Wednesday, November 18, 2020

बाळासाहेब ठाकरे आणि आईचं जाणं असहनशील...!

एकीकडे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं जाणं आणि दुसरीकडे माझ्या आईचं जाणं या दोन्ही गोष्टी मला सहन झाल्या नव्हत्या. आठ वर्षांपूर्वीची गोष्ट. १७ नोव्हेंबर, २०१२ ला बाळासाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. दुसरीकडे, मी माझ्या आईचा मृत्यू माझ्या डोळ्यांनी पाहत होते. 

१७ नोव्हेंबरचा तो दिवस. माझी आई आजारीच होती. तिचे उठणे, बसणे, बोलणे सर्वकाही बंद झाले होते. तिला हाक मारली असता, केवळ 'हम्म' अशी प्रतिक्रिया ती द्यायची. तिला आम्ही आंघोळ घातली. हिरव्या मुगाची पेज खाऊ घातली. तो दिवस कसाबसा गेला. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब गेल्यानंतर सगळीकडे सन्नाटा होता. आम्ही कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेत राहत होतो. जरगांच्या घराशेजारी राहत असल्यामुळे गल्लीत आणि पेठेत तसं राजकीय वातावरण वेळोवेळी अनुभवायला मिळायचं. 

त्यादिवशीही सगऴीकडे भयाण शांतता वाटत होती. घरी आई आजारी असल्याने अस्वस्थ तर वाटत होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेचं १८ नोव्हेंबरला अख्खं कोल्हापूर बंद होतं. सगळ्या गाड्या, रिक्षा बंद होत्या. सकाळचे ११ वाजले असतील. आईने औषधाची उलटी केली. आम्हा दोघी बहिणींना काय करावं समजत नव्हतं. बाहेर तर एक रिक्षा नाही. आईने तर इकडे डोळे मिटलेले होते. रुग्णवाहिकेला फोन केला तर यायला अर्धा तास लागेल, असा निरोप आला. गल्लीमध्ये एकाची रिक्षा होती. त्याला विनंती केली की, डबल पैसे घे, पण माझ्या आईला तत्काळ दवाखान्यात घेऊन चल. पण, रिक्षावाल्याने नकार दिला. त्याचं कारणही तसं महत्त्वाचं नव्हतं किंवा त्याला कुठलीही अडचण नव्हती. लाचार होऊन रुग्णवाहिकेची वाट पाहण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. अशा गंभीर परिस्थितीत माणसं माणुसकी सोडून कशी काय वागू शकतात? असा प्रश्न मला पडला होता. आम्ही त्यांच्याजागी असतो तर जीवाची पर्वा न करता त्यांची अडचण सोडवली असती. असो. 


अखेर रुग्णवाहिका आली. आईला राजारामपुरीतल्या सिटी हॉस्पिटलमध्ये नेलं. तोपर्यंत ती कोम्यात गेली होती. डॉक्टरांनी नो गॅरंटी दिली होती. केवळ श्वास सुरू होता म्हणून डॉक्टरांनी तिला व्हेंटीलेटरवर ठेवलं होतं. पेशंटला घरी घेऊन जा, असे ते सांगत होते. परंतु, आईला घरी आणून तिचं मरण डोळ्यांनी पाहण्याइतपत माझी ताकद नव्हती. आपल्या डोळ्यांसमोर आईची मृत्यूसमयी होणारी तडफड मी कशी काय पाहू शकले असते? आता जरी तो विचार मनात आला तरी मन भरून येतं. 

अखेर ६ डिसेंबरला मध्यरात्री दिड वाजता माझ्या आईची प्राणज्योत मालवली. १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्वर्गवास आणि १८ नोव्हेंबरला माझी आईला कोम्यात गेली. या घटनांना २०२० मध्ये ८ वर्षे झाली. त्यावेळी एकीकडे बाळासाहेबांचं जाणं आणि दुसरीकडे माझ्या आईने घेतलेला जगाचा निरोप, या दोन्ही गोष्टी सहन होणाऱ्या नव्हत्या. आठ वर्षांनंतर ते चित्र पुन्हा डोळ्यांसमोर उभं राहिलं...! 

1 comment: