळतात त्या हावभाववरूनचं. सांकेतिक हातवारे करूनचं आपण आपले मत व्यक्त करतो. पु. लं नी म्हटलंच आहे-''एकदा मी पणा विकून पहा...जेव्हा कोणीही घेणार नाही, तेंव्हा समजेल... किती फालतू गोष्ट आपण इतके दिवस बाळगत होतो''. म्हणून धर्म, जात-पात, भाषेच्या पलिकडे जाऊन 'प्रेम'च सर्वार्थाने श्रेष्ठ आहे. आपण एकमेकांबद्दल किती चांगल्या भावना ठेवतो. एकमेकांबद्दल किती प्रेम दाखवतो. समोरच्या व्यक्तीचा अमूक-तमूक गोष्टींवरून द्वेष करतो का? त्याला आपल्यापासून दूर जायला सांगतो का? हा देखील तितकाच महत्त्वाचा विचार आहे. शेवटी खरं प्रेम तर माणुसकीतचं आहे, बरोबर की नाही?
Friday, May 16, 2025
Tuesday, March 18, 2025
Tomb of Aurangzeb Khuldabad | 'त्या' एका भ्रमात होता औरंगजेब, पण अटळ होता अंत..औरंगजेबच्या मृत्यूसमयी...
'त्या' एका भ्रमात होता औरंगजेब, पण अटळ होता अंत..औरंगजेबाचे मृत्यूचे सर्वात वाईट दिवस
क्रूरकर्मा औरंगजेबची कबर कायमची नेस्तनाबूत करावी, ती महाराष्ट्रातून कायमस्वरूपी हटवावी, अशी मागणी जोर धरू लागलीय. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते की, काहीही झालं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही, उदात्तीकरण होऊ देणार नाही. औरंगजेबाच्या कबरीचा हा प्रश्न आता चर्चेत आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाची कबर आहे. आजदेखील पर्यटनासाठी आलेले असंख्य पर्यटक या कबरीच्या ठिकाणी भेट देतात. ज्या ठिकाणी त्याची कबर बांधलीय, ते खुलताबाद हे ठिकाण होय. या पार्श्वभूमीवर औरंगजेबाचे उत्तरायुष्याचा इतिहास काय सांगतो? जाणून घेऊया.
'या' भ्रमात होता औरंगजेब
आयुष्यभर क्रूरतेने वागलेल्या औरंगजेबाला मृत्यूसमयी अत्यंत वाईट दिवस पाहावे लागले होते. औरंगजेबाच्या अखेरच्या क्षणी मोगल साम्राज्य हे एखाद्या भव्य आणि विशाल इमारतींप्रमाणे दिसत असले तरी, प्रत्यक्षात ते एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कमकुवत आणि दुबळे बनले होते. मार्च १६८९ पर्यंत आपण अजिंक्य आणि भारतीय उपखंडाचा अतुलनीय सर्वाधिपती आहोत, याच भ्रमात औरंगजेब होता. परंतु, सत्ता आणि संपत्ती यांच्या शिखरावर असतानाचा त्याचा अंत अटळ आणि अपरिहार्य होता. लेखक हेनरी जॉर्ज लिहितात- '' भारतीय सम्राटाबाबत एक गोष्ट विशेष होती की, त्याच्या कारकिर्दीतील सूड-भावनेचे धोरण हे सर्वस्वी त्याच्या स्वभावामुळेच घडून आले होते...'' (Tomb of Aurangzeb)
हेनरी जॉर्ज कीनच्या मते - "औरंगजेबाने राजमहालांवर आणि मंदिरांवर आपला शिक्का मारण्याचा व छाप उमटविण्याचा जो निश्चय केला होता आणि आपल्याला हवे तेच रूप त्याने देण्याचा जो निर्धार केला होता, तो जर त्याने केला नसता तर तो आपल्या खुल्या विचारांच्या आणि सुखोपभोगी पूर्वजांप्रमाणे यशस्वीरीत्या राज्य करू शकला असता." एका अर्थाने 'मी म्हणजेच राज्य' ही त्याची धारणा होती... असा संदर्भ 'मध्ययुगीन भारताचा बृहद इतिहास : खंड दुसरा' या पुस्तकामध्ये 'मोगल साम्राज्याचा ऱ्हास' (मूळ लेखक - डॉ. जे. एल. मेहता, अनुवाद- डॉ. व. तु. देशपांडे) या प्रकरणात आढळतो.
