२०१९ ला ठरवलं होतं की, पंढरीच्या वारीला जायचं. तोपर्यंत कोरोनाचा हाहाकार झाला आणि अख्खा देश भिंतीच्या आत लॉक झाला. वारीच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं. इतक्या वर्षांची सुप्त इच्छा असतानाही आपण जिल्ह्याशेजारच्या (कोल्हापूर) पंढरपूरला (सोलापूर) जाऊ शकले नाही, याची खंत मनात सलत राहिलीय. यावर्षी, पुढीलवर्षी करत २०२२ उजाडलं. तरीही अडचणी कमी व्हायची नाव घेईना. कोणत्या ना कोणत्या कारणावरून माझं वारी मार्गक्रमण थांबलं आहे. कधी आर्थिक अडचण तर कधी आरोग्याचं कारण, ही न ती असंख्य कारणे! पाऊलवाटांमधील पसरलेले काटे बाजूला सारत वारी अनुभवयाची आस चित्ती लागून राहिली आहे. विठुराया आणखी किती परीक्षा पाहणार आहे, कुणास ठाऊक. म्हणताता ना, त्याचं (विठुरायाचं) बोलावणं जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत मनमर्जीनं कुणीही त्याच्याकडे जाऊ शकत नाही, याची प्रचिती मात्र नक्की आलीय!
कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥
ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥
कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥
गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥
तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥
जनात कुठलेही दु:ख येऊ नयेत. अडचणी अशा सरकन दूर व्हाव्यात. कधी त्या विठुरायाच्या मार्गावर पायी चालत जाईन, असे अंतरी टोचत राहत आहे. उपाशी राहिले तरी चालेल. सकल जनांचा विचार करता करता पढंरपूरपर्यंत नक्कीच पोहोचेन, असा संकल्प ठायी धरूनचं मनात भाव घेऊन पंढरीला जाण्यासाठी मी उभी आहे.
जन विजन जालें आम्हां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥१॥
पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥
वन पट्टण एकभाव । अवघा ठाव सरता जाला ॥२॥
आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥३॥
धर्म, जात -पात कशाचेचं काही मला पडलेले नाही. समाज काय म्हणेल, नातेवाईक बोलतील, याकडं आधीच दुर्लक्ष केलेलं आहे. कुठलीही आशा-निराशा, उदासीनता, अपेक्षा, इच्छा, राग, लोभ कशाचा भाव ठायी नाहीये. माझं मन जसं प्रवाहित निर्जराप्रमाणे आहे, जे फक्त एकचं महत्त्वाकांक्षा मनी घेऊन फिरत आहे की, ''विठठ्ला, रुप तुझे एकदा तरी दाखव. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य एकदा तरी निरखू दे. अनेक भक्तांनी सांगितलं होतं की, तुझ्या चेहऱ्यावरील तेज अकालनीय आहे; सहजासहजी ते कुणालाही समजणारं नाही. तुझ्या चेहऱ्यावरील हास्य, भाव मनाला समाधान देणारं आहे, पणं या भावामागे काय दडलंय, हे कुण्या सामान्याला अजाणतं आहे. तुझ्या भक्तीत तल्लीन होऊन स्वत:ला समर्पण करावं आणि सगळ्या अगणित संकटांपासून मुक्त व्हावं, इतकाच काय तो मनी भाव.''
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
मानवजातीचा काय तो धर्म विठ्ठला तुझ्याकडून शिकावा. पाप काय आणि पुण्य काय? संसारात जगताना या गोष्टी घागर भरूनी वाहू लागल्या आहेत. कुठेतरी शांत चित्तेने तुझ्या जवळ यावं आणि अलगद पायी बसावं, अशी मनिषा मनी वसलीय. ''नको तो संसार, नको तो पैशांचा बाजार, नको पाप-पुण्य, नको लोभ-माया; तुझ्या चरणी परीस व्हावा, इतकीच काय ती अभिलाषा!''
तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम
देहधारी जो-जो त्यासी विहीत नित्यकर्म
सदाचार नीतीहुनी आगळा ना धर्म
तुला आठवावे, गावे, हाच एक नेम
