Tuesday, December 8, 2020

स्त्रीचं कौमार्य नेहमीचं अबाधित राहतं का?



मुलीने लग्नाआधी कौमार्य चाचणी दिलीचं पाहिजे, नाही तर समाज बहिष्कार टाकेल, वाळीत टाकेल म्हणून वर्षानुवर्षे कुप्रथा जपत जगणारे अनेक जण आहेत. परंतु, या प्रथेला विरोध करणारे तरुण सध्या पुढे सरसावले आहेत. असंख्य तरुणांपैकी एक आहेत, सामाजिक कार्यकर्ते विवेक तमायचिकर. कंजारभाट समाजातील तरुणांनाही आपल्या समाजात कौमार्य चाचणी किती घृणास्पद प्रकार आहे, हे लक्षात आलं आहे. म्हणूनचं कौमार्य चाचणी यासारख्या कुप्रथेविरोधात 'Stop The V Ritual' अभियान चालवले जात आहे. 



ताजचं उदाहरण द्यायचं झालं तर आज (दि. ८) पुण्यामध्ये एका ठिकाणी असाच लग्न सोहळा पार पडत आहे. धनंजय तमायचिकर आणि प्रियंका इंद्रेकर विवाहबंधनात अडकणार आहेत. मुलीच्या कौमार्य चाचणीविना हे लग्न पार पडत आहे. आता माणसांची याबद्दलची मानसिकता बदलत चाचलली आहे. मुलींची कौमार्य चाचणी करणार नाही, असे म्हणत अनेक जोडीदार लग्नाच्या बंधनात अडकलेत आणि तशी तयारीही त्यांनी दर्शवली आहे.  

कंजारभाट समाजातील प्रथांना विरोध करून जोडपं लग्नमंडपात लग्नासाठी उभं राहणार आहे का?, समाज आपल्याला वाळीत टाकेल, आपल्यावर बहिष्कार टाकेल, याची त्यांना भीती नसेल का? किंवा लग्नानंतर आपल्याला याचे काय परिणाम भोगावे लागतील? याचा विचार केला नसेल का? यांसारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे या कुप्रथेविरोधात उतरलेल्या तरुणांकडे आहे. 

कंजारभाट समाज 

कंजारभाट समाज मूळत: राजस्थानातील. या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी हा समाज विखुरलेला. हा समाज महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी वास्तव्यास दिसून येतो. 

कौमार्य चाचणी म्हणजे काय?     

आपल्याकडे कौमार्यबद्दल बोलणे म्हणजे लज्जास्पद. पण जेथे मुलीला लग्नाआधीच कौमार्य चाचणी द्यावी लागते, कंजारभाट समाजातील जात पंचायत जे सांगतील, ते निमूटपणे सहन करायचं. लांच्छनास्पद प्रकाराला सामोरं तर जायचंच, शिवाय जात पंचायतीतील ढिगभर माणसांच्या नजरा तिच्याकडे असतात. ती कौमार्य चाचणीत पास झाली की नापास हे उघडपणे त्यांना दाखवणं, हा एक लाजिरवाणा प्रकार होय. कौमार्य चाचणीवेळी पांढऱ्या रंगाच्या चादरीवर जर डाग पडला तर ती स्त्री व्यभिचारी नाही, ती पवित्र असते, असं मानलं जातं. हा प्रकार इथंचं थांबत नाही तर यासाठी मुलाला अर्धा तासांचा वेळ देऊन हा प्रकार करण्यास सांगितला जातो, शिवाय ती चादर दाराबाहेर उभारलेल्या मंडळींना पुरावा म्हणून आणून दाखवण्यासारखा प्रसंग घडतो. 

स्त्रीचं कौमार्य नेहमीचं अबाधित राहतं का? 

स्त्रीचं कौमार्य नेहमीचं अबाधित राहत नाही. कारण, ते इतर अनेक कारणांनीही जाऊ शकतं. जसं की, खेळणे, सायकलिंग वगैरे किंवा अनेकदा काही स्त्रियांना जन्मजातच 'तो' पडदा नसतो. पण, डोळ्यांवर पडदा झाकलेले हे लोक मान्य करत नाहीत. 

कौमार्य चाचणीला इतकं महत्त्व का दिलं जातं?

महाराष्ट्रात जातपंचायतीसमोर आपण पवित्र आहोत की नाही, कौमार्य चाचणी म्हणजे आपल्या घराची इभ्रत, अब्रू अशी संकुचित विचारांनी जोखडलेली ही प्रथा होय. 

एका समाजात किती बंधनं, नियम आणि प्रथा असू शकतात. या प्रथा कितपत सहन करायच्या? कुणी ना कुणी या विरोधात आवाज उठवेल, असे म्हणत असतानाचं कौमार्य चाचणीसारख्या अनिष्ट प्रथेविरोधात अनेक तरुणांबरोबर संघर्ष करायला विवेक तमायचिकर उतरले. 

काय आहे Stop v अभियान?

कौमार्य चाचणीशिवाय मुलीला शिवाय, जोडप्यांनाही स्वच्छंद, स्वातंत्र्यपणे, ताठमानेने जगण्याचं बळ या मोहिमेने मिळालं आहे. विवेक तमायचीकर यांच्यासारख्या तरुणांनी 'Stop The V Ritual' अभियान सुरू केलं आहे. परंतु, हे अभियान यशस्वी होऊ नये म्हणून समाजातील काही विकृतांनी  'Stop The V Ritual'  विरोधात स्त्रियांना पुढे केलं आणि या तरुणांवर विनयभंग, मानहानीसारखे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. तरीही या तरूणांनी हार मानली नाही. आपलं काम त्यांनी सातत्याने सुरू ठेवलं आहे. कंजारभाट समाजातील कौमार्य चाचणीची प्रथा संपुष्टात आणून या चाचणीविना तरुण-तरुणी एकमेकांचे साथीदार बनतील आणि ही अमानुष प्रथेला कायमचा आळा बसेल, असा अभियानामागील उद्देश होय.   

ही प्रथा मूळापासून उपटून टाकायची म्हणजे समाजातील लोकांमध्ये जागृती करणं खूपचं गरजेचं. वर्षानुवर्षे या प्रथेच्या जाळ्यात अडकलेल्यांची मानसिकता बदलण्याची खूप आवश्यकता आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी समाजात विवेक तमायचीकर यांच्यासारखे तरुण अविरतपणे कार्यरत आहेत. आपण जेव्हा बदलू तेव्हा समाजातील कुप्रसा, रुढी संपुष्टात येतील.



Wednesday, November 18, 2020

बाळासाहेब ठाकरे आणि आईचं जाणं असहनशील...!

एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जाणं आणि दुसरीकडे माझ्या आईचं जाणं या दोन्ही गोष्टी मला सहन झाल्या नव्हत्या. आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. १७ नोव्हेंबर, २०१२ ला बाळासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे, मी माझ्या आईचा मृत्यू माझ्या डोळ्यांनी पाहत होते. 

१७ नोव्हेंबरचा तो दिवस. माझी आई आजारीच होती. तिचे उठणे, बसणे, बोलणे सर्वकाही बंद झाले होते. तिला हाक मारली असता, केवळ 'हम्म' अशी प्रतिक्रिया ती द्यायची. तिला आम्ही आंघोळ घातली. हिरव्या मुगाची पेज खाऊ घातली. तो दिवस कसाबसा गेला. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब गेल्यानंतर सगळीकडे सन्नाटा होता. आम्ही कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेत राहत होतो. जरगांच्या घराशेजारी राहत असल्यामुळे गल्लीत आणि पेठेत तसं राजकीय वातावरण वेळोवेळी अनुभवायला मिळायचं. 

त्यादिवशीही सगऴीकडे भयाण शांतता वाटत होती. घरी आई आजारी असल्याने अस्वस्थ तर वाटत होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेचं १८ नोव्हेंबरला अख्खं कोल्हापूर बंद होतं. सगळ्या गाड्या, रिक्षा बंद होत्या. सकाळचे ११ वाजले असतील. आईने औषधाची उलटी केली. आम्हा दोघी बहिणींना काय करावं समजत नव्हतं. बाहेर तर एक रिक्षा नाही. आईने तर इकडे डोळे मिटलेले होते. रुग्णवाहिकेला फोन केला तर यायला अर्धा तास लागेल, असा निरोप आला. गल्लीमध्ये एकाची रिक्षा होती. त्याला विनंती केली की, डबल पैसे घे, पण माझ्या आईला तत्काळ दवाखान्यात घेऊन चल. पण, रिक्षावाल्याने नकार दिला. त्याचं कारणही तसं महत्त्वाचं नव्हतं किंवा त्याला कुठलीही अडचण नव्हती. लाचार होऊन रुग्णवाहिकेची वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. अशा गंभीर परिस्थितीत माणसं माणुसकी सोडून कशी काय वागू शकतात? असा प्रश्न मला पडला होता. आम्ही त्यांच्याजागी असतो तर जीवाची पर्वा न करता त्यांची अडचण सोडवली असती. असो. 


अखेर रुग्णवाहिका आली. आईला राजारामपुरीतल्या सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं. तोपर्यंत ती कोम्यात गेली होती. डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली होती. केवळ श्वास सुरू होता म्हणून डॉक्टरांनी तिला व्हेंटीलेटरवर ठेवलं होतं. पेशंटला घरी घेऊन जा, असे ते सांगत होते. परंतु, आईला घरी आणून तिचं मरण डोळ्यांनी पाहण्याइतपत माझी ताकद नव्हती. आपल्या डोळ्यांसमोर आईची मृत्यूसमयी होणारी तडफड मी कशी काय पाहू शकले असते? आता जरी तो विचार मनात आला तरी मन भरून येतं. 

अखेर ६ डिसेंबरला मध्यरात्री दिड वाजता माझ्या आईची प्राणज्योत मालवली. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्वर्गवास आणि १८ नोव्हेंबरला माझी आईला कोम्यात गेली. या घटनांना २०२० मध्ये ८ वर्षे झाली. त्यावेळी एकीकडे बाळासाहेबांचं जाणं आणि दुसरीकडे माझ्या आईने घेतलेला जगाचा निरोप, या दोन्ही गोष्टी सहन होणाऱ्या नव्हत्या. आठ वर्षांनंतर ते चित्र पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहिलं...! 

Monday, November 9, 2020

कोरोना काळातील बिहारची निवडणूक इतकी महत्त्वाची का?

बिहारच्या सतराव्या विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यांतील मतदान प्रक्रिया शनिवार दि. ७ रोजी पार पडली आहे. १० नोव्हेंबर निकाल लागणार आहे. कोरोना काळातील बिहारची निवडणूक इतकी महत्त्वाची का आहे? यासंदर्भात निवडणुकीचा थोडक्यात घेतलेला ऊहापोह.  

आरजेडी नेते लालुप्रसाद यादव यांनी आतापर्यंत बिहारमध्ये सामाजिक न्यायाचे राजकारण केले आहे. लालुप्रसाद यादव हे पहिल्या टप्प्यातील नेते होते आणि लालू यांनीच घडवलेले विद्यमान मुख्यमंत्री नितिशकुमार हे दुसऱ्या टप्प्यातील होते. हा टप्पा भाजपसाठी सर्वात अवघड होता. या टप्प्यावरती लालुप्रसाद यादवांचं जसं बिहारमधील वर्चस्व दूर करायचं होतं, तसं नितिशकुमारांनाही हटवणं गरजेचं होतं. ही निवडणूक नितिशकुमारांना पदावरून हटवणारी आहे, म्हणून भारतीय राजकारणात बिहार निवडणूक महत्त्वाची आहे. कारण, केवळ नितीशकुमारांनाच नाही तर सामाजिक न्याय संपुष्टात आणणारी ही निवडणूक आहे. लालू यांचा १५ वर्षांचा आणि नितिश यांचा १५ वर्षांचा असा जो तीस वर्षांचा कालावधीचा एक टप्पा होता, तो या निवडणुकीने संपणार आहे. बिहारमध्ये सामाजिक न्यायासाठी असलेल्या राजकारणावर मात करून आता आर्थिक न्यायाचे राजकारण प्रस्थापित करण्याचे प्रयत्न तेजस्वी यादव यांनी सुरू केलेत. लालुंचे सामाजिक न्यायाचे राजकारण यातून संपणार आहे. या निवडणुकीत भाजप सरकार आले नाही तरी ते जिंकले, असे सूत्र राहणार आहे. 

या विषयावर राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांनी 'पुढारी ऑनलाईन'शी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारच्या निवडणुकीत आर्थिक न्याय जिंकला म्हणजे भाजपचा विजय झाल्यासारखे आहे. म्हणून ही निवडणूक एका अर्थाने बिहारला सामाजिक न्यायातून बाहेर काढून आर्थिक न्यायाच्या एका नव्या चौकटीमध्ये प्रवेश करणारी ठरणार आहे. जाणीवपूर्वक घडलेली गोष्ट अशी आहे की, बिहारच्या राजकारणात जोपर्यंत नितिशकुमारांना बाहेर काढलं जात नाही, तोपर्यंत बिहारच्या राजकारणाची संरचनात्मक पुनर्रचना होत नव्हती, यासाठी हे पहिले पाऊल भाजपने उचलले. भाजपने एका बाजूला नितीशकुमारांबरोबर युती केली. परंतु, नितिशकुमारांना पूर्णपणे कसं हटवण्यात येईल, याचा प्लॅनदेखील आखला. या प्लॅननुसार, तेजस्वी यादवांना बहुमत जरी नाही मिळालं, तरीसुध्दा आता ते मुख्यमंत्री होणार नाहीत. फारतर त्यांना दिल्लीत पाठवलं जाईल आणि राज्यात भाजपचा वेगळा मुख्यमंत्री असेल. एका अर्थाने ही निवडणूक मोदींनी बिहारमध्ये भाजपचा शिरकाव करण्यासाठी उघडलेला दरवाजा आहे. यासाठी त्यांनी नियाजनपूर्वक आखलेले हे डावपेच आहेत. 

