Friday, July 23, 2021

पूर ...आणि 'तो' अनुभव मी कधीच विसरणार नाही

 


संध्याकाळी साडे चारची वेळ होती. दिनांक 23 जुलै 2021. मी आणि माझी  सहकारीं दोघी रंकाळा जवळ गेलो. तिथे आम्ही रंकाळा ओव्हरफ्लो झाला आहे असा आम्हाला कळाल्यावर ते पाहण्यासाठी गेलो. तसं पाहिलं तर आम्ही गर्दी करायला गेलो नव्हतो.  पण आम्ही प्रसारमाध्यमाची माणसं. त्यामुळे आमच्यातला पत्रकार गप्प बसत नव्हता. आम्ही तेथे शुटींग करायचं ठरवलं. पुरामुळे रंकाळा पूर्ण काठोकाठ भरलेला होता. रंकाळ्याचे पाणी काठाबाहेर पडत होते.

 कोल्हापूरकर तसे उत्साहात तिथे जमलेले होते. रंकाळ यातून बाहेर पडणार पाणी पाहण्यासाठी तिथे प्रचंड गर्दी झाली होती. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत एकच गर्दी रंकाळा टॉवर जवळ झालेली दिसली. तर मोठ्या प्रमाणावर तरुण देखील समुहा समूहाने तेथे येत होते.  अगदी मोठ्या आणि टू व्हिलर गाड्या देखील रस्त्यावर उभ्या होत्या. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आणि वाहनांची एकच रांग लागली.

2005 ला असा रंकाळा ओवरफ्लो झाला होता. त्याची पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली. मी आणि माझी मैत्रीण धनश्री आम्हा दोघींना देखील फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. पण तो मोह क्षणिक होता.

कारण कोल्हापूर, सातारा,  कोकण, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराचे थैमान पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मन सुन्न झाले होते. ते आत्ताही आहे. एक प्रकारचे नैराश्य आले आहे. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे गल्लोगल्ली उपनगर चौका-चौकात आणि पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांनी आपले संसार कसेबसे दुसरीकडे हलवले आहेत. या पुराच्या पाण्याच्या मागे प्रशासनही हतबल झाले आहे. कारण आजचा चौथा पाचवा दिवस संततधार सुरूच आहे. पाऊस थांबण्याचे काही नाव घेईना.

एकीकडे गेली दोन वर्षे कोरुना ने सगळ्यांना जगूच दिलं नाही. आणि आत्ता या वर्षी म्हणजे 2021 ला पुन्हा  पुराने थैमान घातले आहे. निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही. तर तिथे माणूस तरी काय करणार. 2021 ची विदारक परिस्थिती पाहिली तर आपण खूपच मागे चाललो आहोत असं वाटतं. कारण कोरोनामुळे एक तर लोकडाउन झालं. आपल्याकडे असलेली पुंजी लोकांनी या काळात वापरली. कारण अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होतं. सर्व व्यवसाय ठप्प होते. अनेकांची परिस्थिती घरात खाण्यासाठी दाणा देखील उरला नाही अशी झाली होती.

काही दिवसापूर्वी प्रशासनाने सर्वांना सूट दिली आणि सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने


उघडी ठेवण्यास परवानगी दिली. याला काही दिवस उलटत नाहीत तोपर्यंत पुराने आपला रंग दाखवण्यास सुरुवात केलं.

गल्लोगल्ली चौकाचौकात नगरात नगरात उपनगरात आणि नदीकाठी वसलेली शहरे वस्ती आणि गावांमध्ये देखील सगळीकडे पाणीच पाणी झाले. सर्व मार्ग बंद झाले वाहतूक ठप्प झाली. गावागावांचा संपर्क तुटला. वीज नाही पाणी नाही अशी बिकट अवस्था झाली. एकीकडे वाढतं पाणी आणि दुसरीकडे संततधार. आभाळ फाटल्यासारखं पाऊस पडतोय. काही दिवसांपूर्वी ढगफुटीचा इशारा अशी बातमी आली आणि ती खरी ठरली. आम्ही कोल्हापूरकर आणि ती आखोदेखी पाहिलं.

