सुरेश मेस्त्री
काका तुम्ही हे जग सोडून गेला. परंतु, तुमच्या आठवणी आजही सतत आठवत आहेत. तुम्ही गेल्याची माहिती कानावर आली आणि काही सुचेनास झालं. विश्वास बसेना की, आपल्या जवळचा 'भलामाणूस' आता आपल्यापासून दूर गेलाय.
नावेच्या कारखान्याजवळ तुमचं घर आणि तेथेच माझी शाळा होती. (ती आताही आहे.) माझं घर थोडं लांबच होतं. त्यामुळे शाळेतून निकितासोबत तुमच्या घरी सतत येणं व्हायचं. तुमची धाकटी मुलगी निकिता आणि मी शाळेतल्या बेस्ट फ्रेंड्स. आमच्या दोघींमध्ये तुम्ही कधी भेदभाव केला नाही. निकितावर जेवढं प्रेम तेवढंच माझ्यावरही केलंत. माझ्या संकटाच्या काळात तुम्ही धाऊन आलात. काकी, सनी दा, निकिता आणि तुमचे ऋण कसे फेडायचे, हेच कळत नाही. आयुष्यभर मी त्या ऋणात असेन.
तुम्ही जंगलात शिकारीला जायचा, त्याचं मला खूप अप्रुफ वाटायचं. (तेव्हा शिकार करण्यावर बंदी नव्हती.) रानडुक्कराची शिकार तुम्ही केली होती, असं मी ऐकलं होतं. त्यामुळे औत्सुक्यापोटी मी निकिताला सांगितलं होतं की, बाबांना सांग ना, मला शिकार कशी केली ते सांगायला. शिकार कशाने केली असावी? याची मला खूप उत्सुकता होती. तुम्ही मला शिकारीची भली मोठी बंदूक आणि छरे दाखवले. मला पण बंदुक चालवता यावी, असं मला त्यावेळी वाटायचं. (तेव्हा मी नववीत) असेन. मग, मी तुमच्याकडे काका मला बंदूक शिकवा, असा आग्रह धरला. तुम्ही तयारही झाला. मग ठरलं की, शनिवारची सकाळची शाळा सुटल्यानंतर बंदूक शिकायला मी तुमच्याकडे यायचं. प्रत्येक आठवड्याला मी तुमच्या घरी यायची. हॉलमध्ये तुम्ही मला बंदुकीची माहिती सांगितल्यानंतर ती बंदूक घेऊन उभं करायचा. तासनतास ती बंदूक घेऊन न हालता हातात धरायची. बंदूक जड असल्याने ती मला आवराय नाही. त्यावेळी सनी दा चेष्टेने म्हणायचा, 'त्या बंदुकीच्या वजनाएवढी तरी आहेस का?' यावर तुम्ही हलकीशी स्माईल द्यायचा. परंतु, त्या स्माईलमध्येदेखील तुमची शिस्त दडली होती. बंदुकीच्या माशीकडे लक्ष्य देऊन तासन्तास बंदूक हातात घेऊन प्रॅक्टिस करायची, निशाणा लावताना अजिबात जागेवरून हलायचं नाही, असा प्रेमळ दम तुम्ही द्यायचा.
काका तुमची आणि माझी फार कमी भेट झाली. माझी दहावीची शाळा पूर्ण झाल्यानंतर मी वेगळ्या कॉलेजात ॲडमिशन घेतलं. त्यामुळे तुमची, निकिताची फारशी भेट होऊ शकली नाही. फार कमी वेळा मी तुमच्या घरी आले असेन. मला आठवतं की, ज्या-ज्या वेळी तुमच्याकडे आले, त्यावेळी तुम्ही बाहेर असायचा. त्यामुळे तुम्हाला भेटायचं राहूनचं गेलं.
ही गोड आठवण माझ्या कायमची लक्षात राहील. म्हणून तुमच्याविषयी लिहिण्याचा हा शब्दप्रपंच होता.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला सोडून जाण्यापूर्वी मला सतत वाटायचं की, एकदा तरी तुमच्या घरी जाऊन यांव. दोन-तीन महिने मनामध्ये असं येतं राहिल. परंतु, तुमच्याकडे येणं झालं नाही. नंतर ही गोष्ट मी पूनम (माझी व निकिताची शाळेतील मैत्रीण) तिला बोलून दाखवली. मी तुम्हाला भेटू शकले नाही, ही गोष्ट अजूनही माझ्या मनात सलते.
परमेश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो. आपल्या परिवारास दु:खातून सावरण्याची ताकद देवो.

No comments:
Post a Comment