१६८९ मध्ये जेव्हा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांशी शत्रुत्व घेतलं आणि सर्व मराठ्यांचा रोष ओढवून घेतला होता, तेव्हाच त्याच्या साम्राज्यावर मोठा आघात झाला होता.
औरंगजेबाच्या मृत्यूसमयी मोगल साम्राज्य
१६७९ मध्ये मारवाडचे राज्य जिंकल्यानंतर औरंगजेबाची उर्वरित कारकीर्द अखंड अशा युद्धांनीच भरली होती. आणि या सततच्या लढायांमुळे मनुष्यबळ व पैसा या दोन्ही बाबतींत, मोगल साम्राज्याचे कल्पनातीत नुकसान झाले होते. एका अंदाजानुसार दक्षिणेत मोगलांच्या छावण्यांमध्ये दरवर्षी जवळपास एक लाख माणसे मरण पावली आणि तीन लाख जनावरे मरण पावली, ज्यात घोडे, हत्ती, बैल आणि उंट यांचा समावेश होता. शेतकरीवर्ग उद्धवस्त झाला. वेठबिगार, उपासमार व साथीच्या रोगांचा उद्भव यांचा त्रास सहन करावा लागला. दक्षिणेत चाललेल्या सततच्या युद्धामुळे मोगल साम्राज्याची तिजोरी रिकामी झाली. तेव्हा अडचणींवर मात करण्यासाठी औरंगजेबाने अकबराच्या काळापासून, त्यानंतरच्या सर्व मोगल सम्राटांच्या काळात जो पैसा गंगाजळीच्या रूपाने राखीव निधी म्हणून जमवलेला होता, तो आग्रा आणि दिल्लीच्या किल्ल्यातील तिजोरीतून काढून त्याच्याकडे दक्षिणेत पाठविला जावा, असा आदेश आपल्या शासकीय अधिकाऱ्यांना दिला. अशा रीतीने मोगल साम्राज्याचा राखीव निधीदेखील वापरला गेला. अशा प्रकारे औरंगजेबाच्या मृत्यूसमयी त्याचे साम्राज्य दिवाळखोर झाले होते. (Tomb of Aurangzeb)
औरंगजेबाच्या शेवटच्या कालखंडात सर्वत्र अराजकता
सार्वजनिक इमारती, धर्मशाळा आणि रस्त्यांची दुरवस्था झाली होती. दुरुस्तीसाठीही मोगल शासनाकडे पैसा उरला नव्हता. शिक्षणसंस्था, पाटबंधारे, धरणे, लोकोपयोगी सेवा पैशांअभावी कोलमडून पडल्या. इ. स. १६८१-१७०७ या कालखंडात सर्व प्रशासनव्यवस्था कोलमडून पडली. विविध प्रांतांतील सुभेदार हे आळशी बनले. जो तो आपला फायदा बघू लागला. कायदा आणि सुव्यवस्था ढासळली. राजकीय अशांतता निर्माण झाली, व्यापार व उद्योगावर विपरीत परिणाम होऊन अधोगतीच झाली. म्हणूनच जिथे दुष्काळ पडला होता त्या प्रदेशातील भुकेने तडफडणाऱ्या जनतेपर्यंत, मोगल साम्राज्याचे शासन किंवा व्यक्तिगत स्तरावर कोणतीही मदत पोहोचू शकली नाही. सैनिकांचे आणि मुलकी अधिकारी यांचे पगार तीन वर्षांपासून थकले होते.