पण मनात एकच भावना आहे. ती भावना म्हणजे भीतीची. कारण पाऊस जर थांबला नाही तर सगळीकडे हाहाकार माजेल. लोकांचं जगणं कठीण होऊन जाईल. आधीच बिकट परिस्थिती झालेली आहे. सगळे लोक हतबल झालेले आहेत. आणि त्यात जर पाऊस नाही थांबला तर निसर्गाचे रौद्र रूप खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. पण परमेश्वराकडे आमची एकच प्रार्थना आहे. हे परमेश्वरा, सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

लोकांना राहायला देखील जागा उरलेली नाही. सर्व घराघरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. सर्व दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे अगदी रुग्णालयात शुद्ध पाणी गेलेलं आहे. अशा परिस्थितीत कुठे जावं तुझ्या लेकरांनी. तूच कर्ता आणि तूच धर्ता आहेस. तूच मारणारा आणि तूच तारणारा आहेस. परमेश्वरा हे निसर्गाचे तांडव थांबव. आणि तुझ्या लेकरांना शांतपणे जगू दे. तुझी लेकरं एका मागोमाग संकटांचा सामना करत आहेत. तू त्यांना संकटांचा सामना करायला ताकत तर दिलीस मात्र, ती पुरती आतून खचून गेली आहेत.

 असाच पाऊस सुरू राहिला तर खाणार काय, व्यवसाय काय करणार,  मुलाबाळांचं कसं होणार, कुठे जाणार, कुठे राहणार... हे असे असंख्य प्रश्न मनामध्ये येऊन ठेपले आहेत.

कोणाला काही कोणताच मार्ग दिसेना. सर्व अंधार अंधार दिसतो आहे. ईश्वरा कुठेतरी प्रकाशाचा मार्ग दाखव. जगण्याची आस लागून राहू दे. आणि आम्हाला आमच्या मुलांमध्ये राहू दे. तू तुझ्या लेकरांना सांभाळून घे. आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर.कारण, तुझ्या लेकरा मध्ये आता फारशी ताकद उरलेली नाहीये.

इतक्या सर्व संकटांचा सामना ते करू शकत नाही. कारण निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही. आताच्या आलेल्या परिस्थितीशी हतबल होऊन न जाता त्यांना या संकटाशी दोन हात करायची शक्ती दे, ताकद दे. इतकीच तुझ्याकडे प्रार्थना परमेश्वरा!!!

आणि त्या चिमुकलीच्या हाताला मी धरून नेलं....

ओव्हरफ्लो रंकाळा पाहून घरी येताना साकोली कॉर्नर पाण्याने पूर्ण खचाखच भरला होता. साकोली मार्गावरून चार रस्ते जात होते. एक रंकाळ्याला जाणारा मार्ग होता दुसरा उभा मारुती चौकात कडे जाणारा मार्ग होता तिसरा महाद्वार रोड कडे जाणारा मार्ग होता आणि चौथा रंकाळा स्टॅन्ड कडे जाणारा मार्ग होता.

माझ्या मैत्रिणीने उभा मारुती चौकात मला सोडले आणि ती सानेगुरुजी वसाहतीच्या दिशेने निघून गेली. मला घरी जायचं होतं म्हणून मी उभा मारुती चौकात तुम्ही थेट साखळी करणार कडे येत होते. अगदी मोठी घसरण असताना देखील वरून प्रचंड पाणी पायात येत होतं. कशीबशी मी वाट काढत उभा मारुती चौकातून साकोली कोणाकडे येण्याचं ठरवलं. पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं ते जसे मी पुढे जाईन तसे माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं.

गुडघाभर पाण्यात चालत चालत असताना एक चिमुकली असेल सहा-सात वर्षांची ती छत्री घेऊन उभी असलेली मला दिसली. बिचारी छत्री घेऊन पाण्यातच उभी होती आणि तिला काही सुचत नव्हतं की कुठे जावं. कारण चारी बाजूने पाणी होतं आणि मी ही तिथेच होते. पाठीवरची सॅक सांभाळत एका हातात छत्री घेत आणि स्वतःचा तोल सांभाळत मी त्या पाण्यातून वाट काढत होते. ती मुलगी मला पाण्यामध्ये इकडे तिकडे पाहताना सैरभैर झालेली दिसली.

ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती पण पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की चालणं देखील कठीण झालं होतं. मी तिला विचारलं की तू कुठे जाणार आहेस तर तिने daash असं नाव सांगितलं. बहुदा ते तिथल्या मंडळाचे नाव असावं. असं गृहीत धरून मी तिला माझ्या हाताला धरायला सांगितलं. तिने माझा हात गच्च आवळून धरला. मीदेखील थोडीशी घाबरलेले होते आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून गुडघाभर पाण्यातून वाट कशी काढायची या विचारांमध्ये तिला मी नाव विचारायचच राहुन गेलं. फक्त तिला तू कुठे राहतेस असं सांगितल्यानंतर तिने ध्यास ग्रुप असा पत्ता सांगितला.

हाताशी घट्ट धरून मी आणि ती गुडघाभर पाण्यात पाय वाट काढत काढत वाहनांना जागा देत अगदी सुरक्षितपणे चालत होतो. तिलापण सांभाळण्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे माझ्यावरच होती. कारण मी ठरवलेलं काही झालं तरी पाण्यामध्ये पडायचं नाही. किंवा स्वतःचा तोल जाऊ द्यायचा नाही. आणि त्या मुलीला देखील मी घट्ट धरलं आणि साकोली कॉर्नर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

उभा मारूती चौक ते साकोली कॉर्नर अशी जी गल्ली होत,  त्याला घसरण होती. त्यामुळे वरून येणारे सर्व पाणी आमच्या पाणी पायामध्ये साचत होतं. पाण्याचा प्रवाह देखील अधिक होता. कधी कधी अशी भीती वाटायची की आपण यातून वाहून जाऊ की काय? पण परमेश्वराच्या कृपेने आम्ही सुरक्षित राहिलो.

 मला जायचं होतं रंकाळा स्टॅन्डकडे  आणि तिला जायचं होतं... रंकाळ्याकडे जाणारी एक वाट आहे त्या दरम्यान असलेल्या डॅश ग्रुप या ठिकाणी. लोक आपापल्या मार्गाने जात होत.  काही लोकं घाबरून गेली होती. कारण अचानक आलेले पायामध्ये पाणी पाहून कुठे जावं कुणाला काहीच कळत नव्हतं.

त्यात एक व्यक्ती मला ग्रुपच्या मार्गाने जाताना दिसला आणि मी त्यांना काका अशी हाक देऊन विनंती केली की या मुलीला डॅश ग्रुपपर्यंत सोडा. खूप पाणी वाढण्याअगोदर तिला सुरक्षित तिच्या घरी जायचं होतं आणि मला देखील माझ्या घरी यायचं होतं. अखेर तिच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि मी माझ्या घरच्या दिशेने. मला आनंद झाला की आपण तिला सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर आणलं आणि आपणही सुरक्षित राहिलो. त्यावेळी मी परमेश्वराचे आभार मानले. कारण आणखी थोडा वेळ तिथे थांबलो असतो तर पाणी वाढण्याची जास्त शक्यता असती आणि मी तिथेच अडकून पडले असते. त्यावेळचा अनुभव कथन करणं खूप कठीण. पण जो अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे, तो कधीच मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही....

Friday, March 12, 2021

शिरोड्याला जाताय? मग, तुम्ही न पाहिलेल्या 'या' ठिकाणांना भेट नक्की द्या


गोवा पाहून कंटाळा आलाय? तर मग शिरोड्याला जा!. तुम्ही म्हणाल, आम्ही शिरोड्यालादेखील जाऊन आलोय. पण, शिरोड्याला पुन्हा एकदा जा, असं आम्ही आपल्याला सूचवू. कारण, शिरोडा बीचशिवाय, या परिसरातील काही अन्य स्थळे पाहण्यासारखी आहेत. कदाचित ही स्थळे तुम्ही कदाचित पाहिली नसतील. ती कोणकोणती स्थळे आहेत आणि तेथे कसे जाता येते, याविषयीची माहिती आम्ही येथे देत आहोत. 

