Saturday, May 16, 2020

तो 'भलामाणूस' सोडून गेला, भेटायचं राहूनच गेलं...

सुरेश मेस्त्री 

काका तुम्ही हे जग सोडून गेला. परंतु, तुमच्या आठवणी आजही सतत आठवत आहेत. तुम्ही गेल्याची माहिती कानावर आली आणि काही सुचेनास झालं. विश्वास बसेना की, आपल्या जवळचा 'भलामाणूस' आता आपल्यापासून दूर गेलाय. 

नावेच्या कारखान्याजवळ तुमचं घर आणि तेथेच माझी शाळा होती. (ती आताही आहे.) माझं घर थोडं लांबच होतं. त्यामुळे शाळेतून निकितासोबत तुमच्या घरी सतत येणं व्हायचं. तुमची धाकटी मुलगी निकिता आणि मी शाळेतल्या बेस्ट फ्रेंड्स. आमच्या दोघींमध्ये तुम्ही कधी भेदभाव केला नाही. निकितावर जेवढं प्रेम तेवढंच माझ्यावरही केलंत. माझ्या संकटाच्या काळात तुम्ही धाऊन आलात. काकी, सनी दा, निकिता आणि तुमचे ऋण कसे फेडायचे, हेच कळत नाही. आयुष्यभर मी त्या ऋणात असेन. 

तुम्ही जंगलात शिकारीला जायचा, त्याचं मला खूप अप्रुफ वाटायचं. (तेव्हा शिकार करण्यावर बंदी नव्हती.)  रानडुक्कराची शिकार तुम्ही केली होती, असं मी ऐकलं होतं. त्यामुळे औत्सुक्यापोटी मी निकिताला सांगितलं होतं की, बाबांना सांग ना, मला शिकार कशी केली ते सांगायला. शिकार कशाने केली असावी? याची मला खूप उत्सुकता होती. तुम्ही मला शिकारीची भली मोठी बंदूक आणि छरे दाखवले. मला पण बंदुक चालवता यावी, असं मला त्यावेळी वाटायचं. (तेव्हा मी नववीत) असेन. मग, मी तुमच्याकडे काका मला बंदूक शिकवा, असा आग्रह धरला. तुम्ही तयारही झाला. मग ठरलं की, शनिवारची सकाळची शाळा सुटल्यानंतर बंदूक शिकायला मी तुमच्याकडे यायचं. प्रत्येक आठवड्याला मी तुमच्या घरी यायची. हॉलमध्ये तुम्ही मला बंदुकीची माहिती सांगितल्यानंतर ती बंदूक घेऊन उभं करायचा. तासनतास ती बंदूक घेऊन न हालता हातात धरायची. बंदूक जड असल्याने ती मला आवराय नाही. त्यावेळी सनी दा चेष्टेने म्हणायचा, 'त्या बंदुकीच्या वजनाएवढी तरी आहेस का?' यावर तुम्ही हलकीशी स्माईल द्यायचा. परंतु, त्या स्माईलमध्येदेखील तुमची शिस्त दडली होती. बंदुकीच्या माशीकडे लक्ष्य देऊन तासन्‌तास बंदूक हातात घेऊन प्रॅक्टिस करायची, निशाणा लावताना अजिबात जागेवरून हलायचं नाही, असा प्रेमळ दम तुम्ही द्यायचा. 

काका तुमची आणि माझी फार कमी भेट झाली. माझी दहावीची शाळा पूर्ण झाल्यानंतर मी वेगळ्या कॉलेजात ॲडमिशन घेतलं. त्यामुळे तुमची, निकिताची फारशी भेट होऊ शकली नाही. फार कमी वेळा मी तुमच्या घरी आले असेन. मला आठवतं की, ज्या-ज्या वेळी तुमच्याकडे आले, त्यावेळी तुम्ही बाहेर असायचा. त्यामुळे तुम्हाला भेटायचं राहूनचं गेलं. 

ही गोड आठवण माझ्या कायमची लक्षात राहील. म्हणून तुमच्याविषयी लिहिण्याचा हा शब्दप्रपंच होता.  

