Friday, July 23, 2021

पूर ...आणि 'तो' अनुभव मी कधीच विसरणार नाही

 


संध्याकाळी साडे चारची वेळ होती. दिनांक 23 जुलै 2021. मी आणि माझी  सहकारीं दोघी रंकाळा जवळ गेलो. तिथे आम्ही रंकाळा ओव्हरफ्लो झाला आहे असा आम्हाला कळाल्यावर ते पाहण्यासाठी गेलो. तसं पाहिलं तर आम्ही गर्दी करायला गेलो नव्हतो.  पण आम्ही प्रसारमाध्यमाची माणसं. त्यामुळे आमच्यातला पत्रकार गप्प बसत नव्हता. आम्ही तेथे शुटींग करायचं ठरवलं. पुरामुळे रंकाळा पूर्ण काठोकाठ भरलेला होता. रंकाळ्याचे पाणी काठाबाहेर पडत होते.

 कोल्हापूरकर तसे उत्साहात तिथे जमलेले होते. रंकाळ यातून बाहेर पडणार पाणी पाहण्यासाठी तिथे प्रचंड गर्दी झाली होती. लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत एकच गर्दी रंकाळा टॉवर जवळ झालेली दिसली. तर मोठ्या प्रमाणावर तरुण देखील समुहा समूहाने तेथे येत होते.  अगदी मोठ्या आणि टू व्हिलर गाड्या देखील रस्त्यावर उभ्या होत्या. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आणि वाहनांची एकच रांग लागली.

2005 ला असा रंकाळा ओवरफ्लो झाला होता. त्याची पुनरावृत्ती आज पाहायला मिळाली. मी आणि माझी मैत्रीण धनश्री आम्हा दोघींना देखील फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. पण तो मोह क्षणिक होता.

कारण कोल्हापूर, सातारा,  कोकण, रत्नागिरी आणि सांगली जिल्ह्यामध्ये पुराचे थैमान पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत मन सुन्न झाले होते. ते आत्ताही आहे. एक प्रकारचे नैराश्य आले आहे. सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत आहे गल्लोगल्ली उपनगर चौका-चौकात आणि पाहायला मिळत आहे. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेकांनी आपले संसार कसेबसे दुसरीकडे हलवले आहेत. या पुराच्या पाण्याच्या मागे प्रशासनही हतबल झाले आहे. कारण आजचा चौथा पाचवा दिवस संततधार सुरूच आहे. पाऊस थांबण्याचे काही नाव घेईना.

एकीकडे गेली दोन वर्षे कोरुना ने सगळ्यांना जगूच दिलं नाही. आणि आत्ता या वर्षी म्हणजे 2021 ला पुन्हा  पुराने थैमान घातले आहे. निसर्गापुढे कुणाचे काहीच चालत नाही. तर तिथे माणूस तरी काय करणार. 2021 ची विदारक परिस्थिती पाहिली तर आपण खूपच मागे चाललो आहोत असं वाटतं. कारण कोरोनामुळे एक तर लोकडाउन झालं. आपल्याकडे असलेली पुंजी लोकांनी या काळात वापरली. कारण अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद होतं. सर्व व्यवसाय ठप्प होते. अनेकांची परिस्थिती घरात खाण्यासाठी दाणा देखील उरला नाही अशी झाली होती.

काही दिवसापूर्वी प्रशासनाने सर्वांना सूट दिली आणि सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने


उघडी ठेवण्यास परवानगी दिली. याला काही दिवस उलटत नाहीत तोपर्यंत पुराने आपला रंग दाखवण्यास सुरुवात केलं.

गल्लोगल्ली चौकाचौकात नगरात नगरात उपनगरात आणि नदीकाठी वसलेली शहरे वस्ती आणि गावांमध्ये देखील सगळीकडे पाणीच पाणी झाले. सर्व मार्ग बंद झाले वाहतूक ठप्प झाली. गावागावांचा संपर्क तुटला. वीज नाही पाणी नाही अशी बिकट अवस्था झाली. एकीकडे वाढतं पाणी आणि दुसरीकडे संततधार. आभाळ फाटल्यासारखं पाऊस पडतोय. काही दिवसांपूर्वी ढगफुटीचा इशारा अशी बातमी आली आणि ती खरी ठरली. आम्ही कोल्हापूरकर आणि ती आखोदेखी पाहिलं.