इतिहासकार जे. एन. सरकार यासंदर्भात लिहितात, "पगार मिळत नसल्यामुळे उपासमार होत असलेले सैनिक, अधिकारी वगैरे लोक ज्या स्थानिक दुकानदारांकडून तोपर्यंत माल उधारीवर घेत होते, ती उधारीही आता बंद झाली होती. सैनिकांनी त्यांच्या सैन्याच्या तुकडीचा पगार देणाऱ्या अधिकाऱ्यालाच मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू घडून आला." अडचणीत आलेल्या व त्रस्त झालेल्या औरंगजेबाने मोगल अधिकाऱ्यांना व सैनिकांना त्यांच्या सेवेसाठी पगाराच्या बदल्यात जहागिरी देण्याच्या प्रथेचा अवलंब केला. असे पाऊल उचलल्यावाचून औरंगजेबाला गत्यंतर नव्हते..." (Tomb of Aurangzeb)
शेवटी एखाद्या इमारतींचा केवळ पोकळ वासाच किंवा सांगाडा उरावा, अशी मोगल साम्राज्याची परिस्थिती झाली होती.
औरंगजेबाची शेवटची वर्षे अतिशय वाईट
औरंगजेबाची शेवटची वर्षे अतिशय वाईट गेली. त्याची पहिली कन्या झेबुन्निसा (१७०२), बंडखोर मुलगा अकबर (१७०४), त्याची लाडकी सून (दाराची मुलगी) आणि बहिण गोहरआरा दिल्लीत मरण पावली. त्याची आणखी एक कन्या मिहिरउन्निसा आणि तिचा नवरा एकाचवेळी मरण पावले. आयुष्यभर केलेली पातके, निर्घुण हत्या यामुळे औरंगजेबाला शेवटी झोप लागत नव्हती. मेल्यानंतरही आपल्याला झोप लागणार नाही, अशी त्याला भीती वाटत होती. (संदर्भ- कहाणी मुघल घराण्याची; प्रकरण-औरंगजेबानंतरचे मुघल सम्राट, लेखक - रंगा मराठे) म्हणूनच की काय, शीतलता देणारे सब्जाचे झाड आपल्या कबरीवर लावावं, अशी त्याची इच्छा होती. जे आजही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औंरगजेबाच्या कबरीवर असल्याचे पाहायला मिळते.
औरंगजेब स्वत: विणकाम करून टोप्या शिवायचा. १४ रुपये आणि बारा आणे जी यातून कमाई झाली होती, त्याच पैशांमध्ये खुलताबाद या ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आली. औरंगजेबाच्या इच्छेनुसारच, फकीर अवलियांच्या कबरीशेजारी त्याच्या पार्थिवाचे दफन करण्यात आलेे. तेथील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, औरंगजेब हा गुरु अवलियाना फार मानत असे. म्हणूनच आपलीही कबर शेजारीस असावी, असे त्याने लिहून ठेवले. तसेच कबर साधी आणि पांढऱ्या बांधकामात असावी, कुठलीही रंगरंगोटी अथवा त्यावर छत नसावे, असेही त्याने म्हटल्याचे स्थानिक लोक सांगतात. जे दृश्य आजही त्याच्या कबरीच्या ठिकाणी पाहायला मिळते. (Tomb of Aurangzeb) त्याच्या मृत्यूसमयी त्याची तीन मुले हयात होती. औरंगजेबाने आपल्या हस्ताक्षरात मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं. त्यामध्ये त्याने आपले साम्राज्य आपल्या तीन मुलांना वाटून टाकले. पण मुलांना ही वाटणी मान्य नव्हती. पुढे औरंगजेबाच्या इच्छेची कोणतीही तमा न बाळगता त्याच्या मुलांमध्ये कटुता निर्माण झाली आणि भावंडांमध्ये युद्ध जुंपले. (संदर्भ - कहाणी मुघल घराण्याची, लेखक रंगा मराठे, पृष्ठ क्र- ८४)
Subscribe to:
Posts (Atom)


