Sunday, March 6, 2022

'निसर्गाशी एकरुप झाले'

निसर्गाशी एकरुप झालं की, निसर्ग आवडायला लागतो. निसर्गात फिरायचं म्हटलं की, प्रवास आला. पण, प्रवास करणं म्हणजे माझ्यासाठी कंटाळवाणे गोष्ट होती. एकदा कॉलेजमध्ये असताना ट्रेकिंगला गेले आणि तेथील निसर्गाचं रुप पाहून भारवून गेले. तेथेच राहावं...निसर्गाच्या कुशीत...पक्ष्यांच्या किलबिलाटात...मातीचा सुगंध घेत, पाना-फुलांच्या झाडीत आणि गर्द हिरवाईत...कितीही फिरा सावलीचं सावली. कसं मनाला प्रसन्न वाटतंय ना!. मलाही तसाच अनुभव आला होता.  

त्यानंतर मला निसर्ग आवडायला लागला. प्रवास करायचा कंटाळा न येता उलट आनंदाने गाडीत जाऊन निसर्गाच्या गावाला जायचं. केवळ निसर्गात फिरणेचं नव्हे तर पर्यावरण संतुलित राखण्याचं काम सुरू झालं. वैयक्तिक पातळीवर आणि सामुहिकरित्या अशा दोन्ही पातळींवर निसर्ग जपण्याच्या कार्याला सुरूवात झाली.

शाळेत असताना शिकवलं होतं निसर्गाचं चक्र कसं असतं. हे चक्र जरादेखील बिघडलं की, निसर्गाचं असंतुलन कसं होतंय़ हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेचं मी स्वत: आणि घरातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळींनादेखील छोट्या-छोट्या गोष्टींतून पर्यावरण कसं राखायचं सांगितलं. मी स्वत: प्लास्टिकचं साहित्य घरात वापरत नाही. फ्रिजदेखील मी बंद ठेवला आहे. बाजातून आणलेले साहित्य हे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेलं असतं. तेव्हा हे प्लास्टिक वातावरणात किंवा आपल्या भोवताली आजूबाजूला किंवा गटारीमध्ये टाकून देऊ नये. ते कचराकुंडीतचं फेकावे असं घरातील मंडळी आणि शेजाऱ्यांनाही सांगितलं.

निसर्गाचं रुप पाहणं अविस्मरणीय गोष्ट

मी भ्रमंती करते. डोंगरदऱ्या, जंगल भ्रमंतीचा यामध्ये समावेश आहे. डोंगर दऱ्यांमध्ये फक्त ट्रेक नाही तर तेथील कचरा गोळा करणे आणि त्याची विल्हेवाट लावणे हे माझं प्राधान्याने काम आहे. तेथील प्लास्टिक बाटल्या, खाऊची प्लास्टिकची पॅकेट्स  गोळा करणे, कचरा काढून तेथील निसर्ग परिसर स्वच्छ ठेवलं जातं. त्याजागी नवी झाडे लावणे, बी बिया पेरणे, रोपे लावण्याचं काम प्राधान्यानं केलं जातं. नदी, ओढ्यांचे प्रदूषणही रोखण्यासाठी मी स्वत: पासून सुरुवात केलीय. आम्ही  घरातील मंडळी कुणीचं पुजेचे साहित्य, निर्माल्य नदीमध्ये सोडत नाही. त्याचबरोबर, नदीत कपडे धुणे वगैरेही टाळतो. जर कुणी नदीत घाण टाकत असेल तर त्यालाही रोखतो.

मी निसर्ग फोटोग्राफर आहे. निसर्गातील सहज दिसणाऱ्या गोष्टी कॅमेराबध्द करायला मला आवडतात. मला निसर्ग आवडतो. आपण ज्या निसर्गात राहतो, त्याचंही काहीतरी देणं लागतो. म्हणूनचं जितकं आपण निसर्गाकडून मिळवतो, तितकचं निसर्गालाही देणं लागतो. निसर्ग आहे तर आपण आहे, निसर्ग नाही तर पृथ्वीवर काहीचं नाही. म्हणूनचं निसर्गाप्रती सजग व्हा, जागृत व्हा आणि जनजागृती करा!

No comments:

Post a Comment