पण मनात एकच भावना आहे. ती भावना म्हणजे भीतीची. कारण पाऊस जर थांबला नाही तर सगळीकडे हाहाकार माजेल. लोकांचं जगणं कठीण होऊन जाईल. आधीच बिकट परिस्थिती झालेली आहे. सगळे लोक हतबल झालेले आहेत. आणि त्यात जर पाऊस नाही थांबला तर निसर्गाचे रौद्र रूप खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. पण परमेश्वराकडे आमची एकच प्रार्थना आहे. हे परमेश्वरा, सगळीकडे पाणीच पाणी झालं आहे. लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

लोकांना राहायला देखील जागा उरलेली नाही. सर्व घराघरांमध्ये पाणी शिरलेलं आहे. सर्व दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे अगदी रुग्णालयात शुद्ध पाणी गेलेलं आहे. अशा परिस्थितीत कुठे जावं तुझ्या लेकरांनी. तूच कर्ता आणि तूच धर्ता आहेस. तूच मारणारा आणि तूच तारणारा आहेस. परमेश्वरा हे निसर्गाचे तांडव थांबव. आणि तुझ्या लेकरांना शांतपणे जगू दे. तुझी लेकरं एका मागोमाग संकटांचा सामना करत आहेत. तू त्यांना संकटांचा सामना करायला ताकत तर दिलीस मात्र, ती पुरती आतून खचून गेली आहेत.

 असाच पाऊस सुरू राहिला तर खाणार काय, व्यवसाय काय करणार,  मुलाबाळांचं कसं होणार, कुठे जाणार, कुठे राहणार... हे असे असंख्य प्रश्न मनामध्ये येऊन ठेपले आहेत.

कोणाला काही कोणताच मार्ग दिसेना. सर्व अंधार अंधार दिसतो आहे. ईश्वरा कुठेतरी प्रकाशाचा मार्ग दाखव. जगण्याची आस लागून राहू दे. आणि आम्हाला आमच्या मुलांमध्ये राहू दे. तू तुझ्या लेकरांना सांभाळून घे. आमच्याकडून काही चुकलं असेल तर माफ कर.कारण, तुझ्या लेकरा मध्ये आता फारशी ताकद उरलेली नाहीये.

इतक्या सर्व संकटांचा सामना ते करू शकत नाही. कारण निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही. आताच्या आलेल्या परिस्थितीशी हतबल होऊन न जाता त्यांना या संकटाशी दोन हात करायची शक्ती दे, ताकद दे. इतकीच तुझ्याकडे प्रार्थना परमेश्वरा!!!

आणि त्या चिमुकलीच्या हाताला मी धरून नेलं....

ओव्हरफ्लो रंकाळा पाहून घरी येताना साकोली कॉर्नर पाण्याने पूर्ण खचाखच भरला होता. साकोली मार्गावरून चार रस्ते जात होते. एक रंकाळ्याला जाणारा मार्ग होता दुसरा उभा मारुती चौकात कडे जाणारा मार्ग होता तिसरा महाद्वार रोड कडे जाणारा मार्ग होता आणि चौथा रंकाळा स्टॅन्ड कडे जाणारा मार्ग होता.

माझ्या मैत्रिणीने उभा मारुती चौकात मला सोडले आणि ती सानेगुरुजी वसाहतीच्या दिशेने निघून गेली. मला घरी जायचं होतं म्हणून मी उभा मारुती चौकात तुम्ही थेट साखळी करणार कडे येत होते. अगदी मोठी घसरण असताना देखील वरून प्रचंड पाणी पायात येत होतं. कशीबशी मी वाट काढत उभा मारुती चौकातून साकोली कोणाकडे येण्याचं ठरवलं. पूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं ते जसे मी पुढे जाईन तसे माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आलं.