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला सोडून जाण्यापूर्वी मला सतत वाटायचं की, एकदा तरी तुमच्या घरी जाऊन यांव. दोन-तीन महिने मनामध्ये असं येतं राहिल. परंतु, तुमच्याकडे येणं झालं नाही. नंतर ही गोष्ट मी पूनम (माझी व निकिताची शाळेतील मैत्रीण) तिला बोलून दाखवली. मी तुम्हाला भेटू शकले नाही, ही गोष्ट अजूनही माझ्या मनात सलते. 

परमेश्वर आपल्या आत्म्यास शांती देवो. आपल्या परिवारास दु:खातून सावरण्याची ताकद देवो. 

Saturday, May 9, 2020

परतून येशील का 'आई'...


याआधी तुझ्याबद्दल लिहिणं जमलंच नाही. त्याच कारणही तसचं होतं. मला वाटायचं की, तू आयुष्यभर माझ्यासोबत असशील. म्हणून तुझ्याबद्दल चार शब्द बोलण्याची मला कधी गरजचं भासली नाही. तुला मी रोज पाहायचे...सका‍ळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी मी तुझा चेहरा पाहायचे. आता त्या चेहऱ्याची जागा एका फ्रेमने घेतली आहे. 


आजचा (दि. १०) मदर्स डेचा दिवस. तुझ्याबद्दल किती लिहावं आणि किती बोलावं, हेच कळत नाहीये. मदर्स डेच्या निमित्तानं तुझ्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या. तसं पाहिलं तर मला नेहमी तुझी आठवण येते. कधी आई आपल्या मुलांना शाळेत घेऊन जाताना तर कधी हा चिऊताईचा घास म्हणून आई आपल्या बाळाला जेवण जेऊ घालताना...मी आजारी पडले तर अधिकच तुझी आठवण स्मरत राहते...अशा असंख्य क्षणी तुझी आठवण सतावतेय. परंतु, तुझी आठवण फार काढायची नाही, असं मी मनाशी आधीच ठरवलं होतं. कारण, मागं वळून पाहिलं की, भळभळत्या त्या त्रासदायक आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो आणि मग, माझे हात-पाय ढेपाळल्यासारखे होतात. सुचायचं बंद होतं. मग, केवळ आणि केवळ तुझ्या आठवणीत रडत राहायचं. अल्बम काढून तुझे फोटो पाहायचे. त्या रडण्यातही तुझे आणि माझे फोटो पाहून चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य उमटतं. आणि मग घराच्या कोपऱ्याची जागा सोडून किचनमध्ये जायचं. ओक्साबोक्शी रडायचं. मग, तू सांगितलेलं मला आठवतं की, हात-पाय गाळायचे नाहीत. तू मुलगी नाहीस, मुलगा आहेस माझा. मुलासारखं राहायचं. धीराने राहायचं.

तुझ्या कणखर पण, मायाळू हातांनी मला घडवलंस. आज मी जे काही आहे, ते फक्त आणि फक्त तुझ्यामुळेचं. 

तुझ्या अगणित आठवणींचा साठा मी माझ्या ऋदयात आणि मेंदूत साठवला आहे. दु:खाचे क्षण वगळता तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक आनंदाचे क्षण शिदोरी म्हणून मला अख्ख्या आयुष्यभर पुरेल.  

तू केलेल्या अमाप मेहनतीची जाणीव मला सतत होत राहते. तुझ्या कष्टाला कशाचीच तोड नाही आई! तुझी तुलना दुसऱ्या कुठल्याच गोष्टीशी होणार नाही. तू जग सोडून जाण्याआधी महिना-दोन महिने मला सांगत राहिलीस की, कुणाशी कसं वागायचं, कुणाला किती जवळ करायचं. कुटुंबाची काळजी कशी घ्यायची? तुझ्या माघारी सर्वकाही कसं साकारायचं? तू हे ऐकताना माझं मन हेलावून जायचं. तुला मी म्हणायची की, तुला आई काही होणार नाही. स्ट्रॉन्ग राहा. तू आम्हाला धीटपणे, धीराने, कणखरपणे जगायला शिकवलंस. परंतु, तूच शेवटी धीर सोडलास. कारण, आयुष्यात इतक्या भरभरून संकटाला तू सामोरे गेलीस. २४-२५ वर्षे साऱ्या अडचणींवर मात करून संसाराचा गाडा ओढलास. त्यामुळे तुझ्यातला धीर संपून गेला होता गं...देवाचं तुला बोलावणं आलं आणि त्यामुळेच कदाचित तू मला आयुष्याच्या जगण्याची सूत्रे अखेरच्या दोन महिन्यांत शिकवलीस.   

खरंतरं, तुझ्याबद्दल भरभरून लिहावंस वाटतयं. परंतु, पुढे लिहिण्याचं धाडस होत नाहीये. कारण तुझ्या आठवणी माझ्या आसवांनी पूर्ण भिजून गेल्या आहेत. एकचं म्हणावसं वाटतं-'परतूनी येथील का?'

Thursday, May 7, 2020

मृत्यूने इरफानशी दगाबाजी केली!



चेहऱ्यावर फारसे हावभाव दिसत नसले तरी शब्दफेक, जबरदस्त संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर रुंजी घालणारा अभिनेता, राष्ट्रीय पुरस्कार विजेता इरफान खानने मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात आज (ता.२९) अखेरचा श्वास घेतला. 

'कधी-कधी तुम्‍ही जगता. आणि कधी तुम्‍हाला वाटते की, तुमचं आयुष्‍य पूर्णपणे ढासळलेलं आहे. गेल्‍या १५ दिवसांत आयुष्‍य अनिश्चित असल्‍याचं जाणवत आहे. मला अंदाजदेखील नव्‍हता की दुर्मिळ कथांच्‍या शोधात मला दुर्मिळ आजार मिळेल. पण, मी कधी आशा सोडलेली नाही. मी संघर्ष करेन.' हे ट्विट इरफान खानने लंडनमध्ये उपचार घेताना केलं होतं. 

खरंच, आयुष्य किती संघर्षमय आणि खडतर आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावर आयुष्याची घडी बसवताना चढ-उतार इरफानने सहन केले. त्याला झालेल्या दुर्मिळ आजारावर मात करण्यासाठी जगभरातील चाहत्यांनी प्रार्थना, दुआ केल्या. परंतु, मरण त्याच्याच नशीबी का यावं? जगण्याची इच्छा असताना आणि आपण या आजारातून लवकरच मुक्त होऊ अशी आशा असताना मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला. कलाकारांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण अधिक आहे. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. विनोद खन्ना, फिरोज खान, सोनाली बेंद्रे अशा असंख्य कलाकारांना कॅन्सर झाला. काहींनी त्यावर मात केली, तर काही जण दगावले. यापैकी आणखी एक इरफान खान. 

इरफान खानला जेव्हा न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर असल्याचे समजले, तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. परंतु, खचून न जाता त्याने कॅन्सरशी लढा देण्याचे ठरवले. २०१८ मध्ये यावर उपचार घेण्यासाठी तो लंडनला गेला. तेथूनच तो आपल्या चाहत्यांसाठी आपल्या आरोग्याचे अपडेट देऊ लागला. त्याला कॅन्सर झाल्याची माहिती त्याच्या जवळच्या एका मित्राकडून समजली होती. लंडनला कॅन्सरवरील उपचार घेतल्यानंतर त्याने कॅन्सरवर मात करण्यासाठी खूप संघर्ष केला. आजारपणातही त्याला आपल्या कुटुंबाचं आणि मित्र मंडळींचं त्याच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्यांची काळजी असायची. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो सर्वांच्या संपर्कात असायचा.  
Irrfan Khan Age, Death, Wife, Children, Family, Biography & More ...

उपचारादरम्यान, इरफानच्या जीवाला काही धोका नसल्याचे डॉक्टरांनी म्हटल्याचे वृत्त समोर आल्यानंतर त्याच्या असंख्य चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. कारण त्याला झालेल्या ट्युमरवर उपचार करता येतात, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. परंतु, नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. 