शिरोडा हे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील एक ठिकाण आहे. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव असून सुंदर समुद्रकिनारा लाभलेले प्रेक्षणीय स्थळ आहे. बीचवर किंवा समुद्री किनारी जायचं म्हटलं की, किती उत्साह असतो आपला! मासे, वडा कोंबडा, सी-फूड, घावण, सोलकडी विथ चिकण....मस्तचं...खायला मिळणार. मग, बोटींग, पॅराग्लायडींग करत समुद्राची सफारी त्याशिवाय खळखळत्या समुद्राच्या लाटांवर पोहायचं!...किती किती त्या इच्छा. समुद्राबरोबरचं जर तुम्हाला आणखी काही प्रेक्षणीय ठिकाणं पाहायला मिळाली तर? मग चला तर जेव्हा तुम्ही शिरोडा बीचवर जा, तेथून अगदी जवळ काही अंतरावर अनेक सुंदर ठिकाणं आहत, जे तुम्हाला पाहता येतील. फार वेळ आणि पैसाही खर्चिक होणार नाही. पण, विलोभनीय आणि आकर्षक अशी ही स्थळ तुम्हाला शिरोड्यात गेल्यानंतर पाहता येतील आणि त्याचा मनमुराद आनंद लुटता येईल.   

शिरोडा बीच : 

येथे समुद्रकिनारी राहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. छोट्या - छोट्या खोल्या किंवा लाकडाची घरं तेही समुद्रासमोर तसेच आजूबाजूच्या परिसरात राहायला हॉटेल्स, रेस्टाॅरंटचीही व्यवस्था आहे. त्यामुळे राहण्याचा, जेवण खाण्याचाही प्रश्न मिटतो. सायंकाळी सूर्यास्त होताना आकाशी पसरलेली सूर्यकिरणे, लाल-केशरी-पिवळ्या रंगछटा आणि मंद वारं ही निसर्गाची उधळण तुम्ही अनुभवायला हवी. त्याचबरोबर येथे समुद्र सफारीही करता येते. बोटीतून समुद्रात जाणे आणि पॅराग्लायडिंगचा येथे अनुभवही येथे घेता येतो. हे फार खर्चिक नसून आपल्याला परवडण्यासारखे आहे.

रेडीचा गणपती :

रेडी गणेश मंदिर हे रेडी बंदराजवळच आहे. रेडी गावातील लोह खनिजाच्या खाणीत १८ एप्रिल, १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मूर्ती सापडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हे प्रसिध्द ठिकाण. उंच उंच माडाची झाडे, निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं हे रेडीचा गणेश मंदिर. जागृत देवस्थान अशी ख्याती असल्याने भाविकांचा मोठा ओघ येथे येत असतो. या मंदिरात गणेशाची सुंदर, मनमोहक मूर्ती पाहायला मिळते. शिवाय रेडीचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर आहे. 

येथे मॅगनीजच्या खाणीही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे लाल मातीचे डोंगर, लाल मातीचे कच्चे रस्ते, नारळ आणि पोफळीच्या बागा आणि यातून वाट काढत गेल्यानंतर रेडी गावात सागरकिनार्‍यालगत यशवंतगड किल्ला मोठ्या डौलाने उभा आहे. अनेक पर्यटकांना माहिती नसतं की, रेडीच्या गणपतीचे दर्शन घेऊन तुम्ही थेट यशवंतगड किल्ल्याला जाऊ शकता. त्याचबरोबर पणजी येथून जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी थोडं फिरायचे असल्यास शिरोड्यातून तुम्ही गोव्यात कमी वेळेत पोहोचू शकता.    

