Thursday, May 7, 2020

मृत्यूने इरफानशी दगाबाजी केली!



चेहऱ्यावर फारसे हावभाव दिसत नसले तरी शब्दफेक, जबरदस्त संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार विजेता इरफान खानने मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात आज (ता.२९) अखेरचा श्वास घेतला. 

'कधी-कधी तुम्‍ही जगता. आणि कधी तुम्‍हाला वाटते की, तुमचं आयुष्‍य पूर्णपणे ढासळलेलं आहे. गेल्‍या १५ दिवसांत आयुष्‍य अनिश्चित असल्‍याचं जाणवत आहे. मला अंदाजदेखील नव्‍हता की दुर्मिळ कथांच्‍या शोधात मला दुर्मिळ आजार मिळेल. पण, मी कधी आशा सोडलेली नाही. मी संघर्ष करेन.' हे ट्विट इरफान खानने लंडनमध्ये उपचार घेताना केलं होतं. 

खरंच, आयुष्य किती संघर्षमय आणि खडतर आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आयुष्याची घडी बसवताना चढ-उतार इरफानने सहन केले. त्याला झालेल्या दुर्मिळ आजारावर मात करण्यासाठी जगभरातील चाहत्यांनी प्रार्थना, दुआ केल्या. परंतु, मरण त्याच्याच नशीबी का यावं? जगण्याची इच्छा असताना आणि आपण या आजारातून लवकरच मुक्त होऊ अशी आशा असताना मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला. कलाकारांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण अधिक आहे. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. विनोद खन्ना, फिरोज खान, सोनाली बेंद्रे अशा असंख्य कलाकारांना कॅन्सर झाला. काहींनी त्यावर मात केली, तर काही जण दगावले. यापैकी आणखी एक इरफान खान. 

इरफान खानला जेव्हा न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर असल्याचे समजले, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. परंतु, खचून न जाता त्याने कॅन्सरशी लढा देण्याचे ठरवले. २०१८ मध्ये यावर उपचार घेण्यासाठी तो लंडनला गेला. तेथूनच तो आपल्या चाहत्यांसाठी आपल्या आरोग्याचे अपडेट देऊ लागला. त्याला कॅन्सर झाल्याची माहिती त्याच्या जवळच्या एका मित्राकडून समजली होती. लंडनला कॅन्सरवरील उपचार घेतल्यानंतर त्याने कॅन्सरवर मात करण्यासाठी खूप संघर्ष केला. आजारपणातही त्याला आपल्या कुटुंबाचं आणि मित्र मंडळींचं त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांची काळजी असायची. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सर्वांच्या संपर्कात असायचा.  
Irrfan Khan Age, Death, Wife, Children, Family, Biography & More ...

उपचारादरम्यान, इरफानच्या जीवाला काही धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्याच्या असंख्य चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. कारण त्याला झालेल्या ट्युमरवर उपचार करता येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. परंतु, नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. 

आजारपणातही त्याच्या डोक्यात चित्रपटांचाच विचार सुरू होता. इमरान स्‍वत:ला चित्रपटांपासून दूर ठेवू शकत 
नव्हता. आपल्या आगामी चित्रपटाची त्याला आस लागून राहिली होती. अखेर तेथून त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक ट्विट करून आपल्या येणाऱ्या चित्रपटाबद्दलची माहिती दिली. त्याने ट्विटमध्ये लिहिलं की-'चित्रपट कांरवासाठी सलमान दुलकर आणि मिथिला पालकरचे आभार. दोन कारवां... एक मी आणि एक माझा चित्रपट.' 

कांरवा हा चित्रपट ३ ऑगस्ट, २०१८ रोजी रिलीज झाला.  

एकामागून एक असे ट्विट करत इरफान आपले विचार मांडायचा. कधी कधी भावूक होऊन ट्विट करायचा. आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायचा. असेच आणखी एक ट्विट केले होते आणि आपल्या आयुष्याची गणिते मांडताना जगण्याच्या वळणावर किती अडचणी येताहेत आणि या कठीण समयी संकटातून कसं बाहेर पडायचं आहे, याबद्दल लिहिले होते. 

इरफान खानने एका ट्‍विटमध्ये म्हटलं होतं- 'जे आपणांस हवं आहे, आयुष्‍यात तेच मिळेल असे नाही. गेले काही दिवस माझ्याबरोबर असेच काहीसे घडत आहे. आता समजलयं की, मला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर आहे. याला सामोरे जाणं खूप कठीण आहे. पण, माझ्‍याकडे चाहत्‍यांचं प्रेम आणि पाठिंबा आहे, त्‍यामुळे मी यातून बाहेर पडेन, अशी आशा आहे. यासाठी मला देशाबाहेर जावं लागणार आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्‍यासाठी प्रार्थना, दुआ करा. मला आणखी एक सांगायचं आहे की, नेहमीच न्‍यूरोचा अर्थ ब्रेन असा होत नाही. तुम्‍ही गुगलवर शोधा. ज्‍या लोकांना माझ्‍या ट्‍विटची प्रतीक्षा होती, त्‍यांना मी सांगत राहीन.' 'जे आपणांस हवं आहे, आयुष्‍यात तेच मिळेल असे नाही,' असं जे ट्विट त्याने केलं यातून त्याला एक चांगलं आयुष्य हवं होतं. 
इरफान खान लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर इरफान भारतात परतला होता. त्याने चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' चे शूटिंगदेखील केले. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. या चित्रपटामध्ये इरफान खानसोबत राधिका मदान आणि करीना कपूरदेखील होती. परंतु, कुणाला असं वाटलंदेखील नसावं की, त्याचा हा शेवटचा चित्रपट ठरेल. दुर्दैवाने त्याने केवळ आयुष्याची हाफ सेन्च्युरी पाहिली. 

पिकू, पानसिंह तोमर, द वारियर, मकबूल, हासिल, द नेमसेक, रोग यासारख्या ३० हून अधिक बॉलिवूड चित्रपट आणि ए मायटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेजिंग स्पायडर मॅन यांसारख्या हॉलिवूडपटांतून इरफान तू नेहमीच लक्षात राहशील.

No comments:

Post a Comment