आजारपणातही त्याच्या डोक्यात चित्रपटांचाच विचार सुरू होता. इमरान स्‍वत:ला चित्रपटांपासून दूर ठेवू शकत 
नव्हता. आपल्या आगामी चित्रपटाची त्याला आस लागून राहिली होती. अखेर तेथून त्याने आपल्या चाहत्यांसाठी एक ट्विट करून आपल्या येणाऱ्या चित्रपटाबद्दलची माहिती दिली. त्याने ट्विटमध्ये लिहिलं की-'चित्रपट कांरवासाठी सलमान दुलकर आणि मिथिला पालकरचे आभार. दोन कारवां... एक मी आणि एक माझा चित्रपट.' 

कांरवा हा चित्रपट ३ ऑगस्ट, २०१८ रोजी रिलीज झाला.  

एकामागून एक असे ट्विट करत इरफान आपले विचार मांडायचा. कधी कधी भावूक होऊन ट्विट करायचा. आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायचा. असेच आणखी एक ट्विट केले होते आणि आपल्या आयुष्याची गणिते मांडताना जगण्याच्या वळणावर किती अडचणी येताहेत आणि या कठीण समयी संकटातून कसं बाहेर पडायचं आहे, याबद्दल लिहिले होते. 

इरफान खानने एका ट्‍विटमध्ये म्हटलं होतं- 'जे आपणांस हवं आहे, आयुष्‍यात तेच मिळेल असे नाही. गेले काही दिवस माझ्याबरोबर असेच काहीसे घडत आहे. आता समजलयं की, मला न्यूरोएंडोक्राईन ट्यूमर आहे. याला सामोरे जाणं खूप कठीण आहे. पण, माझ्‍याकडे चाहत्‍यांचं प्रेम आणि पाठिंबा आहे, त्‍यामुळे मी यातून बाहेर पडेन, अशी आशा आहे. यासाठी मला देशाबाहेर जावं लागणार आहे. मी सर्वांना आवाहन करतो की, माझ्‍यासाठी प्रार्थना, दुआ करा. मला आणखी एक सांगायचं आहे की, नेहमीच न्‍यूरोचा अर्थ ब्रेन असा होत नाही. तुम्‍ही गुगलवर शोधा. ज्‍या लोकांना माझ्‍या ट्‍विटची प्रतीक्षा होती, त्‍यांना मी सांगत राहीन.' 'जे आपणांस हवं आहे, आयुष्‍यात तेच मिळेल असे नाही,' असं जे ट्विट त्याने केलं यातून त्याला एक चांगलं आयुष्य हवं होतं. 
इरफान खान लंडनमध्ये उपचार घेतल्यानंतर इरफान भारतात परतला होता. त्याने चित्रपट 'अंग्रेजी मीडियम' चे शूटिंगदेखील केले. लॉकडाऊनमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. या चित्रपटामध्ये इरफान खानसोबत राधिका मदान आणि करीना कपूरदेखील होती. परंतु, कुणाला असं वाटलंदेखील नसावं की, त्याचा हा शेवटचा चित्रपट ठरेल. दुर्दैवाने त्याने केवळ आयुष्याची हाफ सेन्च्युरी पाहिली. 

पिकू, पानसिंह तोमर, द वारियर, मकबूल, हासिल, द नेमसेक, रोग यासारख्या ३० हून अधिक बॉलिवूड चित्रपट आणि ए मायटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेजिंग स्पायडर मॅन यांसारख्या हॉलिवूडपटांतून इरफान तू नेहमीच लक्षात राहशील.

देवाने तुझ्यासाठी हा दिवस राखून ठेवला होता 'ऋषी'

Every Bollywood Fan Should Read These Interesting Facts About The ...