३० वर्षे राज्यात असणारे सामाजिक न्यायाचे राजकारण कुणालाही मोडता येत नव्हते. नितीशकुमारांनी तर थेट पंतप्रधानांना म्हटलं होतं की, ते पंतप्रधान पदासाठी उमेदवार होऊ शकतात. या सर्व पार्श्वभूमीवर विचार केला तर हे समजतं की, सामाजिक न्यायाची चौकट दूर करून आर्थिक न्यायाची चौकट या निवडणुकीने प्रस्थापित होईल. त्यामुळे हा राजकारणातील नवीन प्रयोग ठरणार आहे. 

खुद्द लालुप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव हे सामाजिक न्यायाविरोधात बोलत आहेत. ज्या लालुंनी सामाजिक न्याय आणला, त्याचं पॅटर्नचा पराभव ३१ वर्षांचे युवा तेजस्वी यादवांनी केला. हा मोठा ऐतिहासिक बदल आहे.

प्रकाश पवार यांच्या मतानुसार, पुढे २०-२५ वर्षे आर्थिक न्यायाच्या नव्या चौकटीत राजकारण करण्यामध्ये भाजप यशस्वी होईल, हा इतका मोठा बदल आहे. सामाजिक न्यायाचे नियम काढून तेथे आर्थिक न्यायाचे नियम आणले. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं सूत्र तेजस्वी यादव अबलंबत आहेत. म्हणजे एका अर्थाने तेजस्वी पंतप्रधान मोदींच्या 'सबका साथ, सबका विकास'प्रमाणेच बोलत आहेत. 

विरोधकांनी यादवांच्या घराण्यातलाच आताचा म्होरक्या तेजस्वी यांना माध्यम बनवून सामाजिक न्यायाची चौकट मोडित काढण्याचं आणि बिहारमधील राजकारण बदलण्याचं सूत्र वापरलं आहे. भारतीय इतिहासाला कलाटणी देणारा हा टर्निंग पाईंट आहे. सर्वात महत्त्वाचा खिलाडी नितीशकुमार बाजूला गेल्यामुळे यातील राजकारण आर्थिक न्यायावर चालेल. येथून पुढे सर्वांना सोबत घेऊन तेजस्वी यादव राजकारण करतील. 

तेजस्वी जर सत्तेत आले तर ते लालुप्रसाद किंवा नितीश कुमार यांच्याप्रमाणे ते बिहारच्या राजकारणात तडजोडीचं राजकारण करणार नाहीत. तेजस्वी यादव कुणाच्या विरोधात न जाता सर्वांना सोबत घेऊन जातील, त्यामुळे बिहारच्या राजकारणाची नवी पार्श्वभूमी येथे आता तयार झाली आहे. तेजस्वी यादवांचं उद्या काय होणार, बिहारच्या राजकारणाची समीकरणे कशी बदलतील, हे उद्याच्या निकालानंतर पाहणे औत्सुक्याचे ठरेल. 

Wednesday, July 1, 2020

कोरोनाच्या काळातलं वारीचं स्वप्न भंगलं...


                  नंदवाळ - विठ्ठल मंदिर

तुझें रुप वेळोवेळां । भरो माझ्या दोहीं डोळां ॥१॥

राम नाम वदो वाणी । हरिकथा पडो कानीं ॥२॥

पायीं तीर्थयात्रा घडो । देह संताघरीं पडो ॥३॥

हातीं घडो देवपूजा । सर्वकाळ गरुडध्वजा ॥४॥

तुका म्हणे देवा । घडो वैष्णवांची सेवा ॥५॥

जशी अनेकांची स्वप्ने भंगली. तसं माझंही एक स्पप्न भंगलं...कोरोनाच्या काळातलं. पण, माझं स्वप्न अजून जीवंत आहे. ते कधी ना कधी साकार होणारचं. तमाम महाराष्ट्रातल्या लोकांबरोबर आषाढी वारी माझ्याही जिव्हाळ्याचा विषय.

माझी आई आणि पंढरपूर 

पंढरपूर जगाच्या नकाशावर झळकलेलं ठिकाण. पंढरपुरातील चंद्रभागा नदी आणि या चंद्रभागेच्या तीरावर वसलेले विठ्ठलाचे पंढरपूर. मी लहान होते. पण, थोडं फार कळायचं. माझी आई तिच्या शाळेतील आठवणी सांगायची. तेव्हा ती सातवी इयत्तेत शिकत असताना त्यांच्या शाळेची सहल पंढरपूरला गेली होती. तिच्या तोंडूनच मी पहिल्यांदा 'चंद्रभागा' हे नाव ऐकलं होतं. पंढरपूरला सहलीसाठी गेली असताना तिने विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं. त्यामुळे त्यावेळी मलाही वाटायचं की, आपणही कधी तरी पंढरपूरला जावं. या आठवणी अजुनही मनात राहिल्या आहेत. यंदा वारीला जायचं, असं मागील वर्षी ठरवलं. पण, कोरोनाचं सावट वारीवरही आलं. त्यामुळे प्रतीक्षा करणं, इतकाच पर्याय उरला आहे.

पंजी आणि नंदवाळ 

जसं पंढरपुरात विठ्ठल तसं कोल्हापुरात नंदवाळचा विठ्ठल प्रसिध्द देवस्थान. नंदवाळची प्रती पंढरपूर अशी ओळख आहे. माझी पंजी म्हणजे माझ्या आईच्या वडिलांची आई. ती नंदवाळात जायची...बांगड्या विकायला. वाशी, पिराचीवाडी, नंदवाळ असं तिच्या व्यवसायाचे ठिकाण होतं. बांगड्या विकून तिने चांगला दोन मजली बंगला बांधला होता. तिच्या तोंडून अनेकदा नंदवाळचे नाव ऐकलं होते. नंदवाळकर तिला 'ढोली कासारीन' म्हणून ओळखायचे. तीदेखील गावातील आठवणी, गोष्टी आम्हाला सांगायची. त्यामुळे असं वाटायचं की, नंदवाळला आपण पायी जायचं. कालांतराने नंदवाळला जायचा योग आला. मनातील इच्छा पूर्ण झाली. नंदवाळ फाट्यापासून मी चालत गावामध्ये मंदिरापर्यंत गेले. भजन, टाळ मृदुंगाच्या गजरात निवांत दर्शन घेता आलं. ज्यावेळी दर्शन घेतलं, तेव्हा पंजीच्या जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

उत्तरेश्वर पेठ आणि विठ्ठल मंदिर 

माझं बालपण कोल्हापुरातील शुक्रवार पेठ आणि उत्तरेश्वर पेठ येथे गेलं. उत्तरेश्वर येथे विठ्ठलाचं खूप सुंदर मंदिर आहे. येथील विठ्ठल मंदिराची आणि माझी एक जुनी आठवण कायम स्मरणात राहिलेली आहे. एका कारणावरून मला आईने मारलं. मी तशीच रडत रडत कुणालाही काही न सांगता बाहेर पडले. शेजारीच असणाऱ्या विठ्ठल मंदिरात पळत जाऊन लपून बसले होते. विठ्ठलाच्या मूर्तीमागे लपून बसल्याने मी येथे लपले आहे. हे कुणाला समजलं नाही. म्हणजे अगदी एक भक्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी आला होता. त्याने विठ्ठलाचं दर्शन घेतलं. तरीही त्याला समजलं नाही की मी मूर्तीच्या मागे लपले आहे. असो. ही बालपणीची आठवण. लहानपणीच्या आठवणीत थोडी रममान झाले होते.


ही माऊली मला रस्त्यात भेटली. तिने लिफ्ट मागितली. त्या माऊलीबरोबर चर्चा झाल्यानंतर समजलं की, ती विठ्ठल भक्त आहे. तब्बल २० वेळा तिने पायी वारी केली होती. वय होतं ८० वर्षे. चष्मा नाही की, कमजोर नाही. बोलणेही उत्तम. जबरदस्त आवाज. तिने एक गाणेही म्हणून दाखवलं. विठ्ठल आणि गाडी चालकावर आधारित असलेलं ते गाणं होतं. भर उन्हात तिला लिफ्ट दिल्याने गाडी चालकात जणू तिला विठ्ठल दिसला, असा त्या गाण्याचा अन्वयार्थ होता.

परंतु, सांगायचं तात्पर्य असं की, बालपणापासूनचं विठ्ठल, पंढरपूर, नंदवाळ याविषयी ऐकल्याने आपसुकचं मनात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचं दर्शन एकदा तरी घ्यावं आणि पायी वारी एकदा तरी अनुभवावी, ही इच्छा अनेकदा  जागृत झाली होती आणि ती आता ही आहे!

ऐसें तवं भाग्य नाहीं । पूजा कांहीं करावी ॥१॥

पाहोन तीं पदाबुजें । लावूं रज कपाळीं ॥२॥

नाहीं संचित तें गांठी । आर्त पोटी भेटीचें ॥३॥

तुका म्हणे सर्व सिद्धि । वाहे विधि तुळसी ॥४॥

Saturday, May 16, 2020

तो 'भलामाणूस' सोडून गेला, भेटायचं राहूनच गेलं...

सुरेश मेस्त्री 

काका तुम्ही हे जग सोडून गेला. परंतु, तुमच्या आठवणी आजही सतत आठवत आहेत. तुम्ही गेल्याची माहिती कानावर आली आणि काही सुचेनास झालं. विश्वास बसेना की, आपल्या जवळचा 'भलामाणूस' आता आपल्यापासून दूर गेलाय. 

नावेच्या कारखान्याजवळ तुमचं घर आणि तेथेच माझी शाळा होती. (ती आताही आहे.) माझं घर थोडं लांबच होतं. त्यामुळे शाळेतून निकितासोबत तुमच्या घरी सतत येणं व्हायचं. तुमची धाकटी मुलगी निकिता आणि मी शाळेतल्या बेस्ट फ्रेंड्स. आमच्या दोघींमध्ये तुम्ही कधी भेदभाव केला नाही. निकितावर जेवढं प्रेम तेवढंच माझ्यावरही केलंत. माझ्या संकटाच्या काळात तुम्ही धाऊन आलात. काकी, सनी दा, निकिता आणि तुमचे ऋण कसे फेडायचे, हेच कळत नाही. आयुष्यभर मी त्या ऋणात असेन. 

तुम्ही जंगलात शिकारीला जायचा, त्याचं मला खूप अप्रुफ वाटायचं. (तेव्हा शिकार करण्यावर बंदी नव्हती.)  रानडुक्कराची शिकार तुम्ही केली होती, असं मी ऐकलं होतं. त्यामुळे औत्सुक्यापोटी मी निकिताला सांगितलं होतं की, बाबांना सांग ना, मला शिकार कशी केली ते सांगायला. शिकार कशाने केली असावी? याची मला खूप उत्सुकता होती. तुम्ही मला शिकारीची भली मोठी बंदूक आणि छरे दाखवले. मला पण बंदुक चालवता यावी, असं मला त्यावेळी वाटायचं. (तेव्हा मी नववीत) असेन. मग, मी तुमच्याकडे काका मला बंदूक शिकवा, असा आग्रह धरला. तुम्ही तयारही झाला. मग ठरलं की, शनिवारची सकाळची शाळा सुटल्यानंतर बंदूक शिकायला मी तुमच्याकडे यायचं. प्रत्येक आठवड्याला मी तुमच्या घरी यायची. हॉलमध्ये तुम्ही मला बंदुकीची माहिती सांगितल्यानंतर ती बंदूक घेऊन उभं करायचा. तासनतास ती बंदूक घेऊन न हालता हातात धरायची. बंदूक जड असल्याने ती मला आवराय नाही. त्यावेळी सनी दा चेष्टेने म्हणायचा, 'त्या बंदुकीच्या वजनाएवढी तरी आहेस का?' यावर तुम्ही हलकीशी स्माईल द्यायचा. परंतु, त्या स्माईलमध्येदेखील तुमची शिस्त दडली होती. बंदुकीच्या माशीकडे लक्ष्य देऊन तासन्‌तास बंदूक हातात घेऊन प्रॅक्टिस करायची, निशाणा लावताना अजिबात जागेवरून हलायचं नाही, असा प्रेमळ दम तुम्ही द्यायचा. 

काका तुमची आणि माझी फार कमी भेट झाली. माझी दहावीची शाळा पूर्ण झाल्यानंतर मी वेगळ्या कॉलेजात ॲडमिशन घेतलं. त्यामुळे तुमची, निकिताची फारशी भेट होऊ शकली नाही. फार कमी वेळा मी तुमच्या घरी आले असेन. मला आठवतं की, ज्या-ज्या वेळी तुमच्याकडे आले, त्यावेळी तुम्ही बाहेर असायचा. त्यामुळे तुम्हाला भेटायचं राहूनचं गेलं. 

ही गोड आठवण माझ्या कायमची लक्षात राहील. म्हणून तुमच्याविषयी लिहिण्याचा हा शब्दप्रपंच होता.  

