Wednesday, May 6, 2020

जेव्हा 'तिने' आपले दोन्ही स्तन कापले अन्...



संग्रहित छायाचित्र 

मुलाकरम (ब्रेस्ट टॅक्स) 

सोळाव्या सतराव्या शतकात केरळमध्ये अनेक कर द्यावे लागत होते. यापैकी एक जाचक कर होता-मुलाकरम. केरळमधील त्रावणकोर येथे क्षुद्र जातीतील स्त्रियांना त्यांची स्तन झाकण्यास परवानगी नव्हती. स्तन झाकायचे झाल्यास त्यांना 'ब्रेस्ट टॅक्स' म्हणून 'कर' द्यावा लागत असे. तेथील स्थानीय भाषेत त्याला 'मुलाकरम' असे म्हणत असत. 

खालच्या जातीतील स्त्रियांना हा कर परवडणारा नव्हता. त्यामुळे तेथील स्त्रिया आपले स्तन उघडे ठेवत असत. अनेकांच्या भेदक नजरा त्यांच्या स्तनाकडे लागलेल्या असायच्या. परंतु, कुणालाही जाब विचारण्याची हिंमत झालेली नव्हती. पाण्याला जाताना, लाकडे आणायला जाताना किंवा घरची कामे करतानाही पुरूषांच्या नजरा त्या बाईवर पडायच्या. परंतु, महिलांना ते निमुटपणे सहन करावं लागायचं. यापेक्षा वाईट म्हणजे, जर तिने हा नियम मोडला, म्हणजेच क्षुद्र जातीतील स्त्रीने आपले स्तन झाकले तर तिला आपल्या स्तनाच्या वजनाएवढा कर द्यावा लागायचा. इतकेच नाही तर कर गोळा करणारा ते स्तन हातात घेऊन वजन करायचा आणि किती कर द्यावा लागेल, हे सांगायचा. ही कल्पनादेखील किती भयावह वाटते. परंतु, त्याकाळी त्या महिलांना किती सहन करावं लागलं असेल. 

जातीभेदाच्या चौकटीत त्या महिला हे सर्व डोळे झाकून सहन करत राहिल्या. त्याकाळी जाती-धर्माचा इतका पगडा होता की, खालच्या जातीला निमूटपणे सर्व सहन करावं लागायचं. पण, एक रणरागिनी निघाली, जिने या स्तन कराविरोधात आवाज उठवला. 'नांगेली' असं तिचं नाव. नांगेलीला या उच्च-नीच समाजव्यवस्थेचा प्रचंड राग यायचा. विषमतेच्या जोखडाखाली दबलेल्या स्त्रियांवर लावलेले नियम, कायदे तिला मोडीत काढायचे होते. 

अमानुषपणे महिलांवर होत असलेला अत्याचारांविरोधात तिला आवाज उठवायचा होता. अनेकदा तशी आपली तळमळ तिने बोलून दाखवली होती. परंतु, स्तन कराविरोधात आवाज उठवण्याचं धाडस कुणी केलं नाही. समाजव्यवस्थेने क्षुद्र जातीतील स्त्रियांवर लादलेल्या कराविरोधात तिने बंड पुकारण्याचा निश्चय केला. ती आपले स्तन झाकूनच बाहेर पडली. कर गोळा करणाऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. तिने आपले स्तन का झाकले? याचा जाब नांगेलीला विचारण्यात आला. या प्रश्नावर नांगेलीच्या डोळ्यात निखाऱ्यासारखे रक्त साचले होते. तिने मुलाकरम ही देणार नाही आणि स्तनही झाकणार, असं थेट उत्तर देऊन कर गोळा करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. तिच्या विद्रोही विचारांनी समोरची मंडळी प्रचंड घाबरली. परंतु, तिने हार न मानता आपला निश्चय सोडला नाही आणि त्यांच्या धमक्यांनाही घाबरली नाही. 

क्षुद्र जातीतील एका स्त्रीने विषमतावादी व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. ते व्यवस्थेच्या पचनी पडणार नव्हतं. नावेलीने ही प्रथा बंद करण्यासाठी आपल्या पतीला बोलून दाखवली होती. तिचा पती नावेलीवर खूप प्रेम करायचा. त्याने आपल्या पत्नीला साथ दिली.

अखेर कर घेणारा नावेलीच्या घरी पोहोचला. तिच्या स्तनाची तपासणी केली. तिला हा सर्व प्रकार असह्य वाटत होता.  

तिला पाहताच कर घेणारी मंडळी संतापली आणि तिच्याकडे मुलाकरम मागू लागले. तिला तिच्या स्तनाच्या वजनाएवढे मुलाकरम द्यायचे होते. नांगेलीने क्षणाचाही विचार न करता थेट आपल्या घरामध्ये गेली आणि त्यांना बाहेरच थांबण्यास सांगितलं. ती आपल्या दोन्ही हातातून मुलाकरम घेऊन आली. परंतु, जेव्हा नांगेलीला बाहेर थांबलेल्या लोकांनी पाहिलं, तेव्हा त्यांना घाम फुटला होता. त्यांना काय करावं सुचलं नाही. कारण, समोर जे दृश्य होतं, ते भयावह आणि मन हेलावून टाकणार होतं. नांगेलीच्या हातात असणाऱ्या केळीच्या पानावर दोन स्तन होते. तिने आपले स्वत:चे स्तन कापून त्या पानावर ठेवले होते आणि 'मुलाकरम' म्हणून तिने ते समोरच्या लोकांसमोर सादर केले होते. अतिरक्तस्रावाने नांगेलीचा जागीच मृत्यू झाला होता. रक्ताच्या थोरोळ्यात पडलेल्या नांगेलीला पाहून तेथील लोकांनी धूम ठोकली. 

अमानवीय कायदा मोडणारी नांगेली खऱ्या अर्थाने थेट समाजाशी भिडणारी योध्दाव् (रणरागिनी) ठरली. 


('योध्दाव्' हा मल्याळम भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ रणरागिनी असा होतो.) 

No comments:

Post a Comment