हरहुन्नरी अभिनेता ऋषी कपूर यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. 
ऋषी तू गेल्याचं तर अमाप दु:ख आहे. जगातून तू इतक्या लवकर रिटायर्ड होशील, असं कधीच विचार देखील केला नव्हता. काल म्हणजे, दि. २९ रोजी हरहुन्नरी कलाकार इरफान खानचेदेखील कॅन्सरने निधन झाले. आता त्याच्यामागून तू ही कॅन्सरने जाशील आणि संपूर्ण चित्रपट इंडस्ट्री आणि चाहत्यांना पोरकं करशील, असं वाटलंदेखील नव्हतं. परंतु, मन घट्ट करून तुझ्या अविस्मरणीय चित्रपटांच्या प्रवासाबद्दल लिहावं लागतयं. तुझ्यासारख्या कलाकाराने कॅमेऱ्यासमोर येऊन अख्ख्या जगाला तू कसं हसवलंस आणि रडवलंस हेदेखील सगळ्यांना समजू दे.    

‘बॉबी’मधला तो ऋषी कपूर पाहिला की, अंगात स्‍वेटर घातलेला २१ वर्षांचा तो तरुण आठवतो. भारतीय मनोरंजन जगताला ऋषी कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. चित्रपटातील एकापेक्षा एक गाणी, जी त्‍याने सुंदर अभिनेत्रींसोबत चित्रित केली होती. त्‍यांची त्‍या-त्‍या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत असलेली केमिस्‍ट्रीही प्रेक्षकांच्‍या पसंतीस कायमस्‍वरूपी उतरली. 

एकेकाळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राज कपूरने ‘बॉबी’ या चित्रपटातून नव्हाळीतल्या प्रेमाचा विषय हाताळला. 'बॉबी'मध्‍ये ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांचा ऐन तारुण्‍यातील प्रेम पडद्‍यावर दाखवण्‍यात आलं. बॉबी पाहिल्‍यानंतर ऋषीचा अभिनयासाठीच जन्‍म झाला असावा, असं वाटतं. प्रेमातील अनेक प्रसंग ऋषी कपूरने अजरामर करून ठेवले आहेत. त्याचा काळ आणि त्याच्या नंतरच्या काळानेही ऋषीच्या प्रेमासारखं आपलं प्रेम पाहिजे म्‍हणून प्रेमात पडणारी पिढी त्याकाळी निर्माण झाली होती, आणि त्याच्या प्रेमासाठीच ऋषीच्या स्‍वेटरचा ट्रेंड अस्‍तित्‍वात आला.  आणि पुढे अभिनेता म्‍हणून तो अजरामर झाला. 

राज कपूर यांनी शंकर-जयकिशनऐवजी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेऊन 'बॉबी'साठी काम केलं तर ऋषी कपूरच्‍या गाण्‍यांना मुकेश यांना गायला न सांगता शैलेंद्र सिंग यांना गायला सांगितले. विशेष म्‍हणजे, 'बॉबी'तली गाणी सुपरडूपर हिट ठरली म्‍हणून काळ लोटला तरी ऋषी कपूरची गाणी आजही अनेकांच्या ओठावर रूळली.

अभिनेता राज कपूर . प्रत्येक भूमिकेला त्याने जिवंतपणाचा ओलावा दिला. त्‍यांच्‍याच मुलांपैकी एक ऋषी कपूर. ऋषी कपूरसारखं स्‍पिरीट इतरांकडे म्‍हणावं तसं नव्‍हतं. 'बॉबी'ला मिळालेल्‍या यशानंतर एकामागोमाग एक चित्रपट ऋषीने दिले. ऋषीने डिंपल कापडियाबरोरच पद्मिनी कोल्हापुरे, जया प्रदा, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, दिव्‍या भारती, रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला या अभिनेत्रींसोबत अनेक चित्रपटांत काम केले. 

ऋषीने 'मेरा नाम जोकर'मधून एक बालकलाकार मधून सिनेजगतात पाऊल ठेवलं. या चित्रपटासाठी त्‍यांना डेब्यू चाईल्ड अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. परंतु, एक अभिनेता म्‍हणून 'बॉबी' हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्‍यांना उत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा पुरस्‍कार मिळाला. 