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला सोडून जाण्यापूर्वी मला सतत वाटायचं की, एकदा तरी तुमच्या घरी जाऊन यांव. दोन-तीन महिने मनामध्ये असं येतं राहिल. परंतु, तुमच्याकडे येणं झालं नाही. नंतर ही गोष्ट मी पूनम (माझी व निकिताची शाळेतील मैत्रीण) तिला बोलून दाखवली. मी तुम्हाला भेटू शकले नाही, ही गोष्ट अजूनही माझ्या मनात सलते. 

परमेश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो. आपल्या परिवारास दु:खातून सावरण्याची ताकद देवो. 

Saturday, May 9, 2020

परतून येशील का 'आई'...


याआधी तुझ्याबद्दल लिहिणं जमलंच नाही. त्याच कारणही तसचं होतं. मला वाटायचं की, तू आयुष्यभर माझ्यासोबत असशील. म्हणून तुझ्याबद्दल चार शब्द बोलण्याची मला कधी गरजचं भासली नाही. तुला मी रोज पाहायचे...सका‍ळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी मी तुझा चेहरा पाहायचे. आता त्या चेहऱ्याची जागा एका फ्रेमने घेतली आहे. 


आजचा (दि. १०) मदर्स डेचा दिवस. तुझ्याबद्दल किती लिहावं आणि किती बोलावं, हेच कळत नाहीये. मदर्स डेच्या निमित्तानं तुझ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. तसं पाहिलं तर मला नेहमी तुझी आठवण येते. कधी आई आपल्या मुलांना शाळेत घेऊन जाताना तर कधी हा चिऊताईचा घास म्हणून आई आपल्या बाळाला जेवण जेऊ घालताना...मी आजारी पडले तर अधिकच तुझी आठवण स्मरत राहते...अशा असंख्य क्षणी तुझी आठवण सतावतेय. परंतु, तुझी आठवण फार काढायची नाही, असं मी मनाशी आधीच ठरवलं होतं. कारण, मागं वळून पाहिलं की, भळभळत्या त्या त्रासदायक आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो आणि मग, माझे हात-पाय ढेपाळल्यासारखे होतात. सुचायचं बंद होतं. मग, केवळ आणि केवळ तुझ्या आठवणीत रडत राहायचं. अल्बम काढून तुझे फोटो पाहायचे. त्या रडण्यातही तुझे आणि माझे फोटो पाहून चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य उमटतं. आणि मग घराच्या कोपऱ्याची जागा सोडून किचनमध्ये जायचं. ओक्साबोक्शी रडायचं. मग, तू सांगितलेलं मला आठवतं की, हात-पाय गाळायचे नाहीत. तू मुलगी नाहीस, मुलगा आहेस माझा. मुलासारखं राहायचं. धीराने राहायचं.

तुझ्या कणखर पण, मायाळू हातांनी मला घडवलंस. आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेचं. 

तुझ्या अगणित आठवणींचा साठा मी माझ्या ऋदयात आणि मेंदूत साठवला आहे. दु:खाचे क्षण वगळता तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक आनंदाचे क्षण शिदोरी म्हणून मला अख्ख्या आयुष्यभर पुरेल.  

तू केलेल्या अमाप मेहनतीची जाणीव मला सतत होत राहते. तुझ्या कष्टाला कशाचीच तोड नाही आई! तुझी तुलना दुसऱ्या कुठल्याच गोष्टीशी होणार नाही. तू जग सोडून जाण्याआधी महिना-दोन महिने मला सांगत राहिलीस की, कुणाशी कसं वागायचं, कुणाला किती जवळ करायचं. कुटुंबाची काळजी कशी घ्यायची? तुझ्या माघारी सर्वकाही कसं साकारायचं? तू हे ऐकताना माझं मन हेलावून जायचं. तुला मी म्हणायची की, तुला आई काही होणार नाही. स्ट्रॉन्ग राहा. तू आम्हाला धीटपणे, धीराने, कणखरपणे जगायला शिकवलंस. परंतु, तूच शेवटी धीर सोडलास. कारण, आयुष्यात इतक्या भरभरून संकटाला तू सामोरे गेलीस. २४-२५ वर्षे साऱ्या अडचणींवर मात करून संसाराचा गाडा ओढलास. त्यामुळे तुझ्यातला धीर संपून गेला होता गं...देवाचं तुला बोलावणं आलं आणि त्यामुळेच कदाचित तू मला आयुष्याच्या जगण्याची सूत्रे अखेरच्या दोन महिन्यांत शिकवलीस.   

खरंतरं, तुझ्याबद्दल भरभरून लिहावंस वाटतयं. परंतु, पुढे लिहिण्याचं धाडस होत नाहीये. कारण तुझ्या आठवणी माझ्या आसवांनी पूर्ण भिजून गेल्या आहेत. एकचं म्हणावसं वाटतं-'परतूनी येथील का?'

Thursday, May 7, 2020

मृत्यूने इरफानशी दगाबाजी केली!



चेहऱ्यावर फारसे हावभाव दिसत नसले तरी शब्दफेक, जबरदस्त संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार विजेता इरफान खानने मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात आज (ता.२९) अखेरचा श्वास घेतला. 

'कधी-कधी तुम्‍ही जगता. आणि कधी तुम्‍हाला वाटते की, तुमचं आयुष्‍य पूर्णपणे ढासळलेलं आहे. गेल्‍या १५ दिवसांत आयुष्‍य अनिश्चित असल्‍याचं जाणवत आहे. मला अंदाजदेखील नव्‍हता की दुर्मिळ कथांच्‍या शोधात मला दुर्मिळ आजार मिळेल. पण, मी कधी आशा सोडलेली नाही. मी संघर्ष करेन.' हे ट्विट इरफान खानने लंडनमध्ये उपचार घेताना केलं होतं. 

खरंच, आयुष्य किती संघर्षमय आणि खडतर आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आयुष्याची घडी बसवताना चढ-उतार इरफानने सहन केले. त्याला झालेल्या दुर्मिळ आजारावर मात करण्यासाठी जगभरातील चाहत्यांनी प्रार्थना, दुआ केल्या. परंतु, मरण त्याच्याच नशीबी का यावं? जगण्याची इच्छा असताना आणि आपण या आजारातून लवकरच मुक्त होऊ अशी आशा असताना मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला. कलाकारांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण अधिक आहे. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. विनोद खन्ना, फिरोज खान, सोनाली बेंद्रे अशा असंख्य कलाकारांना कॅन्सर झाला. काहींनी त्यावर मात केली, तर काही जण दगावले. यापैकी आणखी एक इरफान खान. 