गुडघाभर पाण्यात चालत चालत असताना एक चिमुकली असेल सहा-सात वर्षांची ती छत्री घेऊन उभी असलेली मला दिसली. बिचारी छत्री घेऊन पाण्यातच उभी होती आणि तिला काही सुचत नव्हतं की कुठे जावं. कारण चारी बाजूने पाणी होतं आणि मी ही तिथेच होते. पाठीवरची सॅक सांभाळत एका हातात छत्री घेत आणि स्वतःचा तोल सांभाळत मी त्या पाण्यातून वाट काढत होते. ती मुलगी मला पाण्यामध्ये इकडे तिकडे पाहताना सैरभैर झालेली दिसली.

ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती पण पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की चालणं देखील कठीण झालं होतं. मी तिला विचारलं की तू कुठे जाणार आहेस तर तिने daash असं नाव सांगितलं. बहुदा ते तिथल्या मंडळाचे नाव असावं. असं गृहीत धरून मी तिला माझ्या हाताला धरायला सांगितलं. तिने माझा हात गच्च आवळून धरला. मीदेखील थोडीशी घाबरलेले होते आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून गुडघाभर पाण्यातून वाट कशी काढायची या विचारांमध्ये तिला मी नाव विचारायचच राहुन गेलं. फक्त तिला तू कुठे राहतेस असं सांगितल्यानंतर तिने ध्यास ग्रुप असा पत्ता सांगितला.

हाताशी घट्ट धरून मी आणि ती गुडघाभर पाण्यात पाय वाट काढत काढत वाहनांना जागा देत अगदी सुरक्षितपणे चालत होतो. तिलापण सांभाळण्याची जबाबदारी अप्रत्यक्षपणे माझ्यावरच होती. कारण मी ठरवलेलं काही झालं तरी पाण्यामध्ये पडायचं नाही. किंवा स्वतःचा तोल जाऊ द्यायचा नाही. आणि त्या मुलीला देखील मी घट्ट धरलं आणि साकोली कॉर्नर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

उभा मारूती चौक ते साकोली कॉर्नर अशी जी गल्ली होत,  त्याला घसरण होती. त्यामुळे वरून येणारे सर्व पाणी आमच्या पाणी पायामध्ये साचत होतं. पाण्याचा प्रवाह देखील अधिक होता. कधी कधी अशी भीती वाटायची की आपण यातून वाहून जाऊ की काय? पण परमेश्वराच्या कृपेने आम्ही सुरक्षित राहिलो.

 मला जायचं होतं रंकाळा स्टॅन्डकडे  आणि तिला जायचं होतं... रंकाळ्याकडे जाणारी एक वाट आहे त्या दरम्यान असलेल्या डॅश ग्रुप या ठिकाणी. लोक आपापल्या मार्गाने जात होत.  काही लोकं घाबरून गेली होती. कारण अचानक आलेले पायामध्ये पाणी पाहून कुठे जावं कुणाला काहीच कळत नव्हतं.

त्यात एक व्यक्ती मला ग्रुपच्या मार्गाने जाताना दिसला आणि मी त्यांना काका अशी हाक देऊन विनंती केली की या मुलीला डॅश ग्रुपपर्यंत सोडा. खूप पाणी वाढण्याअगोदर तिला सुरक्षित तिच्या घरी जायचं होतं आणि मला देखील माझ्या घरी यायचं होतं. अखेर तिच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि मी माझ्या घरच्या दिशेने. मला आनंद झाला की आपण तिला सुरक्षितपणे पाण्यातून बाहेर आणलं आणि आपणही सुरक्षित राहिलो. त्यावेळी मी परमेश्वराचे आभार मानले. कारण आणखी थोडा वेळ तिथे थांबलो असतो तर पाणी वाढण्याची जास्त शक्यता असती आणि मी तिथेच अडकून पडले असते. त्यावेळचा अनुभव कथन करणं खूप कठीण. पण जो अनुभव मी प्रत्यक्ष घेतला आहे, तो कधीच मी माझ्या आयुष्यात विसरणार नाही....

No comments:

Post a Comment