सिनेजगतातल्‍या २५ वर्षांच्‍या करकिर्दीत स्वेटर्स घालून, अभिनेत्रींभोवती पिंगा घालण्‍याशिवाय आणि गाणी गाण्यापलीकडे आपण काहीच केले नसल्‍याने त्‍यांनी खुद्‍द कबूल केले आहे. 

... तेव्‍हा खचला ऋषी 

राज कपूर यांनी आर. के. फिल्म्सची कंपनी स्थापन करून चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओ उभारला. अनेक चित्रपटांचे शूटिंग या स्‍टुडिओत झाले होते. 'बॉबी' चित्रपटाचे चित्रीकरणही तेथेच झाले होते. ‘श्री. ४२०’चं शूटिंगदेखील तिथलंचं. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ हे गाणं आठवतयं? ‘श्री. ४२०’ मधील या रोमँटिक गाण्‍यात ऋषी केवळ दोन वर्षांचे होते. त्‍यावेळचा शूटिंगचा एक किस्‍सा सांगितला जातो. दोन वर्षांच्‍या ऋषीला भर मुसळधार पावसातून रडत चालायचे होते. परफेक्‍ट सीनसाठी रिटेकवर रिटेक होतात. शूटिंग लांबते. त्‍यामुळे चिंब भिजलेला ऋषी वैतागतो आणि पावसात न जाण्‍याचा हट्‍ट धरतो. तेव्हा ‘तू पपा सांगतील, त्याप्रमाणे केलंस, तर मी तुला चॉकलेट देईन’, असे आमिष अभिनेत्री नर्गिस ऋषीला दाखवले होते. तेव्हापासून ऋषीचं आर. के. स्टुडिओशी वेगळं नातं आहे. म्हणूनच आर. के. स्‍टुडिओला आग लागली, तेव्हा ऋषी पुरता खचला होता. 

ऋषीची खास आठवण 

ऋषी आणि नीतू यांच्या विवाहानंतरच्या जंगी पार्ट्या आर. के. स्‍टुडिओतच झाल्‍या होत्‍या. त्यामुळे ऋषीला आर. के. स्‍टुडिओची लाईफटाईम आठवण राहणारी आहे. 
Bollywood's romantic heartthrob Rishi Kapoor dies at 67 - Esquire ...

ऋषीचं 'त्‍या' तरुणीशी अफेअर  

अभिनेत्री नीतू सिंह यांच्‍याशी लग्‍न होण्‍यापूर्वी ऋषीने यास्मीन नावाच्‍या तरुणीला डेट केल्‍याचे म्‍हटले जाते. परंतु, आपण नीतूला कधी धोका दिला नाही, असे खुद्‍द ऋषीने एका मुलाखतीत म्‍हटलं होतं. जेव्‍हा बॉबी चित्रपट आला होता, त्‍यावेळी ऋषी २१ वर्षांचा होता. बॉबी रिलीज झाला, त्‍यावेळी ऋषीचा ब्रेकअप झाल्‍याचे त्‍याने सांगितले होते. 

रोमॅंटिक ऋषीच्‍या गंभीर भूमिका 

गेल्या काही वर्षांमध्‍ये ‘दो दूनी चार’, ‘अग्निपथ’, कपूर ॲण्‍ड सन्‍स, राजमा चावल, बेशरम, स्‍टुडंट ऑफ द ईअर, पटियाला हाऊस, १०२ नॉट आऊट, ‘मुल्क’ अशा चित्रपटांतून वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा ऋषीने रंगवल्‍या. प्रत्‍येक भूमिकेला परफेक्‍ट असणारा ऋषीने रोमँटिकचं नव्‍हे तर गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 'मुल्‍क' या चित्रपटातील त्‍याची एका मुस्‍लिम व्‍यक्‍तीची रेखाटलेली भूमिका कौतुकास्पद आहे. 'मुल्‍क'मधील त्‍याची अत्‍यंत सुंदर भूमिका आहे, त्‍यात तापसी पन्‍नूचीदेखील महत्त्‍वाची भूमिका होती. 