इरफान खानला जेव्हा न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर असल्याचे समजले, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. परंतु, खचून न जाता त्याने कॅन्सरशी लढा देण्याचे ठरवले. २०१८ मध्ये यावर उपचार घेण्यासाठी तो लंडनला गेला. तेथूनच तो आपल्या चाहत्यांसाठी आपल्या आरोग्याचे अपडेट देऊ लागला. त्याला कॅन्सर झाल्याची माहिती त्याच्या जवळच्या एका मित्राकडून समजली होती. लंडनला कॅन्सरवरील उपचार घेतल्यानंतर त्याने कॅन्सरवर मात करण्यासाठी खूप संघर्ष केला. आजारपणातही त्याला आपल्या कुटुंबाचं आणि मित्र मंडळींचं त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांची काळजी असायची. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सर्वांच्या संपर्कात असायचा.  
Irrfan Khan Age, Death, Wife, Children, Family, Biography & More ...

उपचारादरम्यान, इरफानच्या जीवाला काही धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्याच्या असंख्य चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. कारण त्याला झालेल्या ट्युमरवर उपचार करता येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. परंतु, नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. 

आजारपणातही त्याच्या डोक्यात चित्रपटांचाच विचार सुरू होता. इमरान स्‍वत:ला चित्रपटांपासून दूर ठेवू शकत 
नव्हता. आपल्या आगामी चित्रपटाची त्याला आस लागून राहिली होती. अखेर तेथून त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक ट्विट करून आपल्या येणाऱ्या चित्रपटाबद्दलची माहिती दिली. त्याने ट्विटमध्ये लिहिलं की-'चित्रपट कांरवासाठी सलमान दुलकर आणि मिथिला पालकरचे आभार. दोन कारवां... एक मी आणि एक माझा चित्रपट.' 

कांरवा हा चित्रपट ३ ऑगस्ट, २०१८ रोजी रिलीज झाला.  

एकामागून एक असे ट्विट करत इरफान आपले विचार मांडायचा. कधी कधी भावूक होऊन ट्विट करायचा. आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायचा. असेच आणखी एक ट्विट केले होते आणि आपल्या आयुष्याची गणिते मांडताना जगण्याच्या वळणावर किती अडचणी येताहेत आणि या कठीण समयी संकटातून कसं बाहेर पडायचं आहे, याबद्दल लिहिले होते. 

इरफान खानने एका ट्‍विटमध्ये म्हटलं होतं- 'जे आपणांस हवं आहे, आयुष्‍यात तेच मिळेल असे नाही. गेले काही दिवस माझ्याबरोबर असेच काहीसे घडत आहे. आता समजलयं की, मला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर आहे. याला सामोरे जाणं खूप कठीण आहे. पण, माझ्‍याकडे चाहत्‍यांचं प्रेम आणि पाठिंबा आहे, त्‍यामुळे मी यातून बाहेर पडेन, अशी आशा आहे. यासाठी मला देशाबाहेर जावं लागणार आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्‍यासाठी प्रार्थना, दुआ करा. मला आणखी एक सांगायचं आहे की, नेहमीच न्‍यूरोचा अर्थ ब्रेन असा होत नाही. तुम्‍ही गुगलवर शोधा. ज्‍या लोकांना माझ्‍या ट्‍विटची प्रतीक्षा होती, त्‍यांना मी सांगत राहीन.' 'जे आपणांस हवं आहे, आयुष्‍यात तेच मिळेल असे नाही,' असं जे ट्विट त्याने केलं यातून त्याला एक चांगलं आयुष्य हवं होतं. 
इरफान खान लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर इरफान भारतात परतला होता. त्याने चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' चे शूटिंगदेखील केले. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. या चित्रपटामध्ये इरफान खानसोबत राधिका मदान आणि करीना कपूरदेखील होती. परंतु, कुणाला असं वाटलंदेखील नसावं की, त्याचा हा शेवटचा चित्रपट ठरेल. दुर्दैवाने त्याने केवळ आयुष्याची हाफ सेन्च्युरी पाहिली. 

पिकू, पानसिंह तोमर, द वारियर, मकबूल, हासिल, द नेमसेक, रोग यासारख्या ३० हून अधिक बॉलिवूड चित्रपट आणि ए मायटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेजिंग स्पायडर मॅन यांसारख्या हॉलिवूडपटांतून इरफान तू नेहमीच लक्षात राहशील.

देवाने तुझ्यासाठी हा दिवस राखून ठेवला होता 'ऋषी'

Every Bollywood Fan Should Read These Interesting Facts About The ...

हरहुन्नरी अभिनेता ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. 
ऋषी तू गेल्याचं तर अमाप दु:ख आहे. जगातून तू इतक्या लवकर रिटायर्ड होशील, असं कधीच विचार देखील केला नव्हता. काल म्हणजे, दि. २९ रोजी हरहुन्नरी कलाकार इरफान खानचेदेखील कॅन्सरने निधन झाले. आता त्याच्यामागून तू ही कॅन्सरने जाशील आणि संपूर्ण चित्रपट इंडस्ट्री आणि चाहत्यांना पोरकं करशील, असं वाटलंदेखील नव्हतं. परंतु, मन घट्ट करून तुझ्या अविस्मरणीय चित्रपटांच्या प्रवासाबद्दल लिहावं लागतयं. तुझ्यासारख्या कलाकाराने कॅमेऱ्यासमोर येऊन अख्ख्या जगाला तू कसं हसवलंस आणि रडवलंस हेदेखील सगळ्यांना समजू दे.    

‘बॉबी’मधला तो ऋषी कपूर पाहिला की, अंगात स्‍वेटर घातलेला २१ वर्षांचा तो तरुण आठवतो. भारतीय मनोरंजन जगताला ऋषी कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. चित्रपटातील एकापेक्षा एक गाणी, जी त्‍याने सुंदर अभिनेत्रींसोबत चित्रित केली होती. त्‍यांची त्‍या-त्‍या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत असलेली केमिस्‍ट्रीही प्रेक्षकांच्‍या पसंतीस कायमस्‍वरूपी उतरली. 

एकेकाळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राज कपूरने ‘बॉबी’ या चित्रपटातून नव्हाळीतल्या प्रेमाचा विषय हाताळला. 'बॉबी'मध्‍ये ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांचा ऐन तारुण्‍यातील प्रेम पडद्‍यावर दाखवण्‍यात आलं. बॉबी पाहिल्‍यानंतर ऋषीचा अभिनयासाठीच जन्‍म झाला असावा, असं वाटतं. प्रेमातील अनेक प्रसंग ऋषी कपूरने अजरामर करून ठेवले आहेत. त्याचा काळ आणि त्याच्या नंतरच्या काळानेही ऋषीच्या प्रेमासारखं आपलं प्रेम पाहिजे म्‍हणून प्रेमात पडणारी पिढी त्याकाळी निर्माण झाली होती, आणि त्याच्या प्रेमासाठीच ऋषीच्या स्‍वेटरचा ट्रेंड अस्‍तित्‍वात आला.  आणि पुढे अभिनेता म्‍हणून तो अजरामर झाला. 

राज कपूर यांनी शंकर-जयकिशनऐवजी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेऊन 'बॉबी'साठी काम केलं तर ऋषी कपूरच्‍या गाण्‍यांना मुकेश यांना गायला न सांगता शैलेंद्र सिंग यांना गायला सांगितले. विशेष म्‍हणजे, 'बॉबी'तली गाणी सुपरडूपर हिट ठरली म्‍हणून काळ लोटला तरी ऋषी कपूरची गाणी आजही अनेकांच्या ओठावर रूळली.

अभिनेता राज कपूर . प्रत्येक भूमिकेला त्याने जिवंतपणाचा ओलावा दिला. त्‍यांच्‍याच मुलांपैकी एक ऋषी कपूर. ऋषी कपूरसारखं स्‍पिरीट इतरांकडे म्‍हणावं तसं नव्‍हतं. 'बॉबी'ला मिळालेल्‍या यशानंतर एकामागोमाग एक चित्रपट ऋषीने दिले. ऋषीने डिंपल कापडियाबरोरच पद्मिनी कोल्हापुरे, जया प्रदा, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, दिव्‍या भारती, रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला या अभिनेत्रींसोबत अनेक चित्रपटांत काम केले. 

ऋषीने 'मेरा नाम जोकर'मधून एक बालकलाकार मधून सिनेजगतात पाऊल ठेवलं. या चित्रपटासाठी त्‍यांना डेब्यू चाईल्ड अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. परंतु, एक अभिनेता म्‍हणून 'बॉबी' हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्‍यांना उत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा पुरस्‍कार मिळाला. 

सिनेजगतातल्‍या २५ वर्षांच्‍या करकिर्दीत स्वेटर्स घालून, अभिनेत्रींभोवती पिंगा घालण्‍याशिवाय आणि गाणी गाण्यापलीकडे आपण काहीच केले नसल्‍याने त्‍यांनी खुद्‍द कबूल केले आहे. 

... तेव्‍हा खचला ऋषी 

राज कपूर यांनी आर. के. फिल्म्सची कंपनी स्थापन करून चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओ उभारला. अनेक चित्रपटांचे शूटिंग या स्‍टुडिओत झाले होते. 'बॉबी' चित्रपटाचे चित्रीकरणही तेथेच झाले होते. ‘श्री. ४२०’चं शूटिंगदेखील तिथलंचं. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ हे गाणं आठवतयं? ‘श्री. ४२०’ मधील या रोमँटिक गाण्‍यात ऋषी केवळ दोन वर्षांचे होते. त्‍यावेळचा शूटिंगचा एक किस्‍सा सांगितला जातो. दोन वर्षांच्‍या ऋषीला भर मुसळधार पावसातून रडत चालायचे होते. परफेक्‍ट सीनसाठी रिटेकवर रिटेक होतात. शूटिंग लांबते. त्‍यामुळे चिंब भिजलेला ऋषी वैतागतो आणि पावसात न जाण्‍याचा हट्‍ट धरतो. तेव्हा ‘तू पपा सांगतील, त्याप्रमाणे केलंस, तर मी तुला चॉकलेट देईन’, असे आमिष अभिनेत्री नर्गिस ऋषीला दाखवले होते. तेव्हापासून ऋषीचं आर. के. स्टुडिओशी वेगळं नातं आहे. म्हणूनच आर. के. स्‍टुडिओला आग लागली, तेव्हा ऋषी पुरता खचला होता. 

ऋषीची खास आठवण 

ऋषी आणि नीतू यांच्या विवाहानंतरच्या जंगी पार्ट्या आर. के. स्‍टुडिओतच झाल्‍या होत्‍या. त्यामुळे ऋषीला आर. के. स्‍टुडिओची लाईफटाईम आठवण राहणारी आहे. 
Bollywood's romantic heartthrob Rishi Kapoor dies at 67 - Esquire ...

ऋषीचं 'त्‍या' तरुणीशी अफेअर  

अभिनेत्री नीतू सिंह यांच्‍याशी लग्‍न होण्‍यापूर्वी ऋषीने यास्मीन नावाच्‍या तरुणीला डेट केल्‍याचे म्‍हटले जाते. परंतु, आपण नीतूला कधी धोका दिला नाही, असे खुद्‍द ऋषीने एका मुलाखतीत म्‍हटलं होतं. जेव्‍हा बॉबी चित्रपट आला होता, त्‍यावेळी ऋषी २१ वर्षांचा होता. बॉबी रिलीज झाला, त्‍यावेळी ऋषीचा ब्रेकअप झाल्‍याचे त्‍याने सांगितले होते. 

रोमॅंटिक ऋषीच्‍या गंभीर भूमिका 

गेल्या काही वर्षांमध्‍ये ‘दो दूनी चार’, ‘अग्निपथ’, कपूर ॲण्‍ड सन्‍स, राजमा चावल, बेशरम, स्‍टुडंट ऑफ द ईअर, पटियाला हाऊस, १०२ नॉट आऊट, ‘मुल्क’ अशा चित्रपटांतून वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा ऋषीने रंगवल्‍या. प्रत्‍येक भूमिकेला परफेक्‍ट असणारा ऋषीने रोमँटिकचं नव्‍हे तर गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 'मुल्‍क' या चित्रपटातील त्‍याची एका मुस्‍लिम व्‍यक्‍तीची रेखाटलेली भूमिका कौतुकास्पद आहे. 'मुल्‍क'मधील त्‍याची अत्‍यंत सुंदर भूमिका आहे, त्‍यात तापसी पन्‍नूचीदेखील महत्त्‍वाची भूमिका होती. 

या चित्रपटांतून साकारल्‍या वेगळ्‍या भूमिका

मेरा नाम जोकर, नगीना, दिवाना, हिना, चांदनी, प्रेम रोग, लैला मजनू, बंजारा, बोल राधा बोल, साजन का घर, कर्ज, प्रेम ग्रंथ, दामिनी, नसीब अपना अपना, अजुबा, दरार, अमर अकबर ॲन्‍थोनी, बडे घर की बेटी, घराना, ये वादा राहा, हम किसीसे कम नहीं, लव्‍ह आज कल, प्‍यार के काबिल, नमस्‍ते लंडन, रफू चक्‍कर, दो प्रेमीं, गुरुदेव, हम दोनों यासारख्‍या चित्रपटांतून ऋषी कपूरने वेगवेगळ्‍या भूमिका पार पाडल्‍या.  

Wednesday, May 6, 2020

जेव्हा 'तिने' आपले दोन्ही स्तन कापले अन्...