यशवंतगड किल्ला : 

मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर जवळपास २ -३ कि.मी अंतरावर यशवंतगड हा किल्ला समोर दिसतो. अगदी छोट्या छोट्या वाटेतून समुद्रालगत असणाऱ्या गिरिदुर्ग प्रकारातील या किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. तसेच चारचाकीदेखील किल्ल्यापर्यंत जाते. येथे पार्किंगसाठी थोडी जागा देखील आहे. महत्त्वाचं म्हणजे हा किल्ला वर चढावा लागत नाही किंवा दमछाक होत नाही. त्यामुळे अगदी लहानांपासून वृध्दापर्यंत हा किल्ला तुम्हाला पाहता येतो. सुरुवातीला एन्ट्री केल्यानंतर टेहळणी बुरूज आणि काही पायऱ्यांशिवाय येथे काहीचं नाही, असं वाटतं. पण, थोडं लांब पाहिलं की, एक मोठं मैदान दिसतं. या मैदानावर मोठ्या प्रमाणात झाडंझुडपं असल्याने पलिकडचा महत्त्वाचा किल्ला दिसत नाही. झाडंझुडपं असले तरी किल्ल्यावर जायला मुख्य रस्ता आहे.  

हा किल्ला लवकर निदर्शनास पडत नाही. कारण आतील परिसर झाडाझुडपांनी वेढलेला आहे. किल्ल्याच्या बाजूंनी खंदक खोदलेले आहे. पण, तटदरवाज्यातून आत गेल्यानंतर बालेकिल्ला लागतो. सुरूवातीला केवळ किल्ल्याचे अवशेष दिसणारे आत गेल्यानंतर लाल रंगाचा किल्ला लक्ष वेधून घेतो. येथे वाड्याचे अवशेषही आहेत. परंतु, पाण्याचा साठा कुठे दिसत नाही.. शिवाय एक छोटे मंदिरदेखील आहे. हा किल्ला रेडीचा यशवंतगड म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पाहण्यासारखा आहे. आतून किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. आपण, याआधी एखाद्या किल्ल्यावर इतकी मोठी जागा कधीही पाहिली नसेल, अशी रचना येथील आहे. येथे  इ. स. १६३२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याला ‘यशवंतगड’ असे नाव दिल्याची इतिहासात नोंद सापडते. 

तेरेखोल किल्ला - 

तेरेखोल किल्ला हा गोवा राज्यातील एक किल्ला आहे. पण, तो शिरोड्यापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवरील या किल्ल्याचे रुपांतर हेरिटेज रिसॉर्टमध्ये केले गेले आहे. त्यामुळे किल्ल्याचे संवर्धन झाले आहे. किल्ल्यावर हॉटेल जरी झाले असले तरी पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी हॉटेलमध्ये जाता येते. तटबंदी दुरुस्त करून येथे रंगरंगोटी करण्यात आली आहे. किल्ल्यामध्ये सेंट अँथोनी चर्च सुस्थितीत आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. 


त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यानंतर मराठे आणि नंतर पुन्हा पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. किल्ल्याच्या तटबंदीवरुन तेरेखोलच्या खाडीचे आणि पलीकडे असणाऱ्या गोव्याच्या माडबनांचे विहंगम दृश्य दिसते. 

याशिवाय सिध्देश्वर मंदिर, सोनुर्ली मंदिर, तसेच सागरतीर्थ बीच, आरवली बीच ही ठिकाणेदेखील पाहता येतील. 

कसे जाल : 

शिरोडा : सावंतवाडीतून शिरोडा गावात जाता येते.

रेडीचा गणपती : रेडीला येण्यासाठी वेंगुर्ल्याहून बसची सोय आहे. तसेच मालवणमधून रेडीपर्यंतही जाता येते. 

यशवंतगड : रेडी गावातून तीन-चार किलोमीटर अंतरावर यशवंतगड आहे. रेडी गावातून थेट गाडीदेखील गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. 

तेरेखोल किल्ला : तेरेखोलला जाण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून दोन मार्ग आहेत. महाराष्ट्रातून जाताना वेंगुर्ले, रेडी मार्गे तेरेखोलला पोहोचता येते. गोव्यातून येताना पणजी, हरमल, केरी मार्गे यावे लागते.