या चित्रपटांतून साकारल्‍या वेगळ्‍या भूमिका

मेरा नाम जोकर, नगीना, दिवाना, हिना, चांदनी, प्रेम रोग, लैला मजनू, बंजारा, बोल राधा बोल, साजन का घर, कर्ज, प्रेम ग्रंथ, दामिनी, नसीब अपना अपना, अजुबा, दरार, अमर अकबर ॲन्‍थोनी, बडे घर की बेटी, घराना, ये वादा राहा, हम किसीसे कम नहीं, लव्‍ह आज कल, प्‍यार के काबिल, नमस्‍ते लंडन, रफू चक्‍कर, दो प्रेमीं, गुरुदेव, हम दोनों यासारख्‍या चित्रपटांतून ऋषी कपूरने वेगवेगळ्‍या भूमिका पार पाडल्‍या.  

Wednesday, May 6, 2020

जेव्हा 'तिने' आपले दोन्ही स्तन कापले अन्...



संग्रहित छायाचित्र 

मुलाकरम (ब्रेस्ट टॅक्स) 

सोळाव्या सतराव्या शतकात केरळमध्ये अनेक कर द्यावे लागत होते. यापैकी एक जाचक कर होता-मुलाकरम. केरळमधील त्रावणकोर येथे क्षुद्र जातीतील स्त्रियांना त्यांची स्तन झाकण्यास परवानगी नव्हती. स्तन झाकायचे झाल्यास त्यांना 'ब्रेस्ट टॅक्स' म्हणून 'कर' द्यावा लागत असे. तेथील स्थानीय भाषेत त्याला 'मुलाकरम' असे म्हणत असत. 

खालच्या जातीतील स्त्रियांना हा कर परवडणारा नव्हता. त्यामुळे तेथील स्त्रिया आपले स्तन उघडे ठेवत असत. अनेकांच्या भेदक नजरा त्यांच्या स्तनाकडे लागलेल्या असायच्या. परंतु, कुणालाही जाब विचारण्याची हिंमत झालेली नव्हती. पाण्याला जाताना, लाकडे आणायला जाताना किंवा घरची कामे करतानाही पुरूषांच्या नजरा त्या बाईवर पडायच्या. परंतु, महिलांना ते निमुटपणे सहन करावं लागायचं. यापेक्षा वाईट म्हणजे, जर तिने हा नियम मोडला, म्हणजेच क्षुद्र जातीतील स्त्रीने आपले स्तन झाकले तर तिला आपल्या स्तनाच्या वजनाएवढा कर द्यावा लागायचा. इतकेच नाही तर कर गोळा करणारा ते स्तन हातात घेऊन वजन करायचा आणि किती कर द्यावा लागेल, हे सांगायचा. ही कल्पनादेखील किती भयावह वाटते. परंतु, त्याकाळी त्या महिलांना किती सहन करावं लागलं असेल. 

जातीभेदाच्या चौकटीत त्या महिला हे सर्व डोळे झाकून सहन करत राहिल्या. त्याकाळी जाती-धर्माचा इतका पगडा होता की, खालच्या जातीला निमूटपणे सर्व सहन करावं लागायचं. पण, एक रणरागिनी निघाली, जिने या स्तन कराविरोधात आवाज उठवला. 'नांगेली' असं तिचं नाव. नांगेलीला या उच्च-नीच समाजव्यवस्थेचा प्रचंड राग यायचा. विषमतेच्या जोखडाखाली दबलेल्या स्त्रियांवर लावलेले नियम, कायदे तिला मोडीत काढायचे होते. 

अमानुषपणे महिलांवर होत असलेला अत्याचारांविरोधात तिला आवाज उठवायचा होता. अनेकदा तशी आपली तळमळ तिने बोलून दाखवली होती. परंतु, स्तन कराविरोधात आवाज उठवण्याचं धाडस कुणी केलं नाही. समाजव्यवस्थेने क्षुद्र जातीतील स्त्रियांवर लादलेल्या कराविरोधात तिने बंड पुकारण्याचा निश्चय केला. ती आपले स्तन झाकूनच बाहेर पडली. कर गोळा करणाऱ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या. तिने आपले स्तन का झाकले? याचा जाब नांगेलीला विचारण्यात आला. या प्रश्नावर नांगेलीच्या डोळ्यात निखाऱ्यासारखे रक्त साचले होते. तिने मुलाकरम ही देणार नाही आणि स्तनही झाकणार, असं थेट उत्तर देऊन कर गोळा करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं. तिच्या विद्रोही विचारांनी समोरची मंडळी प्रचंड घाबरली. परंतु, तिने हार न मानता आपला निश्चय सोडला नाही आणि त्यांच्या धमक्यांनाही घाबरली नाही. 

