हा ब्लॉग लिहायला फार उशीर झालाय. पण, मनात खदखद ठेवण्यापरीस ते व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे.
मी कोल्हापुरातील एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. एफ वाय ला असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडले गेले. सुरुवातीला गिरीश फोंडे यांच्याशी ओळख झाली. नंतर के. डी. खुर्द यांच्याशी ओळख झाली. के. डी. खुर्द हे वृद्ध होते. मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम जाणून घ्यायची इच्छा होती. आपण पाहतो समाजात आपल्या आजूबाजूला काही वर्ग असा आहे जो अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतो. अनेक भोळ्या भाबड्या महिलांना फसवतो. अनेकांचे जीव घेतो. अशाच कुप्रथा, अंधश्रद्धा, नरबळी, नरसंहार यांसारख्या गोष्टींना छेद देण्यासाठी दाभोळकर आयुष्यभर झटले.
मी आणि नरेंद्र दाभोळकर
के डी खुर्द, गिरीष फोंडे आणि आम्ही आठवड्यातून एकदा कॉलेजमध्ये असताना चर्चासत्राला असायचो. वय अगदी कमी असल्यामुळे चळवळीच्या कामांची माहिती तितकी फारशी माहिती नव्हती. इतकचं माहिती होतं की, दोभोळकर कुणी एक मोठा माणूस आहे. तो अंधश्रद्धेच्या विरोधात लढतो.
नरेंद्र दाभोळकरांच्या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित असायची. त्यांची अनेक चर्चासत्रे आणि कार्यक्रम, कार्यशाळांना मी उपस्थित असायचे. इतकचं नाही तर त्यांच्या काही पत्रकार परिषदांनाही उपस्थित राहायचे. ते काय म्हणताहेत, हे शांतपणे ऐकून घ्यायचे. अंधश्रध्दा कशापध्दतीने माणसाला भिकेला लावतो, याची उदाहरणे देऊन ते सांगायचे.
एकदा बोलता बोलता ते म्हणाले, आमच्या घरी खूप देवघर आहे. तेथे मोठा देव्हारा आहे, जिथे माझी आई पूजा पाठ करत असते. पण, मी तेथे जात नाही. मात्र माझी आई देवपूजा, उपवास वगैरे करते.
ते माणसांच्या सेवेत, माणुसकीत विश्वास ठेवायचे. भोंदुगिरी करून माणसं कशी दुसऱ्यांना फसवतात आणि माणसं कशी बली पडतात, याची उदाहरणेदेखील ते सांगायचे. करणीच्या नावाखाली निष्पाप जनावरांचा प्राण घेऊन आपण शेवटी काय करतो? ...पापचं असे ते म्हणायचे. हातातून लिंबू, हळद, कुंकू, भंडारा, अंगाऱ्याची पुडी काढणे, वेगवेगळ्या क्लृप्त्या करून दाखवणे, घरावर करणी आहे म्हणून आपोआप अगरबत्ती फिरवून दाखवणे, आपोआप आग लागणे, जादू करणे या सर्व गोष्टी अंधश्रध्देच्या नावाखाली कशापध्दतीने केल्या जातात, याबाबत ते आणि अंनिसचे कार्यकर्ते प्रयोग करून दाखवायचे. कार्यशाळेला हा प्रयोग असायचाच. आम्हीही हे प्रयोग शिकलो. कारण, प्रयोगाचा थेट संबंध विज्ञानाशी यायचा. विज्ञानाचा चमत्कार तो कसापध्दतीने भोंदुगिरी करणारे जादू म्हणून दाखवायचे, हे आम्हाला माहिती झालं होतं.
एनढचं नाही तर पथनाट्य करणं, अंधश्रद्धेविरोधात जनजागृती, कार्यशाळा, शिबिर भरवणं, भाषण ठेवणं, जनजागृतीपर गाणी घेणं या सर्व गोष्टी होतचं राहिल्या आणि मी शिकत गेले. स्त्रीला देवाला सोडल्यानंतर तिला काय काय सहन करावं लागतं, हे त्यांच्या तोंडातून ऐकल्यानंतर ते विदारक चित्र डोळ्यांसमोर उभं राहायचं. अंधश्रध्दाचं नव्हे तर अबला, असहाय्य महिला, मुले जी अशा कृत्यांना बळी पडतात, ते थांबावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे दाभोळकर होते.
त्यांचे विचार, त्यांचे प्रयत्न इतरांच्या रुपाने पुढे जावेत, ते खंडित होता कामा नये, इतकीचं इच्छा!

No comments:
Post a Comment