संग्रहित छायाचित्र 

मुलाकरम (ब्रेस्ट टॅक्स) 

सोळाव्या सतराव्या शतकात केरळमध्ये अनेक कर द्यावे लागत होते. यापैकी एक जाचक कर होता-मुलाकरम. केरळमधील त्रावणकोर येथे क्षुद्र जातीतील स्त्रियांना त्यांची स्तन झाकण्यास परवानगी नव्हती. स्तन झाकायचे झाल्यास त्यांना 'ब्रेस्ट टॅक्स' म्हणून 'कर' द्यावा लागत असे. तेथील स्थानीय भाषेत त्याला 'मुलाकरम' असे म्हणत असत. 

खालच्या जातीतील स्त्रियांना हा कर परवडणारा नव्हता. त्यामुळे तेथील स्त्रिया आपले स्तन उघडे ठेवत असत. अनेकांच्या भेदक नजरा त्यांच्या स्तनाकडे लागलेल्या असायच्या. परंतु, कुणालाही जाब विचारण्याची हिंमत झालेली नव्हती. पाण्याला जाताना, लाकडे आणायला जाताना किंवा घरची कामे करतानाही पुरूषांच्या नजरा त्या बाईवर पडायच्या. परंतु, महिलांना ते निमुटपणे सहन करावं लागायचं. यापेक्षा वाईट म्हणजे, जर तिने हा नियम मोडला, म्हणजेच क्षुद्र जातीतील स्त्रीने आपले स्तन झाकले तर तिला आपल्या स्तनाच्या वजनाएवढा कर द्यावा लागायचा. इतकेच नाही तर कर गोळा करणारा ते स्तन हातात घेऊन वजन करायचा आणि किती कर द्यावा लागेल, हे सांगायचा. ही कल्पनादेखील किती भयावह वाटते. परंतु, त्याकाळी त्या महिलांना किती सहन करावं लागलं असेल. 

जातीभेदाच्या चौकटीत त्या महिला हे सर्व डोळे झाकून सहन करत राहिल्या. त्याकाळी जाती-धर्माचा इतका पगडा होता की, खालच्या जातीला निमूटपणे सर्व सहन करावं लागायचं. पण, एक रणरागिनी निघाली, जिने या स्तन कराविरोधात आवाज उठवला. 'नांगेली' असं तिचं नाव. नांगेलीला या उच्च-नीच समाजव्यवस्थेचा प्रचंड राग यायचा. विषमतेच्या जोखडाखाली दबलेल्या स्त्रियांवर लावलेले नियम, कायदे तिला मोडीत काढायचे होते. 

अमानुषपणे महिलांवर होत असलेला अत्याचारांविरोधात तिला आवाज उठवायचा होता. अनेकदा तशी आपली तळमळ तिने बोलून दाखवली होती. परंतु, स्तन कराविरोधात आवाज उठवण्याचं धाडस कुणी केलं नाही. समाजव्यवस्थेने क्षुद्र जातीतील स्त्रियांवर लादलेल्या कराविरोधात तिने बंड पुकारण्याचा निश्चय केला. ती आपले स्तन झाकूनच बाहेर पडली. कर गोळा करणाऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. तिने आपले स्तन का झाकले? याचा जाब नांगेलीला विचारण्यात आला. या प्रश्नावर नांगेलीच्या डोळ्यात निखाऱ्यासारखे रक्त साचले होते. तिने मुलाकरम ही देणार नाही आणि स्तनही झाकणार, असं थेट उत्तर देऊन कर गोळा करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. तिच्या विद्रोही विचारांनी समोरची मंडळी प्रचंड घाबरली. परंतु, तिने हार न मानता आपला निश्चय सोडला नाही आणि त्यांच्या धमक्यांनाही घाबरली नाही. 

क्षुद्र जातीतील एका स्त्रीने विषमतावादी व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. ते व्यवस्थेच्या पचनी पडणार नव्हतं. नावेलीने ही प्रथा बंद करण्यासाठी आपल्या पतीला बोलून दाखवली होती. तिचा पती नावेलीवर खूप प्रेम करायचा. त्याने आपल्या पत्नीला साथ दिली.

अखेर कर घेणारा नावेलीच्या घरी पोहोचला. तिच्या स्तनाची तपासणी केली. तिला हा सर्व प्रकार असह्य वाटत होता.  

तिला पाहताच कर घेणारी मंडळी संतापली आणि तिच्याकडे मुलाकरम मागू लागले. तिला तिच्या स्तनाच्या वजनाएवढे मुलाकरम द्यायचे होते. नांगेलीने क्षणाचाही विचार न करता थेट आपल्या घरामध्ये गेली आणि त्यांना बाहेरच थांबण्यास सांगितलं. ती आपल्या दोन्ही हातातून मुलाकरम घेऊन आली. परंतु, जेव्हा नांगेलीला बाहेर थांबलेल्या लोकांनी पाहिलं, तेव्हा त्यांना घाम फुटला होता. त्यांना काय करावं सुचलं नाही. कारण, समोर जे दृश्य होतं, ते भयावह आणि मन हेलावून टाकणार होतं. नांगेलीच्या हातात असणाऱ्या केळीच्या पानावर दोन स्तन होते. तिने आपले स्वत:चे स्तन कापून त्या पानावर ठेवले होते आणि 'मुलाकरम' म्हणून तिने ते समोरच्या लोकांसमोर सादर केले होते. अतिरक्तस्रावाने नांगेलीचा जागीच मृत्यू झाला होता. रक्ताच्या थोरोळ्यात पडलेल्या नांगेलीला पाहून तेथील लोकांनी धूम ठोकली. 

अमानवीय कायदा मोडणारी नांगेली खऱ्या अर्थाने थेट समाजाशी भिडणारी योध्दाव् (रणरागिनी) ठरली. 


('योध्दाव्' हा मल्याळम भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ रणरागिनी असा होतो.) 

Tuesday, May 5, 2020

लुम्बिनी


यहाँ हुआ था भगवान् बुद्ध का जन्म ...

अशोक स्तंभ - लुम्बिनी

मी माझ्या ब्लॉगला लुम्बिनी हे नाव दिलं आहे. हे नाव देण्यामागे खास असं कारण नाही. गौतम बुद्ध यांच्याबद्दलची माहिती वाचताना लुम्बिनी हे नाव वाचनात आलं आणि आवडलंही...लुम्बिनी या पवित्र स्थळाचं नाव देणं भाग्यचं...

लुम्बिनी हे गौतम बुद्धांचं जन्मस्थान. नेपाळ देशामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे इ.स.पूर्व ५६३ मध्ये राणी मायादेवीने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला होता. लुम्बिनी नेपाळच्या दक्षिण भागात नेपाळ-भारत सीमेजवळ स्थित असून ते भारताच्या गोरखपूर शहरापासून ९५ किमी अंतरावर स्थित आहे. लुम्बिनी, बोधगया, कुशीनगर व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

 संदर्भ-विकिपीडिया