क्षुद्र जातीतील एका स्त्रीने विषमतावादी व्यवस्थेला आव्हान दिलं होतं. ते व्यवस्थेच्या पचनी पडणार नव्हतं. नावेलीने ही प्रथा बंद करण्यासाठी आपल्या पतीला बोलून दाखवली होती. तिचा पती नावेलीवर खूप प्रेम करायचा. त्याने आपल्या पत्नीला साथ दिली.

अखेर कर घेणारा नावेलीच्या घरी पोहोचला. तिच्या स्तनाची तपासणी केली. तिला हा सर्व प्रकार असह्य वाटत होता.  

तिला पाहताच कर घेणारी मंडळी संतापली आणि तिच्याकडे मुलाकरम मागू लागले. तिला तिच्या स्तनाच्या वजनाएवढे मुलाकरम द्यायचे होते. नांगेलीने क्षणाचाही विचार न करता थेट आपल्या घरामध्ये गेली आणि त्यांना बाहेरच थांबण्यास सांगितलं. ती आपल्या दोन्ही हातातून मुलाकरम घेऊन आली. परंतु, जेव्हा नांगेलीला बाहेर थांबलेल्या लोकांनी पाहिलं, तेव्हा त्यांना घाम फुटला होता. त्यांना काय करावं सुचलं नाही. कारण, समोर जे दृश्य होतं, ते भयावह आणि मन हेलावून टाकणार होतं. नांगेलीच्या हातात असणाऱ्या केळीच्या पानावर दोन स्तन होते. तिने आपले स्वत:चे स्तन कापून त्या पानावर ठेवले होते आणि 'मुलाकरम' म्हणून तिने ते समोरच्या लोकांसमोर सादर केले होते. अतिरक्तस्रावाने नांगेलीचा जागीच मृत्यू झाला होता. रक्ताच्या थोरोळ्यात पडलेल्या नांगेलीला पाहून तेथील लोकांनी धूम ठोकली. 

अमानवीय कायदा मोडणारी नांगेली खऱ्या अर्थाने थेट समाजाशी भिडणारी योध्दाव् (रणरागिनी) ठरली. 


('योध्दाव्' हा मल्याळम भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ रणरागिनी असा होतो.) 

Tuesday, May 5, 2020

लुम्बिनी


यहाँ हुआ था भगवान् बुद्ध का जन्म ...

अशोक स्तंभ - लुम्बिनी

मी माझ्या ब्लॉगला लुम्बिनी हे नाव दिलं आहे. हे नाव देण्यामागे खास असं कारण नाही. गौतम बुद्ध यांच्याबद्दलची माहिती वाचताना लुम्बिनी हे नाव वाचनात आलं आणि आवडलंही...लुम्बिनी या पवित्र स्थळाचं नाव देणं भाग्यचं...

लुम्बिनी हे गौतम बुद्धांचं जन्मस्थान. नेपाळ देशामधील एक ऐतिहासिक स्थान आहे. येथे इ.स.पूर्व ५६३ मध्ये राणी मायादेवीने सिद्धार्थ गौतमाला जन्म दिला होता. लुम्बिनी नेपाळच्या दक्षिण भागात नेपाळ-भारत सीमेजवळ स्थित असून ते भारताच्या गोरखपूर शहरापासून ९५ किमी अंतरावर स्थित आहे. लुम्बिनी, बोधगया, कुशीनगर व सारनाथ ही बौद्ध धर्मामधील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत.

 संदर्भ-